रुपयाचे अवमूल्यन आणि सरकार – काही निरीक्षणे

इमेज
  आपल्या सगळ्यांसारखाच जे काही चाललंय – म्हणजे रुपयाचे अवमूल्यन , इंधन किंमती वाढणे किंवा वाढायची शक्यता , महागाई आणि त्याबाबत सरकारची धोरणे ह्याचा विचार मी करतो. मला त्यात पेच हा होता कि सरकारकडे ह्या प्रश्नाबाबत पुरेशी माहिती आहे, कदाचित अशीही माहिती आहे जी बाकी सगळ्यांना उपलब्ध नाही, पण तरीही अनेक तज्ज्ञ सरकारला देत असलेला सल्ला – रुपयाच्या किंमतीत हस्तक्षेप करू नका , पडू द्या , त्याचे परिणाम जे व्हायचे ते होऊ द्या – आणि प्रत्यक्षातले सरकारचे निर्णय ह्यांत तफावत का आहे. मग माझ्या लक्षात आलं कि फरक दृष्टीच्या पल्ल्याचा आणि उद्दिष्टांचा आहे. त्यातून मी माझी काही निरीक्षणे मांडत आहे. हा सरकारच्या धोरणांचा बचाव नाही. रुपयाची किंमत आणि इंधनाची किंमत ही सरकारी हस्ताक्षेपावाचून ठरावी आणि त्यातून जी होईल ती पिडा आपण सहन करावी ह्या भूमिकेला माझी सहानुभूती आहे. पण ही भूमिका आपण ज्या सामाजिक-राजकीय अवस्थेत आहोत त्याच्याशी विसंगत आहे. मायबाप सरकार ते स्पर्धात्मक बाजारपेठेपासून अलिप्त सरकार हा प्रवास आपण नुकताच सुरु केलेला आहे आणि त्यातही निवडणुका आल्या कि आपण मायबाप टोकाकडे जातच असतो....

लॉकडाऊनसे क्या होता है? - कल्याण-डोंबिवलीचे उदाहरण

कल्याण-डोंबिवलीत २ जुलैपासून सुरू असलेले लॉकडाऊन १९ जुलैला संपणार आहे. ह्याआधी ते १२ जुलैला संपणार होते. पण ११ जुलैला ते अजून सात दिवस वाढवले गेले. ११ आणि १२ जुलैला अनुक्रमे ६१५ आणि ६६१ केसेस आल्याने हा निर्णय योग्यच वाटला. त्यानंतर २ दिवस, सोमवार १३ जुलै, मंगळवार १४ जुलै, केसेस पडत्या होत्या, अनुक्रमे ४२७ आणि ३३६. मग मग २ दिवस त्या परत वाढत आहेत.  शुक्रवार-शनिवारी महानगरपालिका लॉकडाऊन वाढवायचा कि नाही हा निर्णय घेईल.

निर्णय हे पुराव्यांवर आधारित असावेत, भावनांवर नाही. कोव्हीड-१९ च्या बाबतीत पुरावे म्हणजे आकडेवारी. पण आकडेवारी ही केवळ आहे तशी बघून चालत नाही.

उदाहरणार्थ- २ जुलैच्या लॉकडाऊनचा फरक पहायचा असेल तर कोणत्या तारखेपासून पाहावा?

आता २ जुलैला एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाव्हायरसने शिरकाव केला तर ८ जुलैला आपण टेस्ट करून घ्यावी अशी लक्षणे दिसायची शक्यता आहे. मग टेस्ट करायची तयारी आणि त्याचा positive निकाल मिळायला पुढचे काही दिवस . म्हणजे साधारण १० दिवसांनंतर अशा व्यक्तीच्या शरीरातील विषाणू आपल्याला आकड्यातून कळेल. जसे खगोलशास्त्रात आपल्याला दिसणारा तारा हा काही शे-हजार वर्षांपूर्वीच्या अवस्थेत दिसतो तसं आपलाल्या दररोजच्या आकड्यातून काही दिवस अगोदरपर्यंतचा कोव्हीडचा प्रसार कळतो.

अर्थात जर व्यक्ती मनाप्रमाणे तपासणी करून घेऊ शकली तर हा १० दिवसांचा कालावधी कमी होईल. पण अजून आपण त्या अवस्थेत आलेलो नाही.

तर २ जुलै पासून कल्याण-डोंबिवलीत सुरू असलेल्या लॉकडाऊनचा प्रभाव कळायचा असेल तर १२ जुलै पासूनचे आकडे पहावे लागतील.

मी सोबत दोन ग्राफ जोडले आहेत.



आकृती-१
आकृती-२ 

   त्यातल्या आकृती-१ मध्ये १२ जुलै ते १६ जुलै २०२० ह्या कालावधीसाठी केलेला अंदाज (forecast) आहे. ह्यातली तांत्रिक बाजू मी इथे समजावत नाही. हा अंदाज बांधताना ११ जून ते ११ जुलै ह्या ३१ दिवसातील माहितीचा उपयोग केलेला आहे. हेच दिवस का? तर अनलॉक-१ जे १ जूनपासून सुरू झाले त्याचा परिणाम ११ जूनपासून दिसू लागला (वरचाच १० दिवसांचा तर्क) आणि २ जुलैपासून कल्याण-डोंबिवलीत परत लॉकडाऊन आले, ज्याचा परिणाम १२ जुलैपासून दिसणार आहे. अंदाज बांधताना असे गृहीतक आहे कि जर परत लॉकडाऊन झाले नसते तर काय केसेस सापडल्या असत्या. 

    निळ्या रंगाची रेषा आहे तो आहे मुख्य अंदाज. त्याच्या भोवती दिसणारा पट्टा हे दाखवतो कि जरी ह्या पट्ट्यातील एखादी संख्या आली तर ती मुख्य अंदाजासारखीच मानावी लागेल. आकृती-१ नुसार १२ जुलैची आकडेवारी अंदाजाहून जास्त आहे. पण त्यानंतर चारही दिवस ती अंदाजाहून कमी आहे. १५ आणि १६ जुलैला ती पट्ट्यात, मुख्य अंदाजाजवळ आलेली आहे, पण खालच्या बाजूला आहे. 

    एक गोष्ट इथे नोंद करायला हवी कि लॉकडाऊनच्या काळात स्क्रीनिंग सुरू झालेले आहे. स्क्रीनिंगमुळे काही दिवसांनी सापडले असते असे रुग्ण अगोदर सापडतात. स्क्रीनिंगमध्ये संशयित रुग्णाची पहिले antigen टेस्ट होईल, त्यात कोव्हीड-१९ ची शक्यता आढळल्यास मुख्य टेस्ट होईल. म्हणजे २-३ दिवसांत निकाल येईल. माझ्या माहितीतील रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे स्क्रीनिंग ७ जुलैपासून सुरू झाले. म्हणजे ९ जुलैपासून तरी त्यात सापडणाऱ्या रुग्णांचा आकडा दिसायला हवा. त्यामुळे १२ जुलैपासून दिसणाऱ्या आकड्यांत हे स्क्रीनिंगमुळे आलेले आकडेही आहेत. 

    थोडक्यात  जर स्क्रीनिंगमध्ये बरेच रुग्ण सापडत असतील तर लॉकडाऊनमुळे संक्रमणाचा वेग घटला आहे असे म्हणायला वाव आहे. माझ्या स्वतःच्या मते हीच शक्यता आहे. 

    एक अजून मुद्दा, ज्याची माहिती मला वैयक्तिक रित्या आहे, ती म्हणजे लॉकडाऊनमुळे उद्भवणारा लोकांच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न. एप्रिल-मे महिन्यांत कल्याणातील काही वस्त्यांत धान्यवाटप करण्याच्या निमित्ताने माझा काही लोकांशी दूरध्वनीवरून संपर्क झाला होता. त्यातील दोघांनी मला मागच्या २ दिवसांत परत संपर्क केलेला आहे - आमच्याकडे धान्य नाही, काही मदत कराल का म्हणून! 

ह्या सगळ्याचा विचार करता मी लॉकडाऊन वाढवायचे का नाही हा निर्णय घेणाऱ्या व्यक्तींना मी पुढील गोष्टी सुचवू इच्छितो. 

  1. केवळ दिसणाऱ्या आकड्यांवर जाऊ नका. न दिसणारे आकडे (आकृती-१ मधील निळी रेषा) लक्षात घ्या. 
  2. आकड्यांच्यापाठच्या उशीरही ध्यानात घ्या. २ जुलै ते १२ जुलै च्या लॉकडाऊनचा प्रभाव १२ जुलै ते २२ जुलैमध्ये दिसणार आहे. 
  3. लोकांच्या उदरनिर्वाहाची अवस्था बिकट होते आहे आणि केसेस जे असू शकत होते त्याहून  कमी झाल्या आहेत असे दिसत आहे (आकृती-१) - त्यामुळे लॉकडाऊन सुरू ठेवणे हाच पर्याय आहे असे नाही. पर्यायही आहे!   
  4. स्क्रीनिंगचा परिणाम लोकांसमोर आणा. त्याचे दोन फायदे आहेत. पहिला, स्क्रीनिंगचा फायदा किती हे समजणे. आपण नुसतीच श्रेयांची गरम लढाई बघतो आहोत. आकडे आले कि उष्णता कमी आणि प्रकाश जास्त होऊ शकतो. दुसरा, लोकांना हा विश्वास येईल कि लॉकडाऊनचा परिणाम (एकूण आकडा वजा स्क्रीनिंगचा परिणाम) झाला आहे. अन्यथा दररोजच्या आकड्यांनी लॉकडाऊन प्रभावहीन आहे अशीच भावना प्रबळ होण्याची शक्यता आहे. (ही बाब अशक्य आहे असे नाही, पण तेही तपासायला काही दिवस थांबावेच लागेल.) 
  5. आकृती-२ ही पहा. १ जूनपासून मुंबई महानगर परिसरात (MMR) जे दळणवळण सुरू झाले त्याचा स्पष्ट परिणाम ह्या आकृतीत आहे. जर १ जून २०२० पूर्वीचीच अवस्था राहती तर कल्याण-डोंबिवली मध्ये जून  महिन्यात २७९२ केसेस मिळाल्या असत्या. प्रत्यक्षात मिळाल्या किती - १०५४३!                                                                                                हे का झालं? कारण १) मुंबईतील आणि २) कल्याणातील ऑफिसेस- दुकाने सुरू झाली आणि ३) काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू झाल्या. २ जुलैच्या लॉकडाऊनने ह्या तीनपैकी एकच घटक बंद केलेला आहे. बाकी दोन सुरूच आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचा प्रभाव मर्यादितच राहणार. त्यामुळे लॉकडाऊनकडून किती अपेक्षा ठेवाव्यात हेही नीट ठरवले पाहिजे. 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकल ट्रेनचा बारमाही मरणऋतू आणि आपले शहाणपण

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

विसंगत प्राणीदयेची समस्या