कसबा पेठ पोटनिवडणूक: मत न देऊन अवलक्षण?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप हरला. भाजप कोणतीही निवडणूक प्रचंड हिरीरीने लढत असल्याने भाजपची कोणतीही हार हा कुतूहलाचा विषय बनते. कसबा पेठ पोटनिवडणूक त्याला अपवाद नाही.
![]() |
प्रतिमा: इन्टरनेट |
२०१४
च्या विधानसभा निवडणुकीत, ज्यांत भाजप आणि त्यावेळची शिवसेना हे स्वतंत्र लढले
होते तेव्हा कसबा पेठ मतदारसंघात भाजपला ७३५९४ मते मिळाली होती आणि शिवसेनेला ९२०३. २०१९ विधानसभेला
युती असताना युतीच्या उमेदवाराला ७५४९२ मते मिळाली होती. २०२३ च्या पोटनिवडणुकीत
भाजपला मिळालेली मते आहेत ६२३९४. २०१९ च्या तुलनेत १७% मते भाजपला कमी पडली.
दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांना २०१४ मध्ये मिळून ४७१८७ मते होती आणि
२०१९ मध्ये ४७२९६. पोटनिवडणुकीत त्यांना ७३३०९ मते पडली आहेत. म्हणजे त्यांची मते
५५% ने वाढली आहेत.
ही वाढ
केवळ ठाकरे गट सोबत आल्याची नाही. २०१४ ची शिवसेनेची मते पूर्णतः ठाकरे गटाची होती
असं पकडलं तरी मतातील वाढ त्याहून जास्त आहे. भाजप, सेना, कॉंग्रेस, आणि राष्ट्रवादी
ह्यांच्याशिवाय अन्य अशी मते २०१९ ला २९२८१ होती, ती २६७८ एवढी घटली आहेत. कॉंग्रेसची, म्हणजे
कॉंग्रेस+राष्ट्रवादी ह्यांची कसबा पेठेतील मते २००९, २०१४, आणि २०१९ मध्ये लक्षणीयरित्या
सारखी होती, साधारण
४७०००. त्यांनी पोटनिवडणुकीत अन्य मते आपल्याकडे ओढली आणि त्यातून त्यांना साधारण
७३००० मते मिळाली. हा झाला विरोधी मते एकवटण्याचा प्रकार.
थोडक्यात
कसबा पेठेत झालेला सामना दुरंगी होता. एकूण मतांपैकी ९८% मते ही भाजप आणि कॉंग्रेस
ह्यांनाच मिळालेली आहेत. अन्य पक्षांची मते एकवटली तर भाजपला निवडणूक कठीण होते हा
२०१४ नंतर काही ठिकाणी (उदा. बिहार २०१५ किंवा पश्चिम बंगाल २०२१) दिसून आलेला
कित्ता परत दिसला आहे. अर्थातच राजकीय निरीक्षकांच्या लक्षात तो आलेलाच आहे. पण
विरोधक एकवटले कि भाजपला शह देता येईल ह्या मांडणीला छेद देणारी एक शक्यता
आकड्यांत आहे. जर भाजपची गाभा मते आणि प्रचार हे दोन्ही पूरक असतील तर भाजप हरणार
नाही ही ती शक्यता. कशी ते पुढे पाहू.
२०१४
च्या विधानसभा निवडणुकीत २००९ च्या तुलनेत मतदान वाढले होते, पण पात्र मतदारांची
संख्या घटली होती. त्यानंतर मात्र कसबा
पेठेत मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या २०१४ पासून कमी होते आहे, पण एकूण
मतदारांची संख्या वाढलेली आहे. २०१४ ला २७५१३८ मतदारांपैकी १६९३९९ नी मतदान केले.
२०१९ ला २९०७२४ पैकी १५००६९ नी मतदान केले. २०२३ च्या पोटनिवडणुकीत १३८८३१ नी
मतदान केले. २०१४ च्या तुलनेत २०१३ पोटनिवडणुकीत मतदान केलेल्यांची संख्या सुमारे
१८% नी कमी आहे, म्हणजे २०१४ ला मतदान केलेल्या ११ तील २ मतदार आता मतदान करत
नाहीत. भाजपची प्रत्यक्ष आणि सामाजिक माध्यमांतील अप्रत्यक्ष अशी बलाढ्य प्रचार यंत्रणा
कार्यान्वित होऊनही (?) एकूण मतदारांची संख्या घटते ही नवलाची किंवा भाजपसाठी
विचार करण्याची बाब आहे.
२०१९
च्या निवडणुकीच्या तुलनेत पोटनिवडणुकीत एकूण मते सुमारे ११५०० ने घटली आहेत आणि
भाजपची मते १३००० ने. आणि भाजप आणि विजेत्या कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या मतांतील
फरक आहे सुमारे ११००० चा. हे आकडे जवळपास असणं हा सांख्यिकी योगायोग आहे किंवा
आपल्यांनीच दाखवलेला इंगा.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा