लोकल ट्रेनचा बारमाही मरणऋतू आणि आपले शहाणपण

  आज म्हणजे ९ जून २०२५ रोजी पाच लोक ट्रेनमधून पडून मेले आहेत. तसे एक-दोन रोजच मरत आहेत. काही वर्षांपूर्वी, अगदी दसऱ्याच्या काही दिवस आधी ३० एक लोक रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरीत मेले आहेत. विकासाच्या रथाला असे किडूक मिडूक बळी लागणार अशीच आपली भूमिका असली पाहिजे. कारण नाहीतर आपल्याला विचार करायला लागणार आणि ती गोष्ट आपल्या बौद्धिक, व्याख्याने , आणि सोशल मिडीयाला चटावलेल्या मेंदूला त्रासदायक ठरू शकते. तर ज्यांना हा त्रास करून घ्यायचा आहे त्यांनी आपल्या जोखमीवर पुढे वाचावे. पहिली बाब म्हणजे लोकल ट्रेन्स ही मुंबईची लाइफलाईन नाही. तो मुंबईचा आजार आहे. आणि मुंबईचा म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर जी मुंबईची नाजायज अपत्ये असलेली शहरे किंवा धर्मशाळा आहेत त्यांचा तो आजार आहे. अगदी सुरुवातीपासून, म्हणजे १८७० पासून , मुंबईच्या केंद्रवर्ती भागातील गर्दी बाहेर फेकायचा उपाय म्हणून ट्रेन्स वापरल्या गेल्या आहेत. आजही लोकल ट्रेन आणि मेट्रो हेच, म्हणजे मुंबईतील एलिट आणि धनाद्य कुटुंबांची घरे स्वस्त करणे आणि जीवनाची गुणवत्ता वाढवणे , हेच काम करत आहेत. शहरीकारणाचा थोर अभ्यास असलेले...

ऑनलाईन परीक्षांबाबत काही निरीक्षणे

 IIM-A ने २०२२-२४ ह्या batch च्या प्रवेशप्रक्रियेत पदवी परीक्षेची अटच काढून टाकली आहे. १० आणि १२ वी चे मार्क्स आणि कामाचा अनुभव तसेच प्रवेशपरीक्षेतील गुण ह्यांच्या आधारावर प्रवेश निश्चित केला जाणार आहे. असा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे अनेक युनिव्हर्सिटीना मागच्या २ वर्षांत परीक्षाच घेता आलेल्या नाहीत.

स्त्रोत: इथे 


लेक्चर्स ऑनलाईन घेतली जात असताना परीक्षाही ऑनलाईन का घेतल्या गेल्या नाहीत असा प्रश्न पडू शकतो. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी तांत्रिक सिद्धता हवी ही बाब आहेच. पण मुळात ऑनलाईन परीक्षा ही अत्यंत निरुपयोगी बाब आहे हे जास्त महत्वाचे आहे. परीक्षेचा उद्देश विद्यार्थ्यांची क्षमतानिर्देशक उतरंड ठरवणे हा असतो. ऑनलाईन परीक्षेतील गुणांनी मापलेली उतरंड ही विद्यार्थ्याच्या क्षमतेशी निगडीत असण्याची शक्यता फार कमी असते. ह्याचे कारण म्हणजे ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्याने दिलेले प्रश्नाचे उत्तर हे तिचे/त्याचे स्वतःचे असण्यापेक्षा कॉपी केलेले, पुरेसे गुण देण्याइतपत प्रभावी उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. विद्यार्थ्यांचे क्षमतामापन ऑनलाईन परीक्षेत करायचे झाले तर पारंपारिक प्रश्नपत्रिकेचे प्रारूप सोडून विद्यार्थ्यांना अनपेक्षित, अभ्यासक्रमाला सुसंगत पण इंटरनेटवर थेट उपलब्ध नसलेली निर्मिती विद्यार्थ्याला करायला भाग पाडणारे प्रारूप हवे. पण अशा प्रश्नपत्रिकेत उत्तम क्षमता असलेले विद्यार्थी आणि अन्य असे दोनच भागांत वर्गीकरण होते. त्याचा फारसा उपयोग नसतो.  बहुतेकदा आवश्यक वर्गीकरण हे अत्यंत ढिसाळ आणि त्यांच्याहून बरे आणि सरासरीहून बरे अशा तीन गटांत आवश्यक असते. उच्च क्षमतेच्या विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता दाखवायला अन्य परीक्षा असतात. विद्यापीठाच्या परीक्षेचे उद्दिष्ट वेगळे असते.

ऑनलाईन परीक्षा निरुपयोगी असण्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उत्साहावरही झालेला आहे. ऑनलाईन शिक्षणाचा रसहीन अनुभव आणि ऑनलाईन परीक्षेचा स्वतःची गुणवत्ता दर्शवायला उपयोग नसणे ह्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करायला पुरेसे incentives नाहीत.

अर्थात सर्वच विद्यार्थी अभ्यास करत नाहीत असे नाही. काही थोडे टक्के ऑनलाईन माध्यमातही गांभीर्याने विषय शिकू पाहतात. पण ऑनलाईन परीक्षा अशा विद्यार्थ्यांना वेगळे काढू शकत नाही.

उदाहरणार्थ, समजा एखाद्या विद्यार्थ्याने चांगली तयारी केली आहे आणि प्राध्यापकाने तयार केलेल्या पुरेश्या कठीण परीक्षेत तिला ४० गुण मिळतात. ही विद्यार्थिनी कॉपी करत नाही. ह्या विद्यार्थिनीचा एक मित्र, जो तिच्यापेक्षा कमी गांभीर्याने तयारी करत होता, तो स्वतःच्या क्षमतेने ३५ गुण मिळवतो आणि मग आपल्यासारख्याच अन्य एका विद्यार्थ्याच्या उत्तरांच्या मदतीने अजून ७ गुण मिळवतो. अंतिम गुणांत कमी गांभीर्य असलेला आणि अनैतिक साधने वापरलेला हा गांभीर्यपूर्वक तयारी केलेल्या विद्यार्थिनीपेक्षा अधिक गुण मिळवतो. ऑफलाईन परीक्षेत ही बाब टाळता येणे बरेच शक्य आहे.

ऑनलाईन परीक्षेचा उपयोग असेल तर अत्यंत भोळसट, पापभिरू किंवा नैतिक वर्तन करणारे विद्यार्थी शोधणे असा असू शकतो. कारण असेच विद्यार्थी कॉपी करणार नाहीत. सरासरी विद्यार्थ्याला परीक्षेच्या नैतिक गांभीर्यापेक्षा मैत्री महत्वाची असते. ही चांगलीही गोष्ट आहे आणि वाईटही. चांगली ह्या अर्थाने कि मित्राला मदत करून आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत हे कळूनही लोक मदत करतात. वाईट अशा अर्थाने कि नैतिक वर्तन हे चाप बसवल्याशिवाय स्व-प्रेरणेने करणे हा बहुतेकांचा स्वभाव नाही हे दिसून येते.

Banality of Evil ह्या शब्दप्रयोगाची आठवण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन परीक्षेतील वर्तन पाहताना होते. अर्थात हा शब्दप्रयोग फारच क्रूर कृत्यांना वापरला आहे. पण मुळात बहुतेकांना नैतिक दिशादर्शक नसतोच आणि जिथे स्वतःचा विवेक वापरायचा आहे अशा ठिकाणी त्यांनी विवेकाच्या भानगडीत न पडता स्वाभाविकपणे केलेल्या भ्रष्ट कृत्याचे लोक सहज समर्थन देऊ शकतात ह्या अर्थाने banality of evil लागू पडते. पकडण्याची, शिक्षेची भीती नसेल तर आपल्यातील बहुतेकजण काय काय करू शकतील! इंटरेस्टिंग बाब ही आहे कि एखाद्या विषयाच्या क्षमतेच्या उतरंडीत एकदम मागे असलेले विद्यार्थी अनेकदा अशा गैरप्रकारांत नसतात. विषयाचे गांभीर्य नसलेले, पण बरे गुण मिळवून भौतिक सुखांची शिडी चढायच्या स्कीम्स असलेले स्मार्ट विद्यार्थी हे विवेकाचे ओझे फेकून देण्यात तत्पर असतात आणि ही बाब त्यांना स्वाभाविक वाटते. अर्थात विद्यापीठांच्या परीक्षांचा उद्देश विद्यार्थ्यांच्या नैतिकतेची परीक्षा करणे असा नाही. त्यामुळे हे सारे धडे निरुपयोगीच आहेत. विद्यापीठाच्या दृष्टीने 'वाट पाहू, पण प्रत्यक्ष परीक्षाच घेऊ' हाच योग्य पवित्रा आहे. आणि प्रत्यक्ष (offline) परीक्षा होत नसेल तर त्याच्या पर्यायांकडे साशंक नजरेनेच बघायला हवं. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

विसंगत प्राणीदयेची समस्या