लोकल ट्रेनचा बारमाही मरणऋतू आणि आपले शहाणपण
आज म्हणजे ९ जून २०२५ रोजी पाच लोक
ट्रेनमधून पडून मेले आहेत. तसे एक-दोन रोजच मरत आहेत. काही वर्षांपूर्वी, अगदी
दसऱ्याच्या काही दिवस आधी ३० एक लोक रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरीत
मेले आहेत.
विकासाच्या रथाला असे किडूक मिडूक
बळी लागणार अशीच आपली भूमिका असली पाहिजे. कारण नाहीतर आपल्याला विचार करायला
लागणार आणि ती गोष्ट आपल्या बौद्धिक, व्याख्याने, आणि सोशल मिडीयाला चटावलेल्या मेंदूला त्रासदायक ठरू शकते. तर
ज्यांना हा त्रास करून घ्यायचा आहे त्यांनी आपल्या जोखमीवर पुढे वाचावे.
पहिली बाब म्हणजे लोकल ट्रेन्स ही
मुंबईची लाइफलाईन नाही. तो मुंबईचा आजार आहे. आणि मुंबईचा म्हणजे मुंबई
महानगरपालिकेच्या बाहेर जी मुंबईची नाजायज अपत्ये असलेली शहरे किंवा धर्मशाळा आहेत
त्यांचा तो आजार आहे. अगदी सुरुवातीपासून, म्हणजे १८७० पासून, मुंबईच्या केंद्रवर्ती भागातील गर्दी बाहेर
फेकायचा उपाय म्हणून ट्रेन्स वापरल्या गेल्या आहेत. आजही लोकल ट्रेन आणि मेट्रो
हेच, म्हणजे मुंबईतील एलिट आणि धनाद्य कुटुंबांची घरे स्वस्त करणे आणि जीवनाची
गुणवत्ता वाढवणे, हेच काम करत आहेत. शहरीकारणाचा थोर
अभ्यास असलेले चुमित चाटवन अभिनेते आणि राजकारण्यांच्या आकांक्षेला आपल्या
आकांक्षा भिडवलेले प्रशासकीय अधिकारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उदोउदो करतात ते
ह्याच कारणासाठी. कारण त्यात त्यांचा फायदा आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्या लोकांचा नाही.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे pervert आकर्षण हा एक आपला मानसिक आजार आहे. साधी राहणी
उच्च विचारसरणी प्रकारच्या आंबट द्राक्षे प्रकारातील ह्या गोष्टी आहेत. आणि
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नावाने हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प आणून, त्यात
आपल्या पाठीराख्यांना आवश्यक तेवढी रसद देता येत असल्याने, लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे समर्थक बनवण्याचा प्रयत्न करणे
हे राजकारण सारेच चाणक्य करत असतात. वैयक्तिक स्तरावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याचा
आग्रह म्हणजे घरात संगणक वापरणे शक्य असताना सायबर कॅफेतच संगणक वापरण्याचा आग्रह
धरण्यासारखे आहे. अर्थात स्वतः सार्वजनिक परिवहन न वापरता त्याच्याबद्दल आग्रही
असणारे भोंदू लोक सोडले तर आपापल्या जीवनाबद्दल सिरीयस असणारे लोक जसे शक्य होईल
तसा सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर कमी करताना दिसतात आणि ते बरोबरच आहे. आपली
क्रयशक्ती वाढेल तसा आपण दुय्यम प्रतीच्या (inferior) सेवा
आणि वस्तूंचा वापर कमी करत जाणे हे स्वाभाविक आहे. (पर्यावरण आणि परिवहन हा जटील
प्रश्न आहे. पण त्याचेही उत्तर सार्वजनिक परिवहन नाही. पण त्या चिकित्सेत इथे
जायचे कारण नाही.)
मग मुंबई महानगर परिसरात लाखो लोक का
लोकल वापरतात? कारण त्या स्वस्त आहेत. आणि
त्यांच्या स्वस्त असण्यानेच त्यातील प्रवाश्यांचे मरणेही स्वस्त आहे.
स्वस्त लोकल ट्रेन्सचा फायदा दोन
घटकांना होतो. पहिल्या म्हणजे लोकांना कामावर ठेवणाऱ्या कंपन्या आणि दुसरे म्हणजे
बिल्डर्स. स्वस्त लोकल ट्रेनमुळे कितीही अंतरावरून कर्मचाऱ्यांना कामावर ठेवता येते.
त्यामुळे संभावित कामगारांतील स्पर्धा वाढते आणि पगार स्वस्त होतात. थोडक्यात
स्वस्त लोकल ट्रेन म्हणजे कंपन्यांना सबसिडी. आणि गर्दीच्या ओझ्यात आपला
पार्श्वभाग किंवा पद्भाग ह्यांच्यासाठी काही चौरस इंच शोधात जाणाऱ्या प्रवाश्यांची
जी बचत होते ते ती बिल्डर्सच्या घशात घालून ३०-४० अधिक स्क्वेअर फुटी आनंद विकत
घेतात. प्रवाश्यांना मिळते ते उन्दीरासम जीवन आणि स्टॉकहोम सिंड्रोम, ज्यांत लाखो लोक
वर्षांतील २५० – ३०० दिवस अनेक कसरती करून लोकल ट्रेन पकडतात, आणि थोडे मरतात
किंवा जखमी होतात, त्यांच्या बोलण्यात सतत ७.१२, ९.२०, ५.२७ असे शब्द येत राहतात, आणि
त्यात ह्या गर्दीत सणवार वगैरे करण्याचा अघोरी प्रकार करतात. आणि ह्या सर्व
प्रकाराला मनुष्याच्या सन्मानाची प्रतारणा म्हणण्यापेक्षा मुंबई स्पिरिट
म्हणण्याचा थोर प्रकार आपण करतो.
जोवर आपण आपली ही मनोभूमिका बदलत
नाही, लोकल ट्रेनने जाणाऱ्या माणसाला
लाचार मानणे सुरु करत नाही (त्यात दुचाकीवरून आपल्या पाल्याला घेऊन जाणारे लोकही
आणायला हवेत), आणि लोकल ट्रेन भाडेवाढीला पाठींबा देत नाही तोवर एकतर आपण लकी आहोत
(कारण आपण हे वाचत आहोत आणि आपल्याला ट्रेनने जावेच लागत नाही) किंवा आपण मरायच्याच
लायकीचे आहोत.
दरवाज्यातील अतिरिक्त गर्दीमध्ये
चढण्याच्या चुकीच्या निर्णयाने लोक मेले असे समजून आपण आपली समजूत घालून घेणार असू
तर आपण आपल्या सेल्फ-सर्व्हिंग मेंदूला जागे करणे गरजेचे आहे. लोकल ट्रेन आपल्याला
दररोज मारतच असते. लाखो लोक झोपताना उद्या वेळेत उठून आपली ठरलेली लोकल पकडू का हि
टिकटिक डोक्यात ठेवून झोपतात, विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये नेमकी उडी
मारून शिरण्याचा प्रयत्न करतात,
झोम्बाझोम्बी करून डब्यात शिरायला बघतात, एका
पायाचा भर दुसऱ्या पायावर करत सीटवर बसणाऱ्या प्रवाश्याकडे आशाळभूत बघतात, कोणत्याही कारणाने ट्रेन रखडली कि लेट मार्क
किंवा वर्षभरातील रजांच्या हिशोबाला लागतात – हे सगळे मरणाचेच प्रकार आहेत. आपले जीवन
आकुंचित, क्षुद्र होत जाणे हे मरणच आहे आणि
लोकल ट्रेन त्या लाखो लोकांसोबत वर्षानुवर्षे करत आलेल्या आहेत.
आपल्याला दैनंदिन जीवनात आनंदाची चतकोरही
जागा न शिल्लक ठेवता तो सारा वेळ नोकरी आणि लोकल ट्रेन प्रवासाला वापरणे, वीकेंडला
लोकल ट्रेनच्या गर्दीप्रमाणे अन्य कुठेतरी गर्दी करणे, आणि मिळेल त्या वेळात
आपल्या मोबाईलमध्ये रमणे असे जीवन लाखो लोकांना जगायला लावणे हे लोकांना मारणेच
आहे.
स्वस्त लोकल ट्रेनमुळे केवळ गर्दीचाच
प्रश्न निर्माण होतो असे नाही. मुंबईच्या परिघावरील शहरांच्या समस्यांशी,
त्यांच्या बकाल बटबटीत वाढीमागे लोकल ट्रेनच आहे. कोणत्याही समाजाच्या समस्या ह्या
सामाजिक कृतीनेच सुटतात. पण मुंबईच्या परीघांवरील शहरांमध्ये अशा सामाजिक कृती
करण्यासाठी लागणारा प्रभावी गटच उभा राहू शकत नाही. कारण आठवड्याचे ५-६ दिवस हा गट
लोकल ट्रेनमध्ये उभा आहे आणि रविवारी केलेल्या आंदोलनाला सरकार पण सुट्टी देते.
(उदा. पुण्यातील लोकांनी रविवारी टेकडी वाचवायला काढलेला मोर्चा आणि दिव्यातील
लोकांनी ऐन ऑफिसच्या दिवशी केलेली दगडफेक ह्यातल्या कशाला फळे लागली ते आठवून पहा.)
मुंबईच्या परिघावरील शहराचे वाली हे फेरीवाले, रिक्षावाले, आणि
रिअल इस्टेटवाले हेच झालेले आहेत. तिथे राहणारा मध्यमवर्ग आपापल्या सोसायट्यांच्या
गेटच्या आत आणि त्यातही आपल्या २-३-१० bhk च्या आत
स्वर्ग निर्माण करण्यात गुंतलेला आहे. पण ह्या स्वर्गाचे रस्ते, गटारे, पाणी, गुन्हेगार जिथून येतात त्या शहराला बदलण्याचा
वेळच त्याच्याकडे नाही. कारण तो वेळ लोकल ट्रेनमध्ये घालवायचा स्वस्त पास त्याने
काढलेला आहे. आपापल्या मोबाईलमध्ये गुंतलेल्या एकांड्या लोकांचा फोमो समूह म्हणजे
समाज असे खरे म्हणणेच चुकीचे आहे.
सरकार, कोणाचेही सरकार, लोकल
ट्रेनची गुणवत्ता सुधारून हा प्रश्न सोडवू शकणार नाही. कारण लोकल ट्रेन बऱ्या
झाल्या कि त्यांची गर्दी अजून वाढेल. गर्दीचा प्रश्न अधिक ट्रेन्स वापरून सुटणार
नाही. गर्दीचा प्रश्न गर्दी कमी करूनच सुटेल.
गर्दी कमी करायचा पुरवठ्याच्या
बाजूचा मार्ग म्हणजे लोकल ट्रेन प्रवासाची किंमत वाढवणे. मागच्या १३ वर्षांत किंवा
त्याहून अधिक काळ लोकल ट्रेन तिकिटांच्या किंमती वाढलेल्या नाहीत. लोकल ट्रेन
वापरणाऱ्या प्रवाश्यांच्या क्रयशक्तीत ह्या काळात दुपटीने किंवा तिपटीने वाढ
झालेली आहे. त्यामुळे लोकल ट्रेन तिकिटांच्या किंमती वाढवणे ह्यात अन्याय्य काहीही
नाही. सरकारी आहे ते स्वस्तच हवे ही अपेक्षा रास्त असली तरी ते तुलनेने स्वस्त
हवे. लोकल तिकिटांच्या किंमती हास्यास्पद स्वस्त आहेत. प्रवाश्यांच्या क्रयशक्तीशी
सुसंगत तिकीटवाढीला विरोध का स्वार्थी कारणानेच असू शकतो, त्यात कोणतेही सामाजिक हित नाही.
लोकल तिकिटांच्या किंमती वाढवता ना
आल्याने रेल्वेला महसूल कमवायचे विकृत मार्ग शोधायला लागतात. त्यातला एक म्हणजे लांब
पल्ल्यांच्या गाड्यांतील एसी कोचेस वाढवणे आणि त्यांच्या किंमती वाढवणे आणि
नॉन-एसी कोचेस मधील प्रवासाची गुणवत्ता खालावू देणे, जेणेकरून अधिकाधिक प्रवासी
एसी कोचेसकडे येतील.
लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्याचा
अधिक शाश्वत पण तितकाच अशक्य मार्ग म्हणजे मध्यमवर्गीय white collar रोजगाराची केंद्रे मुंबई
महानगराच्या परीघावर उभी राहणे. पण मुंबई महानगर परिसराच्या शहर नियोजनात ही
दृष्टी कुठेच नाही. मुंबईतील काही मोजक्या केंद्रांच्या दृष्टीने परिघाच्या
शहरांना बटीक बनवणे हाच नियोजनाचा दृष्टीकोन आहे.
त्यामुळे खरंतर हळहळणे, निर्लज्ज
समर्थन करणे, किंवा आमचे थोर नेते काही वर्षांत
सर्व एसी ट्रेन आणून गर्दीचा प्रश्नच सोडवतील असे शहामृग बनणे हेच आपल्याकडे आहे. ज्यांना
शक्य आहे त्यांनी मुंबईच सोडणे हाही पर्याय आहे. पण स्थितीशील मानवी मनाला खोटी का
होईना आशा बरी वाटते. मी तर पडलो नाही ना गर्दीतून, माझ्या घरातले तर पडले नाहीत
ना, हा दिलासा आपण देऊच शकतो.
पण तुम्ही, तुमचे प्रियजन रेल्वेच्या जिन्यांवर चेंगरणार नाहीत, रस्त्याच्या कडेने चालत असताना भरधाव वाहनाने उडवले
जाणार नाहीत, खड्ड्यातून दुचाकी नेताना मागच्या
वाहनाने चिरडले जाणार नाहीत, क्षुल्लक
वादांत स्थानिक बाहुबली किंवा त्याच्या कुटुंबातील लोकांकडून मार खाणार नाहीत, ह्यातल्या कशाकशासाठी दिलासा देता येऊ शकतो?
विचार करून पाहाल तर तुमची प्रिय स्वस्त लोकल ट्रेन आपल्या हररोज खालावणाऱ्या
जीवनाच्या गुणवत्तेच्या खाली आहे हे आपल्याला लक्षात येईल.
आपल्या जीवनाची गुणवत्ता ही केवळ आपण
विकत घेऊ शकणाऱ्या वस्तूंत आणि सेवांत नाही, तर आपण आपले उपभोग किती निवांतपणे घेऊ शकतो ह्यांत आहे. आणि हा
निवांतपणाच आपल्याकडून काढून घेतला जातो आहे. दुपारच्या वामकुक्षीला हसणे, मुसळधार पावसात ऑफिसला जायला बघणे, दररोजच्या
जीवनात आनंदाची उणीव करून ती वर्षाच्या २५-३० सुट्ट्यांत भरून काढायला बघणे ह्या
स्वतःच्या मूर्खपणाकडे आपण डोळे उघडून पहायला हवं. नाहीतर गर्दी अशी ना तशी
आपल्याला चिरडणारच आहे. गर्दीचा तो गुणधर्म आहे, आणि त्यात राहण्याचा, तिलाच
जीवन मानण्याचा आपला अट्टाहास हा आपला मूर्खपणा. सरकार शहाणे होणार नाही, जोवर आपण शहाणे होत नाही. कोणाचे आणि किती जीव
गेले कि आपण शहाणे होणार आहोत?
शहाणे होण्यासाठी तुम्हाला पुढील
गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.
१.
स्वस्त
लोकल ट्रेन हा आजार आहे. तो बरा करायला हवा. त्यामुळे तिकिटांच्या किंमती रास्त
प्रमाणात वाढल्या तर त्याला विरोध नको.
२.
जसे
देशावर प्रेम करायचा, कलकत्ता शहरावर प्रेम करण्याचा, उत्तर प्रदेशांतील गावांवर
प्रेम करण्याचा एक मार्ग, तेथील लोकांनी, ह्या जागा सोडून अन्य जागी उत्तम जीवन जागून nostalgic उसासे टाकणे आणि वर्षा-दोन वर्षांत एखादी फेरी
मारून दृष्टीआडची सृष्टी टवटवीत करणे हा असतो तसाच मुंबईसाठीही आहे हे लक्षात
घेणे.
३.
सार्वजनिक
वाहतूक ही जेव्हा तुम्ही वापरत नाही तेव्हाच उत्कृष्ट असते.
४.
ह्यातले
काहीही नसेल तर एखादा खरा किंवा तुमच्या मताचा दगड सरकारला त्रासदायक असा तरी
मारायला उभे रहावे लागेल. ह्याला लोकशाही म्हणतात.
५.
हेही
जमणार नसेल तर व्रतस्थपणे लोकल ट्रेनने जात राहणे, दयाघन ईश्वराची प्रार्थना करणे, केव्हातरी एखाद्या झाडे-पाणी असलेल्या ठिकाणी Instagram अपडेट करणे, आणि आपल्या खालावत्या जीवनातून आपण दक्षिण-पश्चिम मुंबईतील धनाढ्य
लोक, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी ह्यांचे जीवन समृद्ध केले ह्या कृतकृत्य परोपकारी जाणीवेने
मरणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा