वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकसत्तात काहीसा संक्षिप्त लेख प्रकाशित झाला आहे. (दुवा) मूळचा लेख इथे देत आहे.
‘ट्रॉली प्रॉब्लेम’ हा नैतिकशास्त्रातले एक उदाहरण किंवा संकल्पना आहे. तुमच्याकडे तर एक कृती करण्याची किंवा न करण्याची निवड आहे. केली तर ५ व्यक्ती वाचणार आणि १ मरणार आणि नाही केली तर १ वाचणार आणि ५ मरणार. तर तुम्ही कृती करणार का नाही हा तो ट्रॉली प्रॉब्लेम. हा प्रश्न तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तर अशी बरीच शक्यता आहे कि तुम्ही कृती करण्याची निवड केली असेल. कारण १ व्यक्ती मरणे हे ५ व्यक्ती मरण्यापेक्षा बरे. ट्रॉली प्रॉब्लेमच्या अनुषंगाने आपल्याला मानवी वर्तनातील एक महत्वाची विसंगती दिसते. आपण आपल्या मनात आपल्या कुटुंबाच्या बाहेरील लोकांचे मूल्यमापन करताना संख्येने प्रभावित होत असतो. जितके जास्त लोकांचे नुकसान तितके ते अधिक लक्षवेधक ठरते. २५ जण मृत्युमुखी पडलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर ही विसंगती आणि आपल्या काळाचा व्यवच्छेदक असा वेगविकार दिसून आलेला आहे.
अपघातातील बळींचा आकडा मोठा आहे ह्यामुळे त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियाही जास्त आहेत. पण असं म्हटलं तर असं म्हणणाऱ्यालाच लोक अपघाताचे गांभीर्य कमी करणारा म्हणतील. ह्या अपघाताने आपले जेवढे लक्ष वेधले त्याच्या १/१२ पट लक्ष मुंबईत बस आणि रिक्षा ह्यांच्या धडकेत मरण पावलेल्या २ जणांकडे गेले का? उत्तर -नाही. ही घटनाच अनेकांना माहिती नसेल. जर आपण साऱ्याच अपघातांकडे समन्यायी दृष्टीने पाहत असू तर असं घडायला नको.
आपल्यातले बहुतेकजण असे समन्यायी नाही. प्रक्षुब्ध होणं, भावनांचा कल्लोळ होणं हे स्वाभाविक मानवी वागणं आहे. समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या तपशिलाने तुम्ही- मी असेच प्रक्षुब्ध झालो आहोत. आणि ह्या भावनांच्या वावटळीत समृद्धी महामार्गाची ओळख ही जास्त वेगाने वाहन चालवू देणारा रस्ता अशी असल्याने ह्या जास्त वेगावर, जास्त वेगाने वाहन चालवणे शक्य असलेल्या रस्त्यावर, हा रस्ता ज्या राजकीय नेतृत्वाचे कर्तृत्व मानला जातो त्यावर वेगाने दोषारोप होत आहेत. विरोधाभास हा आहे कि ज्या वेगाच्या वेडावर हे दोषारोप होत आहेत ते वेगाचे वेडच विसंगत प्रतिक्रियांच्या पाठी आहे.
काही उदाहरणे पाहू. लोकसत्तामधील १ जुलै २०२३ चा ‘मृत्यूचा समृद्ध महामार्ग’ हा लेख. ह्या लेखात दोन विधाने आहेत. एक – समृद्धी महामार्गावर अपघात आणि मृत्यू होण्याची शक्यता अन्य रस्त्यांपेक्षा जास्त आहे. दोन – रस्त्याच्या बांधणीमुळे उद्भवणारे महामार्ग संमोहन हे अपघातांचे कारण आहे. २ जुलै २०२३ च्या अनेक वृत्तपत्रांचे मथळे हे समृद्धी महामार्ग हा विशेष अपघातप्रवण आहे असे सूचित करणारे आहेत. त्यासाठी मागच्या ६ महिन्यातील अपघातांचा आकडा वापरला जात आहे.
समृद्धी महामार्गावरील वाहतुकीचा एकूण वाहतुकीतील हिस्सा हा जर समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या एकूण अपघातातील हिस्सा यापेक्षा कमी असेल तर समृद्धी महामार्ग हा अन्य रस्त्यांपेक्षा अधिक अपघातप्रवण आहे असं म्हणता येईल. अशी माहिती उपलब्ध करता येऊ शकते पण त्यातून काही गैरसोयीचे बाहेर येईल म्हणून केली जात नाही. एकूण आकडेवारीशी तुलना केल्याशिवाय समृद्धी महामार्ग हा अधिक धोक्याचा किंवा अधिक सुरक्षित आहे असं म्हणताच येणार नाही.
योग्य तुलनेशिवाय आकडेवारी कशी फसवी असते ह्याचं एक उदाहरण देतो. २०२१ साली राष्ट्रीय महामार्गांवर झालेले अपघाती मृत्यू हे एकूण देशातील रस्त्यांवर झालेल्या अपघाती मृत्यूंच्या ३६% होते. राज्य महामार्गांचा वाटा होता २५% आणि उरलेले ३९% हे अन्य रस्त्यांवरचे होते. म्हणजे अन्य रस्ते हे सर्वाधिक घातक आणि राज्य महामार्ग हे सर्वाधिक सुरक्षित ठरतात का? तर नाही. कारण एकूण उपलब्ध रस्त्यांत (road length) राष्ट्रीय महामार्गांचा वाटा आहे २%, राज्य महामार्गांचा ३% आणि अन्य रस्त्यांचा ९५%. जर रस्त्याची उपलब्धता ही रस्त्याच्या वापराच्या प्रमाणात असते असं धरलं तर राष्ट्रीय महामार्गावर अपघाती मृत्यूची शक्यता सर्वाधिक आहे, त्याखालोखाल राज्य महामार्गांवर आणि मग अन्य रस्त्यांवर.
उपलब्ध आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ३३७०५ किमी लांबीचे राज्य महामार्ग आहेत आणि १८३१७ किमीचे राष्ट्रीय महामार्ग. समृद्धी महामार्गाची लांबी ७०१ किमी आहे ज्यांतील ६०० किमी वापरायला उपलब्ध आहे. म्हणजे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांच्या लांबीच्या १.१% आहे. समृद्धी महामार्गावरील वाहतूक ही एकूण महाराष्ट्र राज्य महामार्गावरील वाहतुकीच्या १.१% आहे असं मानू. उपलब्ध आकडेवारीतील अद्ययावत २०२१ सालच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात झालेल्या रस्त्यांवरील अपघाती मृत्यूंपैकी ५५% मृत्यू हे राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर झाले. २०२२ साली महाराष्ट्रात १५२२४ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. २०२३ सालीही इतकेच मृत्यू होऊ शकतात, त्यात राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांचे प्रमाण २०२१ सारखे असेल, आणि पहिल्या ६ महिन्यात एकूण मृत्यूंच्या ५०% मृत्यू घडतील अशा गृहीतकांसह २०२३ च्या पहिल्या ६ महिन्यात महाराष्ट्रात राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर घडलेल्या अपघाती मृत्यूंचा अंदाजआकडा आहे ४२१५. समृद्धी महामार्गावर ह्याच ६ महिन्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती आहेत ८८. हे प्रमाण २०२३ च्या पहिल्या ६ महिन्यात महाराष्ट्रात राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर घडलेल्या अपघाती मृत्यूंच्या २.१% आहे. म्हणजे समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यूची शक्यता ही महाराष्ट्रातील उर्वरित राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांच्या तुलनेत साधारण ८३% जास्त आहे.
असाच ताळेबंद जर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या २०२२ सालच्या आकडेवारीचा मांडला तर तिथे अपघाती मृत्यूची शक्यता ही महाराष्ट्रातील उर्वरित राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांच्या तुलनेत १०३% ने जास्त आहे. (अपघाती मृत्यू ३१ आणि रस्त्याची लांबी ९४.५ किमी) इथे लक्षात घेण्याची बाब ही आहे कि २०२२ साली मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेले मृत्यू हे आधीच्या वर्षांहून कमी होते.
थोडक्यात जर समृद्धी मृत्यूचा समृद्ध महामार्ग असेल तर मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मागची अनेक वर्षे आणि बहुदा आजही त्याहून अधिक मृत्यूसमृद्ध आहे. पण मुंबई-पुणे एक्सप्रेसवेबाबत अशी भयशब्दांची कारंजी उडताना दिसत नाहीत. कारण आपल्याला विसंगत वागायला भाग पाडणारी मृत्यूच्या आकड्यांची संख्या आपल्याला मिळालेली नाही. जिथे अधिक वेग शक्य आहे असे रस्ते हे तुलनात्मक दृष्ट्या जास्त धोकादायक आहेत हे वास्तव आहे, पण समृद्धी महामार्ग त्याहून विशेष धोकादायक आहे, त्यापाठी रस्त्याच्या बांधणीतील वैशिष्ट्ये आहेत असं म्हणायला वाव नाही.
अर्थात हे काही समृद्धी महामार्ग किंवा एक्सप्रेसवे ह्यांना दिलेले प्रमाणपत्र नाही किंवा वेग हवा तर काही जीव तर जाणारच असे समर्थनही नाही. मुळांत महामार्गांना त्यांचे समर्थक जी प्रमाणपत्रे देत असतात तीही त्यांच्या विसंगतीची समृद्धीच दाखवत असतात.
रस्ते हे विकासाचे साधन आहे, प्रत्यक्ष विकास नाही. जोवर एखाद्या प्रकल्पातून शाश्वत, प्रकल्पाचे बाधित आणि लाभार्थी ह्यांना प्रतिष्ठापूर्ण फायदे होत नाहीत तोवर त्या प्रकल्पाला यशस्वी म्हणता येणार नाही. केवळ खर्चाहून अंदाजित फायदे जास्त म्हणून प्रकल्पाच्या बारश्यालाच त्याला थोर म्हणून गौरवायची घाई हाही आकडेवारीच्या चूक आणि वेगवान वापराचाच भाग आहे.
दुसरं असं कि रस्ते आणि विकास ह्यांच्यातील संबंध हा मालवाहतुकीशी जास्त आहे आणि व्यक्तीवाहतुकीशी कमी. पण भारतातील रस्त्यांच्या वेगाची टिमकी वाजवताना नेमकी उलटी वाजवली जाते. आकृती १ मध्ये ज्या देशांतील रस्त्यांवरील प्रवासी आणि मालवाहतुकीची माहिती उपलब्ध आहे त्यांच्या दर किमी दशलक्ष टन वाहतूक आणि दर किमी दशलक्ष प्रवासी ह्यांचे गुणोत्तर आहे. एका किलोमीटरला एका प्रवाश्यामागे किती टन मालवाहतूक होते हे ह्या गुणोत्तराने दिसते.
![]() |
आकृती १ (माहितीचा स्त्रोत: OECD) |
जितके हे गुणोत्तर लहान तितका प्रवाश्यांचा रस्ते वापरातला हिस्सा जास्त. आकृती १ मध्ये हे स्पष्ट आहे कि भारतात हे गुणोत्तर कमी आहे. हे गुणोत्तर ढोबळ आहे. प्रत्येक देशांतील भौगोलिक वैशिष्ट्ये, सार्वजनिक प्रवासी वाहतूकीची उपलब्धी, महानगरीकरण अशा अनेक घटकांचा प्रवासी रस्ते वाहतूकीवर परिणाम होतो. त्यामुळे भारताची तुलना प्रत्येक देशाशी होईलच असे नाही. पण अमेरिकेशी तुलना अप्रस्तुत ठरणार नाही. रस्ते आणि आर्थिक प्रगती ह्या संबंधात अमेरिकेचे उदाहरण नावाजले जाते. अमेरिकेत प्रवाश्यांची वाहतूक ही प्रामुख्याने खाजगी वाहनांनी होते. मोठा भूभाग आणि आणि खाजगी वाहनांचा मोठा वापर असे असणाऱ्या अमेरिकेत हे गुणोत्तर ०.४५ म्हणजे भारताच्या जवळपास चारपट आहे.
महामार्गाचे समर्थन करू पाहणाऱ्याला खाजगी वाहनातील वाहतुकीचा अनुभव किती रोमहर्षक होता, किती वेळ वाचला हे सांगून उपयोग नाही. खाजगी वाहनातील वाचलेला वेळ हा अतिरिक्त टोल किंवा खाजगी नफा म्हणून जमा होतो. ह्या वाचलेल्या वेळासाठी जादा खर्च करणारा मनुष्य प्रवासातील बाकी खर्च कमी करतो. त्याच्या स्वतःच्या उत्पन्नात वेगवान प्रवासाने विशेष भर पडत नाही. अशा प्रवासांतून अर्थचक्राला मिळणारी गती (अधिक खर्च, अधिक नोकऱ्या) ही मालवाहतुकीच्या वाचलेल्या वेळाने होणाऱ्या फायद्यातून अर्थचक्राला मिळणाऱ्या गतीहून कमी असते. समृद्धी महामार्गाचे किंवा कोणत्याही महामार्गाचे कौतुक करायचे असेल, त्यातून होणाऱ्या तथाकथित आर्थिक प्रगतीच्या मोठ्या रेषेला वापरून अपघातांचा धोका जास्त असल्याची लाल रेषा खुजी करायची असेल तर त्यातून मालवाहतुकीला आणि उत्पादनाला किती चालना मिळाली आहे हे दाखवायला लागेल.
ही विस्तारात जाणारी मांडणी म्हणजे अपघाताचे गांभीर्य कमी करण्याचा किंवा अपघात केवळ एक सांख्यिकीय रँडम घटना आहे, त्यात कोणी व्हिलन नाही असे दाखवायचा प्रयत्न नाही. व्हिलन शोधायचा असेल तर तो रस्ताच्या अपघातांच्या आकडेवारीत किंवा बांधणीत आहे अशी वेगवान विसंगत विधाने करून मिळणार नाही. हा व्हिलन शोधायचा असेल तर व्यवसायाचा फायदा वाढावा म्हणून ड्रायव्हरना अधिक काम करायला लावणारे, वाहनांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणारे न-नैतिक भांडवल, पुरेसे पैसे मिळावेत म्हणून आपल्या किमान शारीरिक गरजा, धोके दुर्लक्षून काम करू पाहणारी माणसाची अप्रतिष्ठा, आणि रस्ते, वेग, लांब अंतरांचे प्रवास हे नेमके कशासाठी असे उसंत मागणारे प्रश्न टाळून वेग हाच विकास मानण्याची आपली आधुनिक अंधश्रद्धा ह्यांच्यात शोधायला लागेल.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा