श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

विसंगत प्राणीदयेची समस्या

 २६ जून २०२३ च्या लोकसत्ता मध्ये भटक्या कुत्र्यांच्या समस्येबद्दल विश्लेषणात्मक लेख आहे. लेखातला गोंधळात टाकणारा प्रकार म्हणजे भारतात प्रचंड प्रमाणात कुत्र्यांचे अवांछित चावे ही समस्या सुरुवातीला मांडून पुढे हे चावे ही माणसांचीच कशी चूक आहे हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे भटके कुत्रे नव्हे तर राहती माणसे हीच समस्या असा तो लेख होतो. अर्थात प्राणीमित्र नावाच्या प्रजातीचा दृष्टीकोन प्रातिनिधिकदृष्ट्‍या मांडणारा लेख असं पाहिलं तर ही विसंगती नसून गुणधर्म आहे हे लक्षात येतं. (पण हा वोक लेख नाही हा. असा आळ येऊ नये म्हणून सुरुवातीलाच सरमाच्या उल्लेखाची तीट लावलेली आहे.)


मुळात भटक्या कुत्र्यांची समस्या नाही. समस्या त्यांच्याबद्दल चुकीचे धोरण असण्याची आहे. भटके कुत्रे रस्त्यावर नसणे हेच सामाजिक धोरणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. त्यामुळे भटक्या कुत्र्‍यांना त्यांच्यासाठी चालवण्यात येणाऱ्या shelters दाखल करणे आणि तिथे स्वयंसेवी संस्थांनी त्यांची काळजी घेणे, shelters मधील पात्र प्राणी हे ज्यांना प्राणी पाळायचे आहेत त्यांनी आपल्या घरी नेणे, आणि जे भटके कुत्रे shelters मध्ये राहू शकत नाहीत अशांना मारून टाकणे हेच धोरण राबवायला हवे. 

भटक्या कुत्र्यांना मारणे ह्या कल्पनेने, त्यातील हिंसेने अनेकांना हा पर्याय नकोसा वाटू शकतो. पण आपल्या हळव्या आवेगांवर धोरणे बनवणे ही चूक आहे. भटक्या कुत्र्यांना मारणे हे तितकेच क्रूर आहे जितके आपल्या चवीच्या हव्यासासाठी प्राण्यांना मारणे आहे. आणि आपल्या आनंदासाठी त्यांना पाळणे ही केवळ एक पायरी खालची क्रूरता आहे. आपल्याला आवडो अथवा न आवडो, माणसाची समृद्धी ही आपण कोणत्या गोष्टींना महत्व द्यायचे त्या उतरंडीमध्ये सर्वात वरती आहे आणि प्राण्यांचे हित त्याखाली. त्यामुळे आपल्या हितासाठी, म्हणजे सुखासाठी किंवा भौतिक फायद्यासाठी,  प्राणी वापरणं हेच आपले धोरण आहे. 


मग आपल्यातील काही जणांना भटक्या कुत्र्यांसाठी ममता आहे, तिची स्पेस काय? तर अर्थात अशा ठिकाणी जिथे त्यांची ममता ही इतरांसाठी त्रास बनत नाही. तुम्हाला तुम्ही खाऊ घालत असलेल्या कुत्र्याचे गुरगुरणे, बागडणे सुखावह वाटले तरी आजूबाजूच्या नागरिकाला ते भीतीदायक वाटू शकते, आणि त्यातून कुत्र्यांपासून बचाव करताना तोल जाणे, पडणे, किंवा कुत्र्याकडून चावा घेतला जाणे हे घडू शकते. त्यामुळे ज्यांना ही ममता दाखवायची आहे त्यांनी ती रस्त्याच्या कडेला, इमारतीतील किंवा सार्वजनिक ठिकाणातील कॉमन स्पेस तिथे न दाखवता स्वतःच्या खाजगी स्पेसमध्ये किंवा शेल्टर्समध्ये दाखवावी. हा सिनीसिझम नाही, तर शहाणपण आहे. माझ्या कृतीने अन्य कोणालाही भौतिक हानी होऊ शकत नाही ह्या मर्यादेतच आपल्याला कृतीचे स्वातंत्र्य आहे हे ते शहाणपण.   


भटके कुत्रे आणि एकूणच प्राण्यांबद्दलचे आपले धोरण हे विसंगतीने भरलेले आहे. ‘करुणा किंवा भूतदया’ हे तत्व अत्यंत चुकीच्या पद्धतीने अंमलात आणणे हेही ह्या प्रश्नात भर घालते. करुणा किंवा भूतदया हे passive रित्या आचरणात आणण्याचे मूल्य आहे. म्हणजे तुमच्या समोर एखादा प्राणी आला ज्याला तुम्ही मारू शकता तेव्हा तुम्हाला करुणेची निवड करायची आहे. किंवा तुमच्या हातात काही खायला आहे आणि तुमच्यासमोर कोणी प्राणी आला तर त्याला ते द्यायचे आहे. खाऊ घालण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी संस्थात्मक सामूहिक प्रयत्न हे राजकारण किंवा मनोरंजन आहे, करुणा नाही, दया नाही. सध्या समाजात असणारी, कबुतरांना दाणे घालणारी करुणा हा उपयुक्ततावादी प्रकार आहे. पुण्य मिळवण्यासाठी लागणारी गुंतवणूक असा प्रकार. दाणे खाऊन जगणाऱ्या कबुतरांनी इतरांना होणारा श्वसनाचा त्रासाचे पाप वजा करूनच कबुतरांना दाणे घालण्याचे पुण्य पकडले पाहिजे. भटक्या कुत्र्‍यांच्या बाबतीत तर भोंदूपणा जास्त आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे ते सार्वजनिक जागेतच करू पाहतात. होईल तेवढे भटके कुत्रे मी माझ्या घरात ठेवेन असे म्हणणारे प्राणीमित्र दुर्मिळ.. 


एकूण समस्येत भटके कुत्रे हा विषय मोठा असला तरी पाळीव कुत्रे हाही आहेच. आक्रमक पाळीव कुत्रे अनेकांना त्रास देतात. अर्थात आक्रमक पाळीव कुत्रे हा स्टेटस सिम्बॉल आहे आणि एकूणच थोर होणां म्हणजे इतरांना आपल्यासाठी त्रास भोगायला लावणं हे असल्याने अशा आक्रमक पाळीव कुत्र्यांना समर्थाघरचे श्वान म्हणून सहन करणे ह्यापलिकडे पर्याय नसतो.  


भटक्या कुत्र्यांची समस्या एकदम आली कुठून? म्हणजे कोव्हिडपूर्व काळापेक्षा जास्त प्रमाणात ही समस्या जाणवत आहे. कोव्हिडमुळे आपल्या सामाजिक वर्तनात जो एक पॉज आला त्यात माणूस-कुत्रा संबंधांचा equilibrium बदलला असावा. कुत्र्यांसाठी हा Malthusian प्रकार झाला. कोव्हीड निर्बंध सुरु झाल्यापासून भटक्या कुत्र्यांसाठी अन्नाची चणचण निर्माण झाली. त्यामुळे त्यांची संख्या घटली आणि त्यांच्यातील स्पर्धा वाढली. निर्बंधांच्यानंतर भटके कुत्रे कमी आणि उपलब्ध अन्न जास्त अशी अवस्था निर्माण झाल्याने भटकी कुत्री झपाट्याने वाढत आहेत. ह्या एक-दीड वर्षांत कुत्र्यांचीही अशी पिढी निर्माण झाली तिला माणसांचे exposure कमी होते. त्यामुळे आपण सध्या वेगाने वाढणारी कुत्र्यांची लोकसंख्या आणि त्यातही आक्रमक कुत्री अशा पेचात आहोत. अर्थात हा एक ढोबळ हायपोथेसिस आहे. 

 

 फूड स्टॉल हा प्रकार वाढल्याने, त्यातही मासे आणि मांस ह्यांची रस्त्याच्या लगतची विक्री वाढल्याने भटक्या कुत्र्यांना अन्नाचे मोठे स्रोत निर्माण झालेले आहेत. हे स्टॉल्स त्यांचे उरले सुरले अन्न रस्त्याच्या कडेला टाकतात किंवा थेटच कुत्र्यांना खाऊ घालतात.  हा हायपोथेसिस नाही, हे व्यक्तिगत निरीक्षण आहे. कुत्र्यांची समस्या असो वा नसो, फूड स्टॉल्स आणि रस्त्याच्या कडेला होणारी मांस-मासे विक्री ह्यासाठी धोरणाची गरज आहे ह्यात वाद नाही. कचऱ्याची समस्या आणि नागरी वाहतुकीला अडथळा ह्या दोन बाबींसाठी ही धोरणाची गरज आहे.     


भटक्या कुत्र्यांचा उपद्रव ही बाब आर्थिक वर्गाशी निगडित आहे. रस्त्यावर चालणे किंवा दुचाकी चालवणे  ही बाब उत्पन्नाच्या व्यस्त प्रमाणात घडते. साहजिकच भटक्या कुत्र्यांची दहशतही उत्पन्नाच्या व्यस्त प्रमाणात लागू होते. ह्याचा परिणाम म्हणजे भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाला सामाजिक उपद्रव मूल्य असणाऱ्या लोकांचा पाठिंबा नसतो. सायरस मिस्त्री ह्यांच्या मृत्यूनंतर साऱ्या शहरावर सीट बेल्ट नियम लागू करण्याचा प्रयत्न होतो. भटके कुत्रे अशा कोणा धनाढ्याला हानी करत नाहीत तोवर त्यांना सहन करणं आणि त्यांचा बचाव करणाऱ्या विसंगत प्राणीमित्रांना सहन करणं हे करावंच लागणार.  


भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबाबत काही सीरियस लिखाण हवं असेल तर - इथे आणि इथे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

कसबा पेठ पोटनिवडणूक: मत न देऊन अवलक्षण?