श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

न पडणाऱ्या पावसाबद्दल काही निरीक्षणे

 लोकसत्ताच्या २८ जून २०२२ च्या अंकात राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतलेला आहे. जून महिन्यात अपेक्षित असतो तसा पाऊस पडलेला नाही हे तर आपण सगळेच पाहत आहोत. वेगवेगळ्या शहरांत पाणी कपातीच्या घोषणा होत आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार १ जून ते २७ जून ह्या कालावधीत महाराष्ट्रात १२० मिमी पाऊस पडलेला आहे. ह्या कालावधीतील पावसाची सरासरी आहे १८० मिमी. म्हणजे ह्या वर्षी महाराष्ट्रात जून महिन्यात सरासरीपेक्षा ३३% कमी पाऊस पडलेला आहे.  

अशा संदर्भात मी उपलब्ध डेटाच्या आधारे पुढील प्रश्नाचा विचार केला आहे – जून महिन्यात कमी पाऊस होणं हे त्या वर्षीचा पूर्ण पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) कमी पाऊस होण्याशी किती निगडीत आहे? अर्थात ही मांडणी ढोबळ आहे आणि त्यात जरी भाकीत असले तरी ते प्रोफेशनल नसून हौशी आहे. 

Climate Change Knowledge Portal इथे भारतातील राज्यांतील दरमहा पावसाची आकडेवारी उपलब्ध आहे. १९०१ ते १९२० अशा सुमारे १२० वर्षांतील प्रत्येक महिन्यातील पावसाची माहिती आहे. त्यावरून मी काही आकडेमोड केलेली आहे. प्रथम मी महाराष्ट्रात जून महिन्यात होणाऱ्या पावसाचा cumulative average काढला आहे. Cumulative average म्हणजे मी १९०१ पासून ज्या वर्षापर्यंतची सरासरी मोजत आहे तेवढ्या वर्षांनी मी तितक्या वर्षांच्या पावसाच्या बेरजेला भागत आहे. ह्या पद्धतीत जशी आपण अधिकाधिक वर्षांची सरासरी काढतो तसा आपल्याला एक स्थिर pattern दिसू लागतो. (Fig. 1) महाराष्ट्रात जून महिन्यातील पावसाची सरासरी साधारण १७६ mm आहे. 

 


Figure 1

असाच cumulative average मी जून ते सप्टेंबर महिन्यातील पावसाचा काढलेला आहे. (fig. 2) जून ते सप्टेंबर ह्या कालावधीत महाराष्ट्रात सरासरी ८७० mm पाऊस पडतो असं मी पकडलेलं आहे.  

 


Figure 2

ह्या cumulative averages चा वापर करून मी जून महिन्यातील सरासरीहून बदल आणि पावसाळ्याच्या चार महिन्यातील पावसाचा सरासरीहून बदल ह्यांच्यातील संबंध पाहण्याचा ढोबळ प्रयत्न scatterplot द्वारे केलेला आहे  केलेला आहे. (Fig. 3 विशेषतः त्यातील लाल रंगाने दर्शवलेला भाग) 

 


Figure 3

जेव्हा जून महिन्यात पडणारा पाऊस सरासरीहून ३०% एवढा कमी असतो तेव्हा पावसाळ्यातील पाऊसही  सरासरीहून तितकाच कमी असण्याची शक्यता जास्त आहे. अर्थात ह्याला जोरदार अपवाद आहेत हेही आपल्याला दिसत आहे. (Table 1) 

 

Table 1: Maharashtra rainfall deviation from long-run average

दोन निष्कर्ष. पहिला – सरासरीचा विचार केला तर जेव्हा जून महिन्यात पावसात २५ ते ३५% घट असते तेव्हा जून-सप्टेंबर ह्या काळातील पाऊस सुमारे ११% ने कमी असतो. म्हणजेच जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर ह्या महिन्यात जूनमधील घट काही प्रमाणात भरून निघते, पण पूर्ण नाही. दुसरा – १९९२, १९९७, आणि २००८ ह्या तीन वर्षांतही जून महिन्यात पाऊस अशाच प्रकारे कमी होता. १९९२ आणि २००८ मध्ये जून-सप्टेंबर मधील पाऊस सरासरीहून २% ने कमी होता तर १९९७ साली तो सरासरीहून २% नी जास्त होता. म्हणजे नजीकच्या भूतकाळातील आकडे कमी निराशाजनक आहेत. 

जून-सप्टेंबरमधील पाऊस हे पाऊस बरा पडला का वाईट हे मापण्याचे एकमात्र एकक नाही. मागील काही वर्षांत ऑक्टोबर-डिसेंबर आणि त्या नंतरच्या महिन्यातही लक्षणीय पाऊस पडतो हे आपण पाहिलेलं आहे. दुसरं असं कि महाराष्ट्रातील पाऊस ही फारच काल्पनिक बाब आहे. कारण पाणी पुरवठ्याचे धोरणात्मक निर्णय हे प्रादेशिक किंवा महानगरी पातळीवर घेतले जातात. महाराष्ट्रात सरासरीएवढा पाऊस पडला तरी तो निम्म्या भागत सरासरीहून १०% अधिक आणि निम्म्या भागात सरासरीहून १०% कमी असू शकतो. तसंच, शेतीच्या उत्पादनाच्या दृष्टीने एकूण पाऊस ह्या इतकाच पाऊस केव्हा पडतो ही बाबही महत्वाची आहे. Scattered, erratic पाऊस जरी एकूण सरासरीएवढा पडला तरी त्यात येणारे शेती उत्पादन हे अपेक्षेपेक्षा कमी असू शकते. जागतिक पातळीवर अन्नधान्याच्या वाढत्या किंमती आणि भारतातील महागाईचा चढता आलेख हे लक्षात घेता शेती उत्पादन ही ह्या वर्षी अधिक कळीची बाब आहे. एकूण पाऊस हे ढोबळ एकक शहरांच्या पाणीपुरवठा गरजेलाच ठीकसे लागू पडते. ह्या मर्यादा लक्षात घेऊन वर दिलेले दोन निष्कर्ष लक्षात घेता येतील. त्यातून निघणारा सारांश हा कि शहरांच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने येता काळ कठीण असेल असेच भाकीत करावे लागेल, पण नजीकचा भूतकाळ लक्षात घेतला तर जून महिन्यातील तूट काही प्रमाणात पुढे जाऊन भरून निघते असे दिसते आहे. म्हणजे काही शहरांना पुढील वर्षभरात टंचाईच्या झळा बसतील तर काही शहरे विशेष तोशीस न होता बचावतील. पाणीटंचाई लक्षात घेऊन IPL महाराष्ट्रात व्हावी का न व्हावी, होळी खेळावी का न खेळावी ह्या प्रकारचे भावनोद्रेकी आणि अर्थमठ्ठ झगडेही पुनरुज्जीवित होतील. तोवर आपण पुढच्या वर्षीच्या काहिलीत आलेले असू.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विसंगत प्राणीदयेची समस्या

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

कसबा पेठ पोटनिवडणूक: मत न देऊन अवलक्षण?