श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

कोव्हीडची ३ वर्षे: काही निरीक्षणे

 कोव्हीडची आणि आपली गाठभेट झाली त्याला ३ वर्षे झाली. ह्या ३ वर्षांबद्दल ही काही निरीक्षणे आहेत.

source: internet


१.      कोव्हीडच्या ज्या लक्षणीय आठवणी असणार आहेत त्यातली एक आहे लॉकडाऊन. लॉकडाऊनमुळे आरोग्य यंत्रणेला तयार व्हायला वेळ मिळाला. हे लॉकडाऊनचं यश.

२.      लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित, रोजंदारीवर अवलंबून कुटुंबे ह्यांची हानी करून बाकी लोकांना वाचवलं गेलं. म्हणजे असं करणं हे लॉकडाऊनचं उद्दिष्ट नव्हतं, पण त्याच्या परिणामांकडे अशा प्रकारे बघता येईल. ही हानी भरून काढण्याचे प्रयत्नही नंतर झाले आणि ते बऱ्याच अंशी यशस्वीही झाले. पण मार्च, एप्रिल, आणि मे २०२० मध्ये भारतातला एक वर्ग लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबले त्यात भरडला गेला आणि बाकीचे त्या वेळी कोव्हीड लाटेत सापडण्यापासून वाचले.

३.      अर्थात जगभरातच तेव्हा flatten the curve अशा धोरणांचे वातावरण होते. विषाणू उत्क्रांत होणं, लस हे टप्पे भाकि‍तांच्या कक्षेतही नव्हते. प्रसाराचा वेग कमी करणं ह्यापलीकडे धोरण म्हणून पर्यायही नव्हते. हा वेग कमी करण्यासाठी किती तीव्रतेचे निर्बंध आवश्यक होते हा मुद्दा वादाचा असू शकतो, उदाहरणार्थ रेल्वे पूर्णतः बंद करणं.

४.      अर्थात जून २०२० पासून जशी बंधने निवळू लागली तसे सगळे कोव्हीडच्या तडाख्यात सापडलेच. अल्फा आणि नंतर डेल्टा लाटेत अनेकांनी प्राण गमावले, अनेकांना योग्य उपचार मिळण्यासाठी प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला, अनेकांना त्यांची शारीरिक क्षमता परत मिळवायला अनेक दिवस लागले, आणि काही दुर्दैवी आहेत जे अजूनही पूर्णतः सावरलेले नाहीत.

५.      कोव्हीड लाटेत किती जण मृत्युमुखी पडले ह्याचा वाद आता शमला आहे. अधिकृत आकड्याहून झालेले मृत्यू अधिक आहेत ह्यात वाद नाही.

६.      किती मृत्यू झाले ह्याची आकडेवारी जरी नक्की करता येणं शक्य नसलं तरी अशा मृत्यूंचे सामाजिक-आर्थिक परिणाम जाणवणार आहेतच. कुटुंबातील व्यक्ती मरण पावल्याचे आर्थिक परिणाम कुटुंबावर होतातच. एकतर ते कुटुंब अधिक सुट्टे होते (जर मृत्यू पावलेली व्यक्ती ही अवलंबून असलेली व्यक्ती असेल) किंवा अधिक खचते (जर कर्ती व्यक्ती मरण पावली). समजा २०२५ साली २०२१ पासून बाकी असलेली जनगणना झाली तर त्यात काही उत्तरे मिळू शकतात.

७.      कोव्हीड लसीचे परिणाम हाही विवादाचा मुद्दा राहणार आहे. माझी वैयक्तिक भूमिका ही कोव्हीड लस ही कोव्हीडच्या संसर्गाची तीव्रता कमी करण्यात परिणामकारक होती पण तिचे अन्य परिणाम आपल्याला पूर्ण कळलेले नसताना आपण विज्ञानवरच्या श्रद्धेने लस घेतली अशी आहे.

८.      लसीवर शंका घेणाऱ्यांना हीन लेखण्यातून स्वतःला वैज्ञानिक दृष्टीकोन आहे म्हणणाऱ्या लोकांचा संकुचित दृष्टीकोन, विशेषतः त्यांना नसलेली व्यक्तीस्वातंत्र्याची, व्यक्तीच्या प्रतिकूल मताचा आदर करण्याची चाड उघड झाली. लसीवरची शंका लस उपलब्ध झाल्यानंतरच्या काही महिन्यात ही पूर्णतः रास्त होती. कारण लसीचे परिणाम स्पष्ट करण्यासाठी ‘कालावधी हीच बाब महत्वाची आहे आणि ती पूर्ण झालेली नव्हती.

९.      करोना व्हायरस हा प्रयोगशाळेतून सामाजिक अभिसरणात आला ह्यावर आपण अधिक विश्वास ठेवू, पण लसीचा प्रचार-प्रसार ह्यामागे आर्थिक हितसबंध असू शकतात ह्यावर कमी विश्वास ठेवू.

१०.   कोव्हीड महामारीच्या काळानंतर काही दूरगामी परिणाम असतील का – जसे अचानक हृदयक्रिया बंद पाडून होणारे मृत्यू, अन्य संसर्गाना तोंड देण्याची आपली क्षमता – ह्यावर येणाऱ्या काळात आपल्याला अधिक कळेल.

११.   पण शिक्षणावर महामारीचा दूरगामी परिणाम झाला आहे ही बाब स्पष्ट आहे. पायाभूत शैक्षणिक कौशल्ये, सहाध्यायींशी संवाद, ताण-अपयश सहन करण्याची क्षमता अशा अनेक घटकांवर ऑनलाईन शिक्षणाचा नकारात्मक परिणाम झाला. ही शैक्षणिक तूट समाजाची किती हानी करते हेही कालांतरानेच स्पष्ट होऊ शकेल.

१२.   अर्थात कॉलेज आणि त्यानंतरच्या शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर कोव्हीडचा परिणाम पुढील काही वर्षे दिसणार असला तरी ह्या विद्यार्थ्यांच्या अर्थव्यवस्थेतील कामगिरीवर हा परिणाम दिसेलच असे नाही. उच्च शिक्षणातील काही भाग माझ्यात ‘काही मिळवण्यासाठी अप्रिय काही सहन करण्याची माझी क्षमता चांगली आहे हे दाखवण्याचा असतो असं म्हणता येईल आणि उरलेला भाग कौशल्यांचा असतो. कौशल्यांच्या भागावर कोव्हीडचा परिणाम होईल हे स्पष्ट असलं तरी अनेक नोकऱ्या ह्या अगोदरच्या भागाशीच निगडीत असल्याने त्यात विद्यार्थी कमी पडतील असे नाही. स्पर्धात्मक वातावरणात पुढे जाण्यासाठी लागणारी महत्वाकांक्षा कोव्हीडने गारद केली आहे असे म्हणता येत नाही. कदाचित कोव्हीडच्या सक्तीच्या तुटलेपणाने ती अधिक तीव्र झालेली असू शकते.  

१३.   ‘वर्क फ्रॉम होम ही संकल्पना महामारीच्या काळात अधिक रुळली. अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात नाही कि ज्यामुळे आपल्या जीवनशैलीत किंवा शहरांच्या रचनेत कायमस्वरूपी बदल व्हावा. कारण मुळात घर आणि काम ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असणं हेच अनेकांना हवं आहे.   

१४.   कोव्हीड महामारीच्या काळात लोकांच्या वर्तनाचे काही कंगोरेही अधिक स्पष्ट झाले. जर एखाद्याला अन्य माणसांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे निर्णय घेण्याची क्षमता दिली तर व्यक्ती ती क्षमता वापरतेच आणि अनेकदा निर्दयी आणि गरज नसताना वापरते. कोव्हीड काळात ही बाब स्पष्ट झाली. सरकार, पोलीस, आणि हाउसिंग सोसायट्या/शेजार अशा अनेक स्तरावर आपल्याला त्याचा प्रत्यय आला. अमुक वेळेतच भाजी विका, अमुक दुकानेच गरजेची आणि तमुक नाहीत असे अनेक उथळ निर्णय सरकारने घेतले. आंतर -जिल्हा प्रवासासाठी लागणाऱ्या पासांसाठी लाचखोरी झाली. व्यायाम करायला जाणाऱ्या लोकांना उठाबशा काढायला लावण्याचे प्रयोग झाले. हाउसिंग सोसायट्यांनी व्यक्तीच्या स्वातंत्र्याला नाकारून मनमानी केली.

१५.   अर्थात डिमांड-सप्लायच्या ताकदीखाली निर्बंध टिकत नाहीतच. सिगरेटस विकल्या गेल्या, केस कापून घेतले गेले, आणि सरकारने दारू घरपोच करता येईल हा क्रांतिकारी निर्णय रातोरात घेतला, औषधांच्या ठरलेल्या किमतीला न मिळून औषधे काळाबाजारात चढ्या भावाला मिळाली, आणि ज्यांना टेस्ट रिझल्ट्सची सक्ती होती त्यांना हवे ते टेस्ट रिझल्ट्स, आणि ज्यांना लस हवी त्यांना लस किंवा प्रमाणपत्र हवे त्यांना प्रमाणपत्र विकतच मिळू लागले.

१६.   डिमांड-सप्लायच्या ताकदीचे प्रत्ययकारी आणि तितकेच करूण उदाहरण म्हणजे मुंबईतील लोकल ट्रेन्स. लोकल ट्रेनमध्ये जायला तर लोकांनी सविनय कायदेभंग केला. सरकारने कोण लोकल ट्रेन मधून जाईल हे ठरवायचे अनेक प्रयत्न केले, पण कोणत्याही नियमांची अंमलबजावणी नीट झाली नाही. कारण संख्येचा दबाव! जून २०२१ पासून वगैरे तर लोक सर्रास ट्रेनने जाऊन लागले, खऱ्या-खोट्या प्रमाणपत्राची पर्वा न करता. सरतेशेवटी सरकारने लोकल प्रवास खुला करून अनेकांचा कायदेभंग कायदेशीर केला.

१७.   लोकांनी लोकांना मदतही केली. चालत परत जाणाऱ्यांना मदत करायला, आयसोलेशनमध्ये असलेल्या कुटुंबाना मदत करायला, लॉकडाऊनमध्ये उपजीविका गमावलेल्या कुटुंबाना अन्नधान्य द्यायला (सरकार देऊ लागे पर्यंत), कोव्हीड उपचार ते अंत्यसंस्कार ह्यांत मदत करायला हिरीरीने लोक सरसावले.

१८.   सरकारी आरोग्ययंत्रणेने कोव्हीड उपचार आणि लसीकरण दोन्हीत लक्षणीय कामगिरी बजावली. खाजगी क्षेत्र फायदा आधारित आरोग्य सेवा देत असताना सरकारी आरोग्यसेवेने अनेकांना लोककल्याणाच्या तत्वाने मदत केली.

१९.   समाज म्हणून आपल्यावर कोव्हिडचा काय परिणाम झाला? आपल्या सामाजिक.व्यवस्था, संस्था, वर्तनपद्धती ह्यांमध्ये काही ठोस बदल झाले का? तीन वर्षांनी मुंबईच्या गर्दीत हा विचार करताना अशा बदलांच्या फार खुणा दिसत नाहीत. पण काही प्रमाणात असे बदल आहेतच. थोड्या पण ठोस प्रमाणात वर्क फ्रॉम होम हा नोकरदारांच्या जीवनाचा भाग बनलेला आहे. काही जणांसाठी ती जीवनशैली बनलेली आहे. अर्थात हे प्रमाण अल्प आहे आणि तेही काही प्रकारच्या उद्योगांत केंद्रित आहे.

२०.   काही लोक अजूनही मास्क वापरत आहेत! तसेच काही लोक sanitizer ही घेऊन फिरतात.

२१.   आरोग्य व्यवस्थेत काही मूलगामी बदल झाला आहे का? आरोग्य सेवेच्या दर्जात, उपलब्धतेत म्हणजे सप्लाय साईडमध्ये फार बदल झालेला दिसत नाही. नर्सिंगकडे उपजीविका म्हणून अधिक लोक बघू लागले असं असू शकतं.  मागणीच्या बाजूला बदल असण्याची शक्यता आहे, उदा. इन्शुरन्सची डिमांड. कोव्हिडच्या तीव्रतम अवस्थेत अनेक ठिकाणी सरकारी आरोग्यव्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात उभी करण्यात आली. ह्या बदलाचे काही सकारात्मक परिणाम, उदा. औषधांची उपलब्धता किंवा व्यवस्थापन, हे अजून काही काळ जाणवत राहू शकतात. ते कायमस्वरूपी होतील ह्यासाठी धोरणात्मक पाऊले, जसे ह्या काळाचा आढावा आणि त्यातून काही धोरणे सुचवण्यासाठी एखाद्या समितीची योजना, हे गरजेचे आहे. सिंगापूरमध्ये अशा प्रकारचा आढावा घेण्याचा प्रयोग झालेला आहे.

२२.   समाजातील नास्तिक लोकांचे प्रमाण महामारीच्या काळात वाढेल अशी काही मते महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांत वाचनात आली होती. प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही. कदाचित नास्तिक किंवा नास्तिक्य कमी होण्याचीच प्रक्रिया झालेली असू शकते.

मुळात आज आपण ज्यांना आस्तिक मानतो ते छुपे (प्रच्छन्न) नास्तिक आहेत. ते आपल्या मनाजोगत्या पद्धतीने उपासना करत असतात आणि ती उपासनाही ‘इन्शुरन्स प्रकारची असते. त्यात कडवेपणा आहे, पण लवचिकताही आहे. श्रद्धा आणि लवचिकता ह्यांचे मिश्रण आकर्षक असले तरी ते खरे आस्तिक्य नाही.

महामारीच्या काळात अनेकांना जी हताश, आपल्या हातात फारसे काही नसल्याची अवस्था अनुभवायला लागली त्यात स्वतःला कोसळू न देण्याचा मार्ग म्हणून काही जणांनी अध्यात्माचा मार्ग अनुसरला असण्याची शक्यता आहे. अध्यात्माचा एक मोठा फायदा असा असतो कि मी करतो आहे, मी करेन असे hubris घटू शकते. आपल्या अस्तित्वाला अपघात किंवा लीला म्हणून पाहता येऊ शकत असेल तर त्यातील वैफल्याला तोंड देणे सोपे होऊ शकते. मुराकामीने जसे काही दिवसांपूर्वी tweet केले होते तशी pain is inevitable, suffering is optional अशा अर्थाने अध्यात्म किंवा त्या स्वरूपाचा दृष्टीकोन उपयोगी ठरू शकतो.

२३.   डेल्टा लाटेच्या काळात अनेकांना आपल्या कुटुंबियांना रुग्णालयात दाखल करतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांचे मृत्यू झाले. ह्या सगळ्याबद्दलचा असंतोष, त्याचा उद्रेक का दिसून आला नाही हाही कोव्हीड महामारीच्या काळाबद्दल पडणारा एक प्रश्न आहे. त्याचं एक उत्तर म्हणजे लोक महामारीकडे अस्मानी संकट म्हणूनच बघत होते. आणि दुसरं म्हणजे २०२० मधील ३ महिन्यांचा कालावधी वगळता आपल्या जीवनाचं गाडं कोव्हीडपूर्व काळाशी जुळवून आणण्यात आपण यशस्वी झालो. लोकांना महामारीपेक्षा निर्बंधांचा जाच नको आहे हे सरकारलाही कमी-जास्त वेळात लक्षात आलं.

२४.   महामारीच्या सुरुवातीला महामारीने काय काय बदल होतील ह्याबद्दल अनेक भाकिते झाली. आपल्या मूळ राज्यांत परतलेल्या स्थलांतरित व्यक्तींना आता तिथेच उपजीविका करावी लागेल आणि त्यासाठी नवी धोरणदिशा आखावी लागेल असेही अनेक सामाजिक संस्था, विचारवंतांना वाटत होते. पण बहुतेक परतलेले स्थलांतरित परत एकदा महानगरांत आलेले आहेत. मुळात ही परतीची प्रक्रिया जून २०२० पासूनच सुरु झालेली होती.

२५.   ऑनलाईन शिक्षणाच्या लाटेत सुरु झालेले अनेक प्रयोग, व्यवसाय ह्यांनाही ओहोटी लागलेली आहे. पण त्यातील काही बदल स्थायी होत आहेत. उदाहरणार्थ मुलाखती आणि सेमिनार्स ह्यांत हायब्रीड प्रकारचा वापर हा परिणामकारक ठरतो हे लक्षात आल्याने तो रूढ होतो आहे.

२६.   व्यक्तींच्या मानसिक स्वास्थ्यावर, त्यांच्या इतरांबद्दलच्या दृष्टिकोनावर त्यांना ज्या अलग, तुटक्या वातावरणात रहावे लागले त्याचे काही दूरगामी परिणाम झाले का? महाविद्यालयात शिकवताना मला जी दिसलं त्यानुसार काही थोड्या व्यक्तींवर असे परिणाम नक्कीच झालेले आहेत. ताण सहन करता येणं, कामातील अचूकता, विषय समजून घेण्याच्या प्रक्रियेकडे रंजक प्रक्रिया म्हणून बघणं, गटांमध्ये काम करणं अशा बाबीत कमी पडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. आणि distraction हे तर सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. हे परिणाम किती शाश्वत आहेत, किती व्यापक आहेत आणि त्यांनी समाजाच्या equilibrium मध्ये काही बदल संभवतात का हे लगेच सांगता येणार नाही. कदाचित अशा एकारलेल्या, distracted, तुटक व्यक्तींचे प्रमाण कोव्हीड नसता तर हे असते त्यापेक्षा पुढची काही दशके थोडे जास्त असेल, काहीवेळेला त्याचे विचित्र आणि दुर्दैवी परिणामही दिसून येतील, पण ते अपवाद अशा अर्थानेच मर्यादित राहतील असं वाटतं.  

२७.   कोव्हीडने आपल्यातील विषमता वाढवली. ह्या विषमतेचा आर्थिक आयाम स्पष्ट आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानावर आधारित उपजीविकांना कोव्हीडच्या काळात अच्छे दिन होते. पण ज्यांच्या उपजीविका प्रत्यक्ष जनसंपर्कावर आधारित होत्या त्यांचे बुरे दिन होते. अर्थात पहिल्या गटाला आता काही प्रमाणात झळ बसू लागलेली आहे आणि ती दुसऱ्या गटाकडे संक्रमित होणार आहे, कारण दुसरा गट हा पहिल्या (अच्छे दिन) गटाच्या क्रयशक्तीवरच अवलंबून आहे. कोव्हीडच्या काळात ह्या क्रयशक्तीचे चलनवलन डिजिटल स्वरूपातच झाले, अर्थातच ते मर्यादित होते. त्यामुळे पहिल्या गटाचा सांपत्तिक स्तर उंचावला. पण दुसऱ्या गटाला उत्पन्न घटल्याने संपत्तीतून तो वाटा खर्च करायला लागला.  

२८.   जे लोक लोकांपासून दूर राहूनही आपल्या सुखाचा, आपल्या कार्यक्षमतेचा स्तर राखू शकले आणि कोव्हीडच्या गंभीर आजारापासून बचावले ते ह्या महामारीचे विजेते आहेत. असे अनेक विजेते आहेत. महत्वाकांक्षी विद्यार्थी, संशोधक, कलाकार, नोकरदार ह्यांनी हा काळ पुरेपूर वापरला आहे. आणि त्यांच्या विजयाने त्या त्या क्षेत्रातील विषमताही वाढलेली आहे. विजेते, उरलेले, आणि गेलेले अशा तीन भागांत महामारी आपल्याला विभागून गेलेली आहे.

२९.   अजून दहा वर्षांनी, २० वर्षांनी, १०० वर्षांनी ह्या काळाची काय याद उरेल? ह्या प्रश्नाच्या उत्तराचा एक प्रयत्न म्हणजे आपल्या सामाजिक स्मृतीत ह्या आधीच्या महामारींची काय आठवण आहे हे पाहणं. चाफेकर बंधूंमुळे प्लेग आपल्या लक्षात राहणार आहे. पण ह्या प्लेगमधील मानवी यातना, स्थलांतरितांचे गावाकडे परत जाणे (मुंबईत १८९०-१९२० च्या कालावधीत अनेकदा असे परत जाणे आणि परतून येणे घडलेले आहे.) ह्याची काय यादगारी आहे? १९१५ च्या आसपास आलेल्या Spanish फ्लूची, ज्यांतही दुसरी लाट ही पहिल्या लाटेहून भयावह होती, ह्याची सामाजिक स्मृती काय आहे? BDD चाळींचा विचार करताना आपल्याला ह्या महामारींची आठवण येते का? पानिपतच्या लढाया आणि त्यातले मोती-खुर्दे-चिल्लर ह्यांचे कढ लोकांना येतात, महायुद्धांच्या काळाबद्दल कलाकार – विचारवंत ह्यांना आकर्षण आहे, पण त्याहून अधिक संहारक महामारीचे कालखंडही आपल्याला अचूक आठवत नाहीत, कारण तशा स्मृतीच नाहीत.

युद्धे नुसती संहारक नसतात. ती सरतेशेवटी माणसांच्या कृतीतून उद्भवलेली असतात. त्यातील मरणांच्या प्रचंड स्केलला आपण व्यक्तीच्या निवडीशी जोडून जर-तर खेळू शकतो. त्यात जरी माणसे कस्पटासमान मारली गेली तरी हे मरण random नाही, ते माणसांनी केलेल्या निवडीचा भाग आहे. व्हायरसचे तसे नाही. त्याचा संसर्ग आणि त्यातून निष्पन्न होणारे परिणाम ही लॉटरी आहे आणि थोडे लोक सोडले तर सगळेच ती न जिंकलेले आहेत. त्याची काय याद ठेवायची?

अर्थात आपण हे सगळेच सारेच विसरूनच जाऊ असे नाही. कोव्हीडसाठी झालेले वैज्ञानिक संशोधन आपल्या ज्ञानवारश्याचा हिस्सा बनणार. पण कोव्हीडच्या काळात आपल्याला मानवी वेदनांचे जे दर्शन झाले त्याचा असा चटका, व्रण उरणार नाही. काळाच्या औषधाने तो उरतच नाही. आपल्यातल्या काही जणांना काही क्षण भर उन्हात, रात्री-अपरात्री शेकडो मैल चालू पाहणारे हजारो लोक आठवतील, डेल्टा लाटेत रुग्णालयाची, औषधांची वाट पाहत धपापणारे उर आठवतील, ज्यांच्या मरणाच्या बातम्या आपल्यावर माहिती बनून आदळत गेल्या असे जवळचे लोक आठवतील, पण जसा virus endemic झाला आहे तश्या ह्या स्मृतीही आता आपला भाग आहेत, आपले सुख हिरावू पाहणारा परका प्रश्न नाहीत.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विसंगत प्राणीदयेची समस्या

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा