श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

कालचा काळोख आणि आजचे दिवे

       रविवार २९ मे २०२२ च्या सुमारास र. धों. कर्वे ह्यांच्याबाबत आलेल्या लेखांच्या निमित्ताने सोशल मीडियात काही चर्चा झाली. ‘विवाहसंस्था आणि शरीरविक्रय व्यवसाय हे एकच आहेत’ अशा अर्थाच्या विधानाने बराच धुमाकूळ घातला. पाठीराखे आणि विरोधक ह्या दोघांच्याही मुद्द्यात असलेला क्षोभ, तिरकसपणा, किंवा भावनाहीन/राजकारणलेश बौद्धिक मांडणीचा अभाव असल्याने प्रकाश कमी आणि उष्णता जास्त अशीच अवस्था झाली.

https://www.artforum.com/print/previews/201507/sam-lewitt-more-heat-than-light-54611


       उपरोल्लेखित विधान हे ‘विवाहित स्त्री = सेक्सवर्कर स्त्री’ अशा अर्थाने अनेकांनी घेतले. तसेच आजच्या काळातील विवाहित स्त्री आणि आजच्या काळातील सेक्सवर्कर स्त्री ह्या सारख्याच आहेत असाही अर्थ लावण्यात आला. हे दोन्ही दृष्टीकोन चुकीचे आहेत. मुळातील विधान हे आजच्या काळातील परस्परपसंतीचे विवाह ज्या काळात अत्यंत नगण्य होते अशा काळातील समाजाला लागू पडणारे आहे. (माझ्या ह्या वाक्याचा अर्थ आज बहुतेक सारी लग्ने परस्पर निवड करून होतात असा नाही हे इथे वेळीच लक्षात घ्यावे.) विधानाच्या समर्थकांनीही लैंगिक स्वातंत्र्य, बळजोरी सहन न करावी लागणे अशा बाबींत वेश्या ही विवाहित स्त्रीहून बऱ्या अवस्थेत आहे/ असू शकते अशी मांडणी केली. पण ही मांडणी, तात्विकदृष्ट्या बरोबर असली तरी मूळ विधानाहून वेगळी ठरते, कारण त्यात काही मुद्द्यांवर शरीरविक्रय हा वैवाहिक कराराहून बरा ठरतो, पण मूळ विधानात दोन्ही समान अशी मांडणी आहे.

       शरीरविक्रय व्यवसाय आणि विवाहसंस्था ह्यातील समानता ही ‘स्त्रीला तिच्या अस्तित्वरक्षणासाठी आणि भौतिक सुखांसाठी पुरुषाशी काही एक करार करूनच रहायला हवे’ ह्या दृष्टीकोनातून आहे. (परत एकदा, मी केवळ हा दृष्टीकोन काय आहे हे लिहित आहे आणि तो बरोबर आहे असे म्हणत नाहीये.) ह्या दृष्टीकोनाच्या बाजूने काही एक विचार करणेही निखालस चूक आहे. पण समाज काही काळापूर्वी हा दृष्टीकोन बरोबर मांडला जात होता अशा मूल्यव्यवस्थेत होता आणि त्या मूल्यव्यवस्थेच्या अनुषंगाने हे विधान बरोबर ठरते. (कालचा काळोख) स्त्रीला संपत्तीत नसलेला अधिकार, तिला स्वतंत्रपणे उपजीविका करता न येणे अशा सामाजिक रचनेत भौतिक सुखोपभोगाच्या स्वाभाविक प्रेरणेने जगू पाहणाऱ्या स्त्रीला पुरुषासोबत स्वतःच्या स्त्री असण्याचे देवाणघेवाण संबंध ठेवणे हा एकच मार्ग होता. विवाह आणि शरीरविक्रय ह्या दोन्हीत स्त्री पुरुषाला तिच्या शरीराचा उपभोग देऊ करेल आणि त्याबदल्यात पुरुष तिला काही देऊ करेल असाच करार (अलिखित पण पाळला जाणारा) होत होता. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी समान ठरतात.

अशा अंधाऱ्या भूतकाळाच्या (ज्यांत अपवादांचे काजवे असतील कदाचित) तुलनेत आज बरेच दिवे आहेत. ह्या दिव्यांच्या प्रकाशात कालच्या काळोखाचा निष्कर्ष विसंगत वाटू शकतो. पण काल आणि आज मधला फरक लक्षात घेतला कि विधान नीट लक्षात येऊ शकते.

अर्थात ह्या कराराच्या बाबी, त्याची कालमर्यादा, त्यातील stakeholders अशा बाबतीत स्त्रीसाठी विवाह आणि शरीरविक्रय ह्या बाबी वेगळ्या ठरतात. पण दोन गोष्टी एका दृष्टीकोनातून समान असू शकतात आणि आणि दुसऱ्या दृष्टीकोनातून भिन्न असू शकतात. ही ‘बहुविधता अजून आपल्याला लक्षात येत नाही. आपण ‘एकविध दृष्टीने विचार करतो आणि क्षुब्ध होतो.

---

माझ्या लिखाणाचा उद्देश विवाहसंस्था आणि शरीरविक्रय ह्यांच्या बाबतीत सखोल तुलना करणे हा नाही. ह्या संदर्भातील चर्चेचे उदाहरण घेऊन मला दोन गोष्टी नोंदवायच्या आहेत.

१.      क्षोभहीन बौद्धिक मांडणी –भावनाविवशता, सिनिसिझम, प्रतिस्पर्धी बाजूवर डाव चढवणे-उलटवणे, आकर्षक शब्दरचना, रोचक, योग्य पण गैरलागू उदाहरणे/उपमा ह्यामुळे अनेकदा मूळ मुद्दा लक्षात येत नाही. अधिक समंजस/विवेकी, अधिक सुसंगत विचार वाढणे हा जो चर्चेचा उद्देश असतो तो बाजूला राहून थकवा आणणारा गोंगाटच निर्माण होतो.

क्षोभहीन बौद्धिक मांडणीचा अजून एक फायदा म्हणजे वेगवेगळ्या बाबींत काय सामाईक आणि काय वेगळे हे नीट समोर आणता येऊ शकते. भावनाशील बौद्धिक मांडणीत गैरसोयीचे निष्कर्ष टाळले जातात.

केवळ बौद्धिक (intellectual) दृष्टीनेच प्रत्येक विषयाकडे का बघावे ह्याला काही उत्तर नाही. भावना हे अधिक प्रबळ बल आहे ह्यांत वाद नाही. पण भावना एकमेकांना पोचवण्याचे कसब मानवाला पुरेसे अवगत नाही, आणि शब्द हे तर त्यासाठी फार तोकडे माध्यम आहे. पण आपण तात्विक मांडणी जशीच्या तशी एकाकडून दुसऱ्याला देऊ शकतो. भावनिक मांडणीचा फायदा हा असतो कि तुला जे कळले आहे ते मला म्हणायचेच नव्हते असे म्हणण्याची मुभा त्यात बहुतेकदा असतेच.

बौद्धिक आणि भावनिक मांडणीच्या मध्ये येते ती आकर्षक पण अपूर्ण बौद्धिक मांडणी. हा तसा डेंजरस प्रकार आहे, कारण त्यात अर्थ अचूक पोचण्यापेक्षा (प्रकाश) अन्य उष्ण परिणामच (वाद, वैयक्तिक टिपणी, संवाद तुटणे, क्षोभ) जास्त निर्माण होण्याची शक्यता असते. जर आपल्याला आपल्याला मान्य वैचारिक भूमिका अधिकाधिक लोकांना समजावी असे वाटत असेल तर हा आकर्षक रस्ता टाळायला हवा.

बौद्धिक मांडणीची गरज अमुक एका प्रकारच्या गटालाच आहे असे नाही. आधुनिक, व्यक्तिवादी म्हणवणाऱ्या लोकांनाही अनेकदा uncomfortable but logical निष्कर्ष मानवत नाहीत. उदाहरणार्थ आजही पुरुषसत्ताक व्यवस्था अस्तित्वात आहेच असे मानणाऱ्या व्यक्तीला आजची पुरुषसत्ताक व्यवस्था ही कालच्या पुरुषसत्ताक व्यवस्थेहून दुबळी आहे हा निष्कर्ष पचनी पडेल ह्याची शक्यता कमी वाटते. त्यांना आहे-नाही ची binary ही nuances of degrees हून अधिक भावणारी असू शकते.         

२.      बहुविधता

कोणतीही व्यक्ती, गट, सामाजिक रचना ह्यांच्याबाबत चांगले-वाईट अशा प्रकारचे एकच ठोक विधान करता येत नाही. अशा स्वरूपाच्या सामाजिक विधानाला अपवाद, मर्यादा, कालसंदर्भ असतात आणि त्या मर्यादांच्या मध्येच ते विधान खरे ठरते. किंवा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले असता आपला निष्कर्ष बदलता राहू शकतो.

आधुनिक कला, तत्वज्ञान ह्यांत ही बहुविधता लक्षात घेऊन व्यक्ती, गट, सामाजिक संस्था ह्यांबाबत घाऊक विधाने केली जात नाहीत. पण त्यामुळे अशी निर्मिती ही subtle बनते, आणि तिचा आस्वाद घेऊ शकणारे लोक मर्यादित होतात.

बहुविधतेची ही मर्यादा आहे. बहुविधता लक्षात घेतली कि कोणतेही विधान हे स्टोरी बनते, त्या स्टोरीच्या संदर्भात खरे असलेले. ही तशी उदास करणारी बाब आहे. आपल्या अस्तित्वाला, सामाजिक रचनांना, वैयक्तिक सुख-दुःखाना बुद्धिगम्य मूलभूत interpretation नाही तर परस्परविरोधी पण एकाचवेळी लागू पडू शकणाऱ्या निष्कर्षांचे सहअस्तित्व आहे हे समजणे म्हणजे ५ भागिले ० ही क्रिया समजण्यासारखे आहे.          

असो. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विसंगत प्राणीदयेची समस्या

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

कसबा पेठ पोटनिवडणूक: मत न देऊन अवलक्षण?