श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

कोव्हीड-१९ च्या रुग्णवाढीची दुसरी लाट - काही शक्यता

 मुंबई महानगर परिसर (MMR) मध्ये रुग्णवाढीची दुसरी लाट स्पष्ट आहे. मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा अशी सर्वत्र ही लाट आहे. (आकृती-१)

आकृती-१ 

मुंबईत मागच्या जवळपास महिन्याभरापासून उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. ठाणे जिल्ह्यात साधारण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. पण खरंतर ऑगस्टच्या मध्यापासून रुग्णसंख्या कमी होत नाही हे दिसत होतं. 
ही दुसऱ्या लाटेतील वाढती रुग्णसंख्या अधिक गंभीर आहे. शासनाने कोव्हीड-१९ च्या रुग्णांबाबतचा प्रोटोकॉल आता फारच गाफील ठेवलेला आहे. आपल्याला आठवत असेल तर सुरुवातीला RT-PCR चाचणी positive येणारा जवळपास प्रत्येक रुग्ण हा रुग्णालयात दाखल होत होता. आता home-quarantine ही आपली उपचाराची प्रमुख पद्धत बनलेली आहे आणि केवळ गंभीर रुग्णांनाच रुग्णालयात नेलं जात नाही. रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्याचा वेगही वाढलेला आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढती रुग्णसंख्या किंवा/आणि रुग्णांमधील गंभीर रुग्णांचे वाढते प्रमाण दर्शवते. 
रुग्णांची वाढती संख्या हा कोव्हीड-१९ च्या धोक्याचा अपुरा निर्देशक आहे. कोव्हीड-१९ च्या धोक्याचा निर्देशक म्हणजे आपल्या कोव्हिड-१९ साठी असलेल्या आरोग्यसुविधेतील किती क्षमता वापरली गेलेली आहे. दुर्दैवाने आरोग्यसुविधेबाबतची माहिती केसेसच्या माहितीइतकी झपाट्याने अद्ययावत होत नाही. मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीपासून ह्याबद्दल माहिती दिलेली आहे. (लिंक) पण बाकी महानगरे, शहरे ह्याबाबतीत ढिली आहेत. 

मुंबईत ८ सप्टेंबर २०२० ला जी स्थिती होती त्यानुसार मुंबईत गंभीर रुग्णांसाठी असलेली क्षमता (ICU आणि ventilator)   झपाट्याने संपत आहे. ऑक्सिजन बेडची क्षमता ही बऱ्यापैकी शिल्लक आहे आणि खाटांची क्षमता देखील. म्हणजे जर गंभीर केसेस झपाट्याने वाढल्या नाहीत तर मुंबईत कोव्हीड-१९ केसेसला तोंड देण्याची क्षमता आहे. 
मुंबई महानगर परिसरातील अन्य महानगरपालिकांची काय अवस्था ह्याची माहिती सहजी उपलब्ध नाही. मी स्वतः ज्या महानगरपालिका क्षेत्रात, कल्याण-डोंबिवली, राहतो तेथील माहिती मी गोळा केली आहे.  कल्याण-डोंबिवली हे १५ लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्येचे शहर आहे. आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कोव्हीड-१९ महामारीच्या सुरुवातीपासून केसेसची ढोबळ माहिती व्यवस्थित देत आहे आणि मुख्य म्हणजे त्या माहितीत, विशेषतः मृत्यूच्या संख्येत एकदम मोठी रिव्हिजन झालेली नाही. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई ह्या शहरांत अशी रिव्हिजन झालेली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली हे कोव्हीड-१९ च्या शहरी भागातील प्रसाराची समज वाढवायला चांगले उदाहरण आहे. 
 कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ३१ ऑगस्ट २०२० ला १६०१ कोव्हीड-१९ साठीचे बेड्स होते, ज्यांत ८७१ हे ऑक्सिजन बेड्स, ३०१ ICU आणि १०७ हे ventilator असलेले आहेत. एक साधी तुलना देतो.  १६ जुलै २०२० ला , म्हणजे कोव्हीड-१९ च्या पहिल्या लाटेच्या अत्युच्च टोकाच्या जवळपास असताना कल्याण-डोंबिवलीमध्ये ६२५४ रुग्ण होते आणि १०२२ बेड्स होते, ज्यांत ४९१ ऑक्सिजन बेड्स, २०९ ICU आणि ७५ ventilators होते. ११ सप्टेंबर २०२०, जो ह्या लिखाणाच्या आदल्या दिवशी, कल्याण-डोंबिवलीमध्ये ५०३५ रुग्ण आहेत. 
मुंबईत १० सप्टेंबर २०२० चा जो डेटा उपलब्ध आहे त्यानुसार २६९८० रुग्ण होते, ज्यांतील ८४२८ हे रुग्णालयांत दाखल होते. हे साधारण ३१% प्रमाण येते. हेच प्रमाण कल्याण-डोंबिवलीला लावले तर ११ सप्टेंबर २०२० ला कल्याण-डोंबिवलीत रुग्णालयात दाखल रुग्ण येतात ते म्हणजे १५७३. हा आकडा उपलब्ध क्षमतेच्या (१६०१) फारच जवळ जाणारा आहे. मला स्वतःला वाटतं त्यानुसार कल्याण-डोंबिवलीत उपलब्ध बेड थोडे जास्त असावेत कारण कल्याणातील काही रुग्ण हे मुंबईत उपचार घेत असण्याची शक्यता आहे. पण तरीही उपलब्ध क्षमतेवर लवकरच ताण येऊ लागेल अशी चिन्हे आहेत. दुसरी शक्यता अशी आहे कि कल्याण-डोंबिवलीमध्ये होम आयसोलेशन अधिक वापरले जाते आणि त्यामुळे केवळ जास्त गंभीर रुग्णच इस्पितळात दाखल होत आहेत. तसे असेल तर कदाचित उपलब्ध क्षमता जास्त असेल. पण त्याने शब्दशः आजचे मरण काही दिवस पुढे ढकलले जाणार आहे. बाकी महानगरपालिकांत थोड्याफार फरकाने अशीच स्थिती असण्याची शक्यता आहे. 

आकृती २


महानगरपालिका किती बेड्स शिल्लक आहेत ही माहिती देत नसेल तर आपल्याला कोव्हीड-१९ ची अवस्था किती वाईट होते आहे हे कळायचा मार्ग म्हणजे कोव्हीड-१९ मुळे होणाऱ्या मृत्यूंची माहिती. कोव्हीड-१९ मुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत (ह्यांत किती लपवले जातात वगैरे चव्हाट्यावरील गप्पांत पडण्याचे कारण नाही. जो डेटा आहे तो खरा मानून मी माझे म्हणणे मांडतो आहे.) दोन बाबी आहे, एक कमी वाईट आणि एक जास्त वाईट. कमी वाईट बाब म्हणजे कल्याण-डोंबिवलीत कोव्हीड-१९ च्या निकाल लागणाऱ्या केसेस मधील मृत्यूदर  २.४ % च्या आसपास येऊन स्थिरावलेला आहे. (आकृती २)  निकाल लागणाऱ्या केसेस = डिस्चार्ज+मृत्यू. मोठ्या शहरांच्या तुलनेत हा किमान मृत्यूदराच्या जवळ आहे. (चेन्नईमध्ये २% हून कमी आहे.) 
पण मृत्यूदर स्थिरावला असेल तर जश्या केसेस वाढतील तसे होणारे मृत्यूही वाढतील. आणि असं होईल असे संकेत तरी दिसत आहेत. (आकृती ३) 
आकृती ३ 
 आकृती ३ जरा काळजीपूर्वक पाहायला हवी. त्यात निळ्या रंगाचा आलेख आहे तो दररोजच्या केसेसचा आहे आणि नारिंगी आहे तो दररोजच्या मृत्यूंचा. नारिंगी रंगाच्या आलेखाची स्केल उजवीकडे आहे ०- ११ वाली. त्यामुळे नारिंगी आलेख निळ्याच्या वर दिसला तरी त्याचा अर्थ केसेसपेक्षा मृत्यू जास्त असा नाही. ही आकृती-३ आपल्याला हे दाखवते कि मृत्यूंचा आलेख का केसेसच्या आलेखासाखाच वरखाली जातो, पण काही दिवसांच्या उशिराने. दररोजच्या केसेसमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीपासून दिसणारा चढता आलेख काही दिवसांनी मृत्यूंच्या संख्येतही दिसेल अशीच शक्यता आहे ही जास्त वाईट बाब. 

ही दुसरी लाट येते आहे तिच्यासोबत दोन महत्वाचे प्रश्नही आहेत. 
  1. ही लाट थोपवायचा उपाय काय? 
  2. अशा अजून किती लाटा येणार? 
ह्यातल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तर आपल्याला माहित आहे: लॉकडाऊन. आकृती-१ मध्ये हे स्पष्ट दिसतं आहे कि ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या महानगरपालिकानी जुलै महिन्यात राबवलेल्या स्थानिक लॉकडाऊनमुळे तेथील पहिली लाट ओसरली. लॉकडाऊन अयशस्वी ठरतो म्हणून तो सरकारला नको आहे असं नाही, लॉकडाऊनची आर्थिक किंमत आणि त्यातून येऊ शकणारे दूरगामी परिणाम (रिसेशन आणि anti-incumbency) म्हणून सरकारला लॉकडाऊन नको आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या काहीही ताकद नसलेल्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांवरच लॉकडाऊनची जबाबदारी आहे, राज्य आणि केंद्र सरकारने ती जवळपास सोडलेली आहे. IAS ऑफिसरला निवडून यायचे टेन्शन नाही त्यामुळे तो लॉकडाऊनचा निर्णय केसेस आणि बेड्स नुसार घेतो. ही चांगलीच बाब आहे. डिसिजन मेकिंग ही त्या डिसिजनने प्रभावित लोकांच्या जितकी जवळ तितकी ती लोकांच्या दुःखाला अधिक प्रामाणिक प्रतिसाद देईल अशी शक्यता असते. 
लॉकडाऊनला पर्याय आहे तो आरोग्य सुविधा वाढवायचा. पण आरोग्यसुविधा वाढवणं हे वेळखाऊ काम आहे. हे मान्य करावं लागेल कि सरकारने कोव्हीड-१९ साठी उपलब्ध रिसोर्सेस हे वाढत्या प्रमाणात ठेवलेले आहेत. पण हे रिसोर्सेस वाढायचा वेग हा अनेकदा केसेस वाढायच्या वेगापेक्षा कमी पडतो. अशावेळेला लॉकडाऊनला पर्याय नाही. 
माझ्या स्वतःच्या अंदाजाने मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिकांना लॉकडाऊनचा वापर करण्याची वेळ लवकरच येऊ शकते. लक्षात घेण्याची बाब ही आहे कि मुंबई शहरातील ऑफिसेस ३०% क्षमतेने सुरू झाली असताना ही लॉकडाऊन झाली तर होणार आहेत. लॉकडाऊन असणाऱ्या शहरातील अनेक लोक हे नोकरीला जाणार आहेत आणि विषाणू संक्रमण करणार आहेत. त्यामुळे ही येऊ घातलेली नवी लॉकडाऊन कमी प्रभावशाली ठरतील अशी शक्यता आहे. 
लॉकडाऊन कधी लागू शकेल ह्याबाबत काही ढोबळ ताळा मांडता येईल. कल्याण-डोंबिवलीत ३० जून २०२० ला स्थानिक लॉकडाऊन-१ लागू झालं. तेव्हा active केसेस होत्या ४११२ आणि उपलब्ध बेड्स होते ६६२!  १३ सप्टेंबरला ५२६९ active रुग्ण असूनही लॉकडाऊन आलेले नाही, कारण उपलब्ध बेड्स आहेत १६०१! केवळ गुणोत्तर पाहायचे म्हटले तर १०००० active रुग्ण होईपर्यंत लॉकडाऊन येणार नाही. ६ सप्टेंबर २०२० ते १३ सप्टेंबर २०२० ह्या १ आठवड्यात १५०० active रुग्ण वाढलेले आहेत. अशा वेगाने २७-३० सप्टेंबरपर्यंत हा आकडा ९५०० च्या आसपास जाऊ शकतो. म्हणजे सप्टेंबरच्या शेवटाला स्थानिक लॉकडाऊन-२ लावणे गरजेचे होईल, खरेतर आधीच. कारण बेड्स जरी २४०% ने वाढले असले तरी Ventilators and ICU हे (१००%) म्वाहणजे दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे गंभीर पेशंटना बेड्सची चणचण बरीच आधीच जाणवू शकते. त्यात भरीस भर म्हणजे ऑक्सिजन पुरवठा कमी असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे २० सप्टेंबरच्या आसपास ते ३० सप्टेंबर ह्यांत कधीही लॉकडाऊन येण्याची शक्यता आहे, पण जर उपलब्ध बेड्स वाढले तर लॉकडाऊनची शक्यता पुढे ढकलली जाईल. 
लॉकडाऊन अप्रिय तर सर्वाना आहे, कारण तो आपल्या स्वातंत्र्यावर आलेला निर्बंध आहे. पण आजच्या घडीला समाज म्हणून आपल्याकडे तोच खात्रीलायक उपाय आहे. 

अशा किती लाटा? ह्याची दोन उत्तरे आहेत. एक सैद्धांतिक उत्तर म्हणजे लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन पोचले कि आपोआप ह्या लाटा बंद होणार. शास्त्रज्ञांच्या मते ६०-६५% लोकसंख्येपर्यंत विषाणू पोचला कि ही विषाणू प्रसार सावकाश व्हायची स्वाभाविक अवस्था (हर्ड इम्युनिटी) यावी. 
जुलै महिन्यांत झालेल्या अनेक Sero-survey नुसार मुंबई, दिल्ली ह्या शहरांत २५% लोकांपर्यंत विषाणू पोचला असावा असा अंदाज होता. ह्या आधीच्या सर्व्हेच्या वेळेला मुंबईत केसेस होत्या सुमारे ९०००० आणि सर्व्हेच्या अंदाजानुसार, त्या वेळेला स्थलांतरित मजदूर वगळून मुंबईत १ कोटी लोक होते मानलं तर २५ लाख लोकांपर्यंत विषाणू पोचलेला होता आणि केसेस आणि विषाणूप्रसार हे गुणोत्तर होतं अंदाजे १:२५. आज सुमारे २ महिन्यांनी मुंबईत १६५००० केसेस झालेल्या आहेत. पण टेस्टिंग हे तेव्हापेक्षा आजच्या घडीला बरं उपलब्ध आहे. त्यामुळे १:२५ ह्या त्यावेळच्या गुणोत्तरापेक्षा कदाचित आज १:२० हे गुणोत्तर पकडावे लागेल. म्हणजे ३३ लाख लोकांपर्यंत विषाणू गेलेला आहे, म्हणजे ३३%. पण ३० जून २०२० पेक्षा मुंबईची आजची लोकसंख्या जास्तही असू शकते, कारण लोक गावावरून परतत आहेत. ढोबळमानाने ३०% मानू. म्हणजे अजून निम्मा रस्ता बाकी आहे, निम्म्या लाटाही बाकी असाव्यात. 
भारतासाठी ICMR केलेल्या सर्व्हेनुसार १ जून २०२० पर्यंत ६५ लाख भारतीयांना विषाणूबाधा झाली असावी असा अंदाज आहे. १ जून २०२० ला भारतात केसेस होत्या २ लाख म्हणजे गुणोत्तर झाले साधारण १:३२. १३ सप्टेंबर २०२० ला भारतात केसेस आहेत सुमारे ४८ लाख. ह्या कालावधीत टेस्टिंग ही वाढलेले आहे. त्यामुळे १:२५ गुणोत्तराने पाहिले तर १२ करोड भारतीय विषाणूग्रस्त होऊन गेलेले आहेत. केवळ प्रौढ (१८+) लोकसंख्येचाच जरी विचार केला, जी लोकसंखेच्या ५५% असावी आणि लोकसंख्या 135 कोटी तरी विषाणू प्रसार झालेल्या लोकसंख्येचे प्रमाण २०% होते. 
इथे कदाचित कल्याण-डोंबिवलीचे चित्र आशादायी आहे. कल्याण-डोंबिवलीत १३ सप्टेंबर २०२० पर्यंत ३५००० केसेस आहेत. १:२० गुणोत्तराने ७ लाख नागरिक विषाणूसंपर्कित असतील. १५ लाख लोकसंख्या मानली तर हे प्रमाण ६०% च्या जवळ जाते. ह्याचाच अर्थ अजून लाटांची शक्यता कमी झालेली आहे. अर्थात हे ढोबळ अंदाज आहेत. विषाणूसंपर्क हा लोकांच्या परस्पर संपर्काशी निगडीत असतो. शहरांत हा परस्पर संपर्क (दाटीवाटीने घरे, प्रवास, खरेदी) जास्त येतो त्यामुळे शहरांची टक्केवारी जास्त आहे. ग्रामीण भारतात तुलनेने प्रसार कमी असल्याने भारताची टक्केवारी कमी आहे. महानगराच्या परीघांवरील शहरांत प्रवास, जसे कल्याण-डोंबिवली, प्रवास हा घटक जास्त असल्याने प्रसाराचा वेगही जास्त आहे आणि टक्केवारीही. नेमकी टक्केवारी किती हे कळायला महानगरपालिकांनी sero-survey करायला हवेत. भारताच्या  किंवा महानगराच्या पातळीवर सर्व्हे करण्यापेक्षा एखाद्या शहराच्या पातळीवर केलेला सर्व्हे केस स्टडी म्हणून अधिक उपयुक्त ठरू शकतो.
आपल्याला नवी नवी व्यवधाने मिळाली आहेत आणि आपण लॉकडाऊनमध्ये जे गांभीर्य बाळगून होतो ते आता घटलेले आहे. ते साहजिक आहे.  थोडं धाडसी विधान करायचं म्हटलं तर महानगरांचा कोव्हीड-१९ प्रवास १/३ - १/२ एवढा पुरा झालेला असण्याची शक्यता आहे. आरोग्यसुविधांची क्षमता, केसेस हाताळण्याचा प्रोटोकॉल हे जे काही सुधारलं आहे ते नक्की सुधारलं आहे. सामाजिक निवड म्हणाल तर हजार+ भारतीय दररोज मरत आहेत पण आपण अर्थचक्राला दिलेली गती परत थांबवू असं दिसत नाही, जास्तीत जास्त स्थानिक गतिरोधक लावू, पण मोठा अडथळा नाही. ही धाडसी निवड आहे आणि आपण ती केलीच आहे तर आता येणाऱ्या रुग्णवाढीच्या लाटांना सामोरं जाणं हाच आपल्याकडे पर्याय आहे. आपल्या समृद्धीच्या स्वप्नाचे जे जगड्व्याळ चक्र आपण उभे केले आहे त्याच्या कोसळत्या वजनाने आपण मरून जाऊ नये म्हणून त्याला गतिशील ठेवणे आपल्याला भाग आहे, भले त्या गतीत मी-तुम्ही, आप्त-मित्र ह्यातले काही विषाणूला बळी पडतील. आपण त्यांच्या वियोगाने काही काळ खिळून राहू आणि परत उभे राहू, काळाचेच औषध घेऊन. 

(कोव्हीड-१९ संबंधित आकडेवारी https://www.covid19india.org/ इथून घेतलेली आहे.)  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विसंगत प्राणीदयेची समस्या

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा