सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक हित, आणि न्यू नॉर्मल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डॉ. अजित कानिटकर ह्यांचा ‘गणेशोत्सव ‘न्यू नॉर्मल’ करता येईल का?’ हा लेख २८ ऑगस्ट २०२२ च्या लोकसत्तामध्ये प्रकाशित झाला आहे. उपरोध आणि पर्यायी मांडणी ह्यातून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सध्याची म्हणजे ‘नॉर्मल’ स्थिती ही वाईट आहे हे स्पष्ट केलेले आहे. त्यांच्या मताशी महाराष्ट्रातील अनेकजण मागची अनेक वर्षे सहमत असतील. अशा अनेकांची भूमिका मांडल्याबद्दल डॉ. कानिटकर ह्यांचे अभिनंदन.
![]() |
स्त्रोत |
त्यांच्याच
मांडणीला पुढे नेऊन थोड्या अधिक स्पष्ट शब्दात सार्वजनिक गणेशोत्सवातून होणारी
सामाजिक मूल्यनिर्मिती ही अत्यंत क्षुल्लक असून केवळ आर्थिक आणि राजकीय हेतूंसाठी सार्वजनिक
सुविधांवर ताण आणणारा सार्वजनिक गणेशोत्सव चालतो असं मी म्हणणार आहे. त्याचे हे
बदललेले स्वरूप लक्षात घेऊन त्याच्याबद्दलची धोरणेही बदलली जावीत आणि आपले आकलनही
बदलावे अशी माझी मांडणी आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात थोर नेत्यांनी लोकांमध्ये जागृती, प्रबोधन व्हावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असं आपण शालेय वयापासून ऐकतो. आता रात्री १० वाजले कि केव्हा विसर्जन मिरवणुकीतील आवाज थांबेल ह्याची प्रतीक्षा करताना मला मला न येणारी झोप ह्यापलीकडे जागृती आणि प्रबोधन कुठे आहे असा प्रश्न पडत राहतो. आणि ते शोधायचा प्रयत्न केला तर ते फारसे कुठेही नाहीत हेच दिसून येतं.
तत्कालीन सामाजिक समस्या, राजकीय अवस्था, सरकारी निर्णय ह्यांना अनुसरून योग्य
(सरकारमान्य) पद्धतीचे वादग्रस्त देखावे बनवणे ह्यांना जागृती आणि प्रबोधन मानता
येणार नाही. त्याला राजकारण म्हणतात. आणि त्यात गैरही काही नाही. रस्त्यावर आलेली
कोणतीही तथाकथित श्रद्धा हे राजकारणच असते, आणि सार्वजनिक गणेशोत्सवही त्याला अपवाद
असण्याचे कारण नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू-मुस्लीम समस्या, भारतीय स्वातंत्र्यलढा
ह्यांच्या राजकारणाची फलश्रुति म्हणून गणेशोत्सव सार्वजनिक झाला. पण आज तो आपली
राजकीय भूमिका तरी बजावतो आहे का? धार्मिक दहशतवाद ह्या मुद्द्याच्या पलीकडे कोणते
राजकीय भाष्य गणेशोत्सव करतो? आणि ह्या मुद्द्यासाठी तरी गणेशोत्सवाच गरजेचा आहे
का? ह्या मुद्द्यावर बहस आणि
प्रसंगी तोडफोड करायला फेसबुक, ट्विटर आणि बाकीचे पर्याय अधिक जोरदार आणि स्वस्त नाहीत
का?
धार्मिक
मुद्द्यांवर राजकीय भाष्य हे करावे का नाही ह्या मुद्द्यात न शिरता काही मंडळे हे
करतात एवढे नोंदू. बाकीची मंडळे काय करतात? तर सजावट, सत्यनारायण वा याग आणि सवाद्य
विसर्जन मिरवणूक असा ‘स’ कारात्मक सार्वजनिक प्रकार. ह्यांतून कोणते
सार्वजनिक हित साध्य होते? सार्वजनिक हित म्हणजे व्यक्तीच्या कृतीतून
व्यक्तीच्या हितापलीकडे इतरांवर होणारे चांगले परिणाम. अर्थशास्त्राच्या भाषेत
बोलायचे तर positive externalities ज्यांत वैयक्तिक कृतीचे
समाजावर होणारे परिणाम हे त्या कृतीसाठी खर्च करणाऱ्या व्यक्तींवर होणाऱ्या
परिणामांहून जास्त असतात. वेगळ्या शब्दात, त्यात सहभागी व्यक्तींच्या हिताच्या बेरजेहून
अधिक हित समाजाचे होते. अशा सामाजिक हिताच्या बाबींना प्रोत्साहन, संवर्धनपर कृती करणं ही शासनाची जबाबदारी ठरते.
देखावे, कार्यक्रम ह्यांतून असे
सार्वजनिक परिणाम होउ शकतात कारण आयोजकांच्या व प्रेक्षकांच्या तात्कालिक
सुखापलीकडे जाऊन सर्जनशील व्यक्तींना (कलाकार, लेखक, संशोधक, राजकीय नेतृत्व) चालना देण्याची क्षमता देखाव्यांत
किंवा कार्यक्रमात असू शकते. शकते हा महत्वाचा शब्दप्रयोग आहे. जादूचे प्रयोग, पानसुपारी, भावगीत कार्यक्रम
ह्यांतून ते साधले जाते असे मानणे हा टोकाचा आशावाद आहे. पण ज्या सार्वजनिक
गणेशोत्सवात ह्यातील काहीही घडत नाही तिथे कोणतेही सामाजिक हित साधले जात नाही. आणि
असे परिणामकारक देखावे किंवा कार्यक्रम होणाऱ्या जागाही कमी आहेत आणि आजच्या
माहितीस्रोतबहुल काळात अशा कार्यक्रमांचा दिशादर्शक म्हणून परिणाम होण्याची
शक्यताही कमी आहे.
सार्वजनिक
गणेशोत्सवातून सामाजिक हित फारसे साधले जात नाहीत. पण म्हणून ते बंद केले जावेत
अशी माझी मांडणी नाही. सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग घेणे हा व्यक्तींच्या निवड
स्वातंत्र्याचा अविष्कार आहे आणि त्यातून होणारी सार्वजनिक हानी ही त्यातून
निर्माण होणाऱ्या सहभागी व्यक्तींच्या हिताच्या तुलनेत फार कमी आहे. त्यामुळे
त्यावर कायदेशीर बंदी आणण्याला कोणताही तात्विक आधार नाही. पण अनेक व्यक्तीच्या
सामूहिक सुखप्राप्तीसाठी सामाजिक सुविधांवर ताण आणणे न्याय्य आहे कारण ह्या
सामूहिक आविष्कारातून काही सामाजिक हित निर्माण होते आहे हा समज मात्र नक्की बंद
केला जावा. गणेशोत्सव हा आता प्रामुख्याने मराठी भाषिकांचा गरबा आहे. त्याच्याकडे स्वातंत्र्यपूर्व काळाचे तथाकथित वलय काढून एक महत्वाची आर्थिक-सामाजिक कृती म्हणूनच पहावे.
व्यक्तींनी
एकत्र येऊन एखादी कृती केली तर ती आपसूक सामाजिक हिताची ठरत नाही. तिला केवळ संख्येचे
बळ प्राप्त होऊन तिला लोकशाही राजकारणात सरकारी संरक्षण मिळण्याची शक्यता मात्र बळावते.
पण जर ह्या अनेकांच्या एकत्रित कृतीतून सहभागी व्यक्तींच्या सुखाव्यक्तिरिक्त आणि
त्यांच्या खरेदी-विक्रीतून होणाऱ्या आर्थिक परिणामांच्या व्यक्तिरिक्त अन्य
व्यक्तींवर कोणतेही लघु किंवा दीर्घ पल्ल्याचे इष्ट परिणाम होत नसतील तर त्या
सामूहिक कृतीला अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन केलेला उपभोग (consumption) असेच म्हणावे लागेल. आजचे सार्वजनिक उत्सव ह्याच स्वरूपाचे आहेत.
आपण
आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला, दहीहंडीला किंवा कोणत्याही अशा सार्वजनिक
प्रकाराला सामाजिक हिताचे मानणार असू तर बडेजावात केलेल्या लग्नसमारंभांनाही आपण
तेच सामाजिक स्थान दिले पाहिजे. आणि उद्या आपल्या परिसरातील प्रस्थापित किंवा
उत्सुक भाऊ, दादा, राव, जी ह्यांनी त्यांच्या
कुटुंबियांचा लग्नसोहळा असा रस्ता अडवून, वाद्ये लावून, मिरवणुका करून करायचे
ठरवले तर तेही योग्य मानले पाहिजे. म्हणजे दांडगे लोक असं करत नाहीत असं नाही, पण आपण त्याला कायदेशीर आणि सामाजिक
हिताचे म्हणायला अजून धजावत नाही.
आता
मुद्दा येतो तो कि समजा आपण हे मानलं कि सार्वजनिक गणेशोत्सवात सार्वजनिक हिताचे फार काहीही नाही तर मग आपण त्यांचं काय करायचं? आदर्श अवस्था तर ही आहे कि सार्वजनिक
उत्सवांना सार्वजनिक सुविधा मोफत वापरायची आणि प्रसंगी नागरिकांची अडवणूक करण्याची
जी मुभा मिळते ती बंद व्हावी. त्यांना अशी मुभा देणं हा विशुद्ध झुंडशाहीचा लोकशाही
अविष्कार आहे. त्याला कोणतेही तात्विक अधिष्ठान नाही. सार्वजनिक उत्सव हे ज्या
सामूहिक कृतींना उपलब्ध खाजगी आणि शासकीय जागा आहेत तिथे कोणतेही अतिरिक्त सवलत न
मिळता व्हावेत. सार्वजनिक उपक्रमांसाठी खाजगी जागा उपलब्ध करून देण्याबाबत नियम
व्हावेत, पण रस्ते
अडवून उत्सव होऊ नयेत. रस्त्यांवरून विसर्जन मिरवणूक जावी, पण तिला रस्त्यावर थांबण्याची
मुभा नसावी. अशी कृती दंडाला प्राप्त ठरावी. सार्वजनिक उत्सव मंडळांना पुरेसे महाग
शुल्क भरण्याची आणि/किंवा त्यांच्या उत्पन्नातील काही वाटा काही सामाजिक
उद्देशांसाठी खर्च करण्याची सक्ती असावी. असे झाल्याने ह्या सार्वजनिक कृतींच्या
लाभ-हानीचा ताळेबंद जोडला जाईल.
पण
इतक्या टोकाच्या आदर्शवादी भूमिकेला तर आपण जाऊच शकणार नाही. उलट असं म्हणणाऱ्याला
आपण प्रेमाने किंवा धाकाने ‘तुम्हाला जो काही त्रास होतोय तो थोडाच काळाचा आहे आहे, सहन करा. कशाला चालत्या
गाड्याला खीळ घालायला जायचं’ अशीच भूमिका घ्यायला सांगू. ही ‘स्मार्ट’ भूमिका चुकीची नाही.
हजारो-शेकडो लोक जे करत आहेत त्याला आडकाठी न करता आपणच कडेकडेने चालणं हे
व्यावहारिक आहेच. ज्यांना सार्वजनिक उत्सवांच्या बाबतीत असे बऱ्या-वाईटाचे प्रश्न
आहेत ते अशा व्यावहारिक भूमिकेतूनच वागतात.
शेवटी रस्ते लोकांचे आहेत आणि अनेक लोकांना रस्त्यांवर काही साजरे करायचे असेल तर ते तसे करणारच. असे होणं हा लोकशाहीचा स्वाभाविक अविष्कार आहे. आणि जर सार्वजनिक उत्सव सार्वजनिक सुविधांना मोठ्या प्रमाणावर बाधा आणतील तर त्याविरुद्ध आवाजही आपोआप उठेलच. पण अनेकदा असा आवाज बराच उशिरा येतो. कारण बोलू पाहणाऱ्याला अनेकदा आपण एकटेच असे दुसऱ्या बाजूला असू तर काय ह्याची भीती असते. त्यात एकटे असण्याची भीती असते आणि कदाचित आपल्याला जे वाटतं आहे ते व्यक्तीसापेक्षच आहे असं वाटण्याचीही जाणीव असते. ही जाणीव जाऊन जे घडतंय ते गंडलेलं आहे हि खात्री येईपर्यंत उशीर झालेला असतोच. त्यामुळे कोणीतरी 'गंडलेलं आहे' हे सांगण्याची सुरुवात करावी लागते.
डॉ. कानिटकर ह्यांच्या लेखाने अशा सुरुवातीची सुरुवात केलेली आहे. अर्थात त्यांचा लेख आणि असे अन्य लेख हे सारे अरण्यरुदन ठरेल अशी उत्सवउर्जा सर्वत्र पसरलेली आहे. सार्वजनिक उत्सवांची ऊर्जा आणि उपद्रव आणि त्यांच्या मुळाशी असलेले अभावाचे खड्डे ह्यांतून कडेकडेने वाट काढताना आपण ‘न्यू नॉर्मल’ चा विचार करू लागलो आहोत ही जाणीव थंडीत तळ्यात उभ्या कुडकुडत्या माणसाला दूरच्या दिव्याने उब द्यावी तशी दिलासा देणारी आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा