लोक, अनाहूत परिणाम, आणि सामाजिक हित
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
२ एप्रिल २०२२, म्हणजे गुढीपाडवा २०२२ पासून मागची २ वर्षे सक्तीचा असलेला मास्कचा वापर ऐच्छिक झालेला आहे. २०२१ मधल्या डेल्टा लाटेच्या आठवणी अजून तितक्या पुसट झालेल्या नाहीत. ही लाट यायच्या आधी, जानेवारी २०२१ च्या आसपास सुटलो ह्या महामारीच्या विळख्यातून असाच आपल्या सगळ्यांचा नूर होता. तसं वाटत होतं आणि डेल्टा लाट आली. अशा बोलाफुलाला गाठ कशाला अशा भावनेने आपण आता सुटलो महामारीच्या विळख्यातून असं म्हणायला धजावणार नाही. पण आपलं वागणं आपलं मोकळेपण दाखवतं आहेच.
लोकांचे वैयक्तिक निर्णय आणि
सामाजिक हित ह्यांच्यात काय संबंध असतो हे कळायला कोव्हीड काळातला मास्कवापर आणि
त्यासंबंधीचे निर्णय हे एक चांगले उदाहरण आहे. मुळांत मास्क ह्या वैयक्तिक
परीधानाबाबत सरकारला नियम का करायला लागला हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
मास्क
वापरणे हे कोव्हीड होण्याची शक्यता कमी करणे आहे हे बहुतेकांना कळत होते. जेव्हा
केसेस वाढत होत्या तेव्हा लोक मास्कही अधिक प्रमाणात, अधिक गांभीर्याने (डबल
मास्किंग, फेस शिल्ड इ.) वापरत होते. पण मास्क वापराचे परिणाम केवळ वापर करणाऱ्या
व्यक्तीपुरते मर्यादित नाहीत. माझ्या मास्कवापराचे किंवा न वापरण्याचे अनाहूत परिणाम
अन्य व्यक्तींवर होतात. पण मी माझ्या मास्क वापराचा निर्णय घेताना इतरांवर
होणाऱ्या अनाहूत परिणामांचा (externalities) फारसा विचार करत नाही, कारण त्याचा फायदा-तोटा मला
जाणवत नाही.
अनेकांना
असं वाटेल कि लोक त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांची तर काळजी करणारच ना! खरंय, लोक काळजी तर करतात, पण ती बरोबर पद्धतीने करतातच
असे नाही. जर माझ्या मास्कवापराची डिसिजन मी काळजीपूर्वक घेत असतो तर मी घरात कायम
मास्क वापरलाच असता. घराबाहेरून मला विषाणूसंक्रमण होण्याची कमी-जास्त काहीही शक्यता
असो, त्यातून पुढे माझ्या
कुटुंबियांना संक्रमण होऊ नये, म्हणून घरात मास्क घालणे हे इष्ट आहे. पण बहुतेकजण
घरात असताना मास्क वापरत नाहीत. कोव्हीडबाधित अनेक व्यक्तींत त्यांना विषाणू
संक्रमित करणारी व्यक्ती ही कुटुंबातीलच असण्याची शक्यता जास्त आहे. घरात असताना
मास्क हा संशयाचे लक्षण वाटतो आणि त्यामुळे आपण तो टाळतो. घराबाहेर, अनोळखी गर्दीत संशय हीच
वागण्याची तऱ्हा असल्याने कोणत्याही व्यक्तीचे मास्क वापरण्याचे प्रमाण वाढते.
जिथे अनाहूत परिणाम असतात तिथे खाजगी
निर्णय हे सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यक पातळीपेक्षा वेगळे असतात. कोव्हीड
महामारीच्या दृष्टीने सामाजिक हित म्हणजे काय तर विषाणूप्रसाराचा वेग हा आरोग्यव्यवस्था
कोलमडेल आणि अर्थचक्र ठप्प होईल इतका वाढू नये. जर मास्क वापरायचा का नाही हा
निर्णय लोकांवर सोडला असता तर विषाणूप्रसाराचा वेग, विशेषतः लाटेच्या उच्चतम भागांत,
जो आपण अनुभवला,
त्याहूनही अधिक असता. अर्थात हे प्रतितथ्य आपण अनुभवू शकत नाही, त्याचे केवळ अनुमान करू शकतो.
मास्कवापराचे असे अनाहूत परिणाम हे सरकारने मास्कबाबत काही नियम करण्याचे कारण
होते. सरकार
जेव्हा लोकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर काही निर्बंध लादू इच्छिते तेव्हा ‘लोकांच्या
निर्णयाचे अन्य व्यक्तींवर अनाहूत परिणाम’ हे एक मोठे कारण असते.
नियमपालनाचा भाग वगळता व्यक्तींच्या मास्कवापराचा
विचार केला तर आपल्याला असं दिसेल कि सजग (मास्क का हे लक्षात घेऊन वापरू शकणारे),
घाबरट (आसपासच्या केसेसअनुसार मास्क वापरणारे, पण ज्यांना मुळात तो लावायचा
नाहीये), आणि बेफिकीर (बेफिकीर किंवा मास्क लावल्याने येणारी अस्वस्थता ह्यामुळे
मास्क न वापरणारे) असे तीन प्रमुख प्रकार दिसतील. जर मास्कबाबत सक्ती नसती तर
पहिल्या आणि काही प्रमाणात दुसऱ्या गटानेच मास्क वापरला असता. सक्ती होती म्हणून
तिसरा गट मास्क सोबततरी बाळगत होता. पण मुळात मास्क वापरणं ही काही फारशी सुखद
किंवा हवीहवीशी बाब नाही. त्यामुळे मास्क वापरावेत का नाही हे लोकांनाच ठरवू दिलं
तर मास्कचा वापर सक्ती केल्यामुळे झाला त्याहून बराच कमी असता असंच म्हणता येईल.
व्यक्तीच्या दृष्टीने मास्क वापरणे हे
ह्यापुढे कदाचित कायमच किंवा पुढील काही काळ तरी हितावह असेल. पण सामाजिक हिताच्या
दृष्टीने मास्कसक्ती कायम असणे योग्य नाही. लाटेच्या चढत्या काळात जशी मास्कसक्ती
योग्य आहे, तसे
लाटेच्या,
महामारीच्या उतरत्या किंवा स्थिर काळात काहीकाळ तरी मास्कसक्ती नसणे आवश्यक आहे. मास्कसक्ती
हटवल्याने कदाचित कोव्हीड केसेस परत वाढतील किंवा एखाद्या नव्या व्हेरीएंटचा
प्रादुर्भाव लवकर सुरु होईल असे मानले तरीही सामाजिकदृष्ट्या ते फायद्याचे आहे. कारण
नजीकच्या भविष्यातील कोव्हीड केसेस वाढणे म्हणजे त्याहून पुढच्या भविष्यातील
कोव्हीड केसेस घटणे. नजीकच्या भविष्यात लाट यायची शक्यता कमी असताना तिथे थोड्या
केसेस वाढणे हे त्यापुढे येऊ शकणाऱ्या लाटेतील काही केसेस कमी करण्यासारखे असणार
आहे. सामाजिकदृष्ट्या बऱ्याच काळ थोड्या केसेस आणि एखादी आपले नियमित जीवन ठप्प
करणारी लाट ह्यापेक्षा कमी संख्येने सातत्याने येत राहणाऱ्या केसेस ही आपल्याला
समाज म्हणून अधिक स्वीकारार्ह आहे. जर करोनाविषाणूच्या नव्या नव्या आवृत्या येतच
राहणार असतील तर आपल्याला थोड्या प्रमाणात तरी केसेस सापडत राहतील हे मानूनच चालावे
लागेल.
मास्कवापर
आणि मास्कसक्ती ह्यांच्यात नेमका काय संबंध होता? लोक मास्कसक्तीमुळे मास्क वापरत होते का? काही प्रमाणात ह्याचं उत्तर ‘हो’ असं आहे. दंड होण्याच्या
भीतीमुळे, प्रवेश
नाकारले जाण्याच्या भीतीमुळे मास्क वापरला जात होता. पण अनेकदा हा मास्कवापर दिखाऊ
असतो. लोक मास्क किती गांभीर्याने घेतात हे बघायचं असेल तर जिथे अप्रिय परिणामांची
भीती नाही तिथे लोक कसे वागतात हे पाहिलं पाहिजे. अशा प्रसंगांचा विचार केला तर
हनुवटीवर,
गळ्यावर स्थिरावलेला मास्क हेच मास्कवापराचे प्रातिनिधिक उदाहरण होते.
अगदी
वैयक्तिक अनुभव म्हणजे जानेवारी २०२२ च्या सुरुवातीला लोकलट्रेनमध्ये प्रवास
करताना एका प्रवाश्याला खोकल्याची ढास लागली. ह्या प्रवाश्याने मास्क घातलेला होता, तो खोकताना तोंडावरून खाली
सरकवला. त्याच्या आजूबाजूच्या ज्या प्रवाश्यांचे मास्क तोंडावर नव्हते त्यांनी ते
तोंडावर आणण्याची तसदी घेतली नाही. लोकांना मास्क वापर किती कळत होता ह्याच्या
गांभीर्याचे हे अजून एक उदाहरण.
म्हणजे बहुतेक
लोकांना स्वतःमुळे इतरांवर होणारे आणि इतरांकडून आपल्यावर होऊ शकणारे अनाहूत
परिणाम फार कळत नाहीत. परिणामी त्यांच्या खाजगी/वैयक्तिक निर्णयातून समजाचे अहित
होण्याची/पुरेसे हित न होण्याची शक्यता असते. त्यामुळे paternalistic होत
शासनाला सक्ती करणे आवश्यक ठरते. सक्ती कशी राबवली जाते ह्यावर लोकांचे वर्तन किती
बदलेल हे ठरते. पण पुरेसे अप्रिय परिणाम असणारी आणि पुरेश्या संभाव्यतेने राबवली
जाणारी सक्ती ही लोकांच्या वर्तनात लक्षणीय बदल आणू शकते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा