श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

वर्क फ्रॉम होमचे शेवटचे काही दिवस? - Revealed preferences काय सांगतात

  लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा आता आपले कसे जग बदलून जाईल अशा थाटाची अनेक भाकिते केली जात होती. मी स्वतःसुद्धा काही प्रमाणात असे काही आमूलाग्र बदल होतील अशी अपेक्षा करत होतो. पण आता ६ महिन्याच्या कालावधीनंतर असे आमूलाग्र बदल झाले असल्याची काही चिन्हे नाहीत. सेम ओल्ड, सेम ओल्ड अशाच अवस्थेकडे आपण परत चाललो आहोत असं दिसतंय. 

ह्या सेम ओल्ड, सेम ओल्डचाच एक भाग म्हणजे वर्क फ्रॉम होम. अनेकजण जे मार्चचा मध्य ते मे किंवा जून ह्या काळांत वर्क फ्रॉम होम करत होते त्यांना आता प्रत्यक्ष कामावर जावे लागत आहे. जानेवारी २०२१ मध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचे प्रमाण जानेवारी २०२० मध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांहून फार जास्त असेल का? अर्थात कोव्हीड-१९ चा मृत्यूदर आणि त्यातील त्रासाचे (रुग्णालय मिळणे, अशक्तपणा) ह्याचे प्रमाण किती वाढते ह्यावर काय होते हे अवलंबून आहे. पण मागच्या सहा महिन्यांचा ट्रेंड पाहता आपण कोव्हीड-१९ पूर्वीच्या अवस्थेकडे झपाट्याने परततो आहोत अशीच सारी चिन्हे आहेत. एकएक करून कोव्हीड-१९ पूर्व काळातील बहुतेक गोष्टी करण्यावर असलेली बंधने कमी होत आहेत. त्यामुळे जानेवारी २०२१ पर्यंत बरीच बंधने सैलावलेली असतील असे मानणे फार चुकीचे होणार नाही. 

बहुतेक कर्मचाऱ्यांना परत प्रत्यक्ष ऑफिसेसमध्ये जावे लागेल ह्यांत नवल काही नाही. वर्क फ्रॉम होम हे कंपनीच्या दृष्टीने प्रत्यक्ष ऑफिस चालवण्यापेक्षा कमी खर्चिक आहे. (जागा आणि अन्य खर्चातील बचत ह्यामुळे. तुलनेने कर्मचाऱ्यांना घरात कामाच्या सोयी उपलब्ध करून द्यायचा खर्च कमी आहे. अर्थात ही बचत फार नाही असे ह्या लेखात स्पष्ट केलेले आहे.)  मग ही खर्च वाचवणारी बाब फायदा मिळवायला जागरूक असलेल्या कंपन्या कोव्हीड-१९ यायच्या आधी का करत नव्हत्या? कारण वर्क फ्रॉम होमची उत्पादकता कमी आहे! खर्चात होणाऱ्या घटेपेक्षा उत्पादनातील घट जास्त असल्याने कंपन्या वर्क फ्रॉम होम देत नाहीत. 

वर्क फ्रॉम होममध्ये उत्पादकता कमी आहे ह्यांत दोन बाबी आहेत. पहिली म्हणजे, आपल्यातील बहुतेकजण हे दट्ट्या आणि बक्षीस ह्यांवर चालणारे प्राणी आहेत.  कर्मचारी आणि त्यांचे employer ह्यांच्यात हे दट्ट्या आणि बक्षीस नातेच असते. हा दट्ट्या देणे हे वर्क फ्रॉम होममध्ये कठीण आहे. अर्थात कर्मचाऱ्याला कामाच्या वेळेत सतत पाहू शकणारा आणि त्याच्या उत्पादकतेला जोखू शकणारा एखादा AI निर्माण झाला तर ही अडचण राहणार नाही. पण म्हणजे हे कर्मचाऱ्यांना दिवसाचे काही तास डिजीटल तुरुंगात टाकल्यासारखे होईल. 

दुसरी बाब म्हणजे लाभाच्या आशेने प्रेरित स्वहिताची काळजी करणारी माणसे ही एकत्र आली तर त्याच्या सुट्ट्या सुट्ट्या उत्पादकतेपेक्षा अधिक जास्त उत्पादक ठरतात. लोक एकमेकांचे बघून शिकतात, एकमेकांच्या असूयेने नवे काही करायला बघतात, एकमेकांच्या मैत्रीने दुसऱ्यांच्या उणीवा पूर्ण करतात. वर्क फ्रॉम होममध्ये हे घडण्याची शक्यता कमी होते. डिजिटल माध्यमातील परस्परसंपर्क हा प्रत्यक्ष परस्परसंपर्काहून प्रचंड तोकडा आहे. त्यामुळे कंपन्यांचा स्वाभाविक प्राधान्यक्रम हा प्रत्यक्ष ऑफिस चालवायचा आहे. 

कोव्हीड-१९ ची परस्परव्यक्ती संपर्कामुळे पसरण्याची भीती आणि mass transport चा अभाव ह्या कारणाने कंपन्यांना वर्क फ्रॉम होम वापरावे लागले. जशी ही भीती कमी होईल आणि mass transport परत सुरू होईल तसे वर्क फ्रॉम होम बंद होईल. 

वर्क फ्रॉम होमची चर्चा ही कोव्हीड-१९ मुळे झालेली आहे असे नाही. १९९० च्या दशकांत इन्टरनेट आणि दळणवळण क्रांती घडत असताना अंतरांना काही अर्थ उरणार नाही, शहरांच्या अस्तित्वाला विशेष अर्थ उरणार नाही, जिथे फायबर optics ची रेघ पोचेल तिथे सर्वच पोचेल, मग अशा व्यक्तीला प्रवासाची काय गरज अशी विधाने होत होती. प्रत्यक्षात असं काही घडलेलं नाही. शहरे अजून दाट आहेत, दैनंदिन प्रवास लांब किंवा वेळखाऊ झालेले आहेत. अंतर ही नगण्य नाही तर प्रीमियमची बाब आहे. प्रवासात-अंतरात-रांगेत कमीत कमी वेळ घालवणं हे तुमच्या प्रतिष्ठेचे लक्षण होते, आता किंबहुना अधिक आहे.

अर्थात वर्क फ्रॉम होम हे १९९० पेक्षा २०२० मध्ये अधिक टक्के कर्मचारी करतात. पण हे प्रमाण फार जास्त नाही. आणि वर्क फ्रॉम होम हाच कामाचा पूर्णपणे करायचा पर्याय नसतो. प्रत्यक्ष काम आणि काही भाग वर्क फ्रॉम होम अशा पद्धतीनेच काम चालते. काही विशेष कामे आहेत ज्यांत पूर्णतः घरून काम केले जाते. ही कामे फार थोडी आहेत आणि अनेकदा अशी व्यक्ती ही एखाद्या कंपनीची कर्मचारी नसून कराराने बांधील असते. 

केवळ कंपन्याच नाही तर कर्मचारीसुद्धा वर्क फ्रॉम होमपेक्षा प्रत्यक्ष काम करू इच्छितील, जर त्यांचा घर ते ऑफिस हा प्रवासाचा वेळ वाचला. कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होमचे प्राधान्य हे commuting मुळे आहे. वर्कप्लेसमधील सहकारी आणि वातावरण हे कदाचित लोकांना घरात काम करण्यापेक्षा अधिक हवेहवेसे आहे, पण प्रवास नकोसा आहे. जसे वर्क फ्रॉम होम संपेल तसे हा प्रवास करणे परत भाग पडेल. 

केवळ वर्क फ्रॉम होम नाही तर इतर अनेक बदलही केवळ कोव्हीड-१९ जसा मागे सरेल तसे परत मागे पडतील. मी काही उदाहरणे घेतो. IIT ने केलेला व्हर्चुअल दीक्षांत समारंभ, ऑनलाईन शिक्षण ही दोन उदाहरणे पाहू. 

व्हर्चुअल दीक्षांत समारंभ करायला लागणारे तंत्रज्ञान हे काही कोव्हीड-१९ नंतर शोधलेले नाही. ते अस्तित्वात होते आणि ह्या तंत्रज्ञानाने केलेला व्हर्चुअल समारंभ हा प्रत्यक्ष समारंभापेक्षा किफायतशीर आहे. २०१९ सालीही असा व्हर्चुअल दीक्षांत समारंभ करणे शक्य होते. 

https://content.techgig.com/iit-bombay-concludes-virtual-convocation-with-e-avatars-of-students-receiving-certificate/articleshow/77736477.cms


तेच ऑनलाईन शिक्षणाचे आहे. ऑनलाईन शिक्षण हे करायला लागणारे तंत्रज्ञान हे मागच्या काही वर्षांपासून आहे. आणि शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांना एकत्र आणण्याच्या खर्चाहून हे तंत्रज्ञान किफायतशीर आहे. कोर्सेरावरील MOOC अशाच स्वरूपाचे तंत्रज्ञान वापरतात. (अर्थात त्यांची लेक्चर live नसतात, पण live लेक्चरला इन्टरनेट ही अधिक महत्वाची गोष्ट आहे, लेक्चर प्रक्षेपित करण्याचे तंत्रज्ञान ही नव्हे.) पण मार्च २०२० पर्यंत जगातील अग्रगण्य विद्यापीठे त्यांचे नावाजलेले अभ्यासक्रम प्रत्यक्षच शिकवत होते. 

दीक्षांत समारंभ, कॉन्फरन्स अशा कार्यक्रमांचे दोन उद्देश असतात: माणसांची प्रत्यक्ष गाठभेट आणि प्रवासाची संधी (विशेषतः कॉन्फरन्स, स्वतःचे पैसे खर्च न करता!) व्हर्चुअल पर्याय ह्यातला पहिला उद्देश काही प्रमाणात सफल करतो आणि दुसरा अजिबातच नाही. ऑनलाईन शिक्षण ह्यांत अनेक पैलू आहेत. तो एका वेगळ्याच लेखाचा विषय होईल.  

ह्या उदाहरणांचा मुद्दा हा आहे कि वर्क फ्रॉम होम, व्हर्चुअल मीटिंगचे पर्याय, ऑनलाईन शिक्षण असे अनेक पर्याय आपण जे कोव्हीड-१९ काळांत वापरले ते कोव्हीड-१९ च्या पूर्वीही वापरणे शक्य होतं आणि हे पर्याय किफायतशीरही आहेत. जेव्हा एखादी कृती करणे किफायतशीर असते आणि शक्य असते पण तरीही ती कृती केली जात नाही आणि महागडी कृती केली जाते तेव्हा त्याचा अर्थ असतो कि ती किफायतशीर गोष्ट कमी गुणवत्तेची आहे. ह्यालाच revealed preference म्हणतात. एखादा मनुष्य आय-फोन वापरत असेल तर तो त्याच्यालेखी विवो कमी गुणवत्तेचा आहे असा निष्कर्ष काढता येतो. त्याच न्यायाने वर्क फ्रॉम होम, व्हर्चुअल मीटिंग, ऑनलाईन शिक्षण हे सारे त्यांच्या प्रत्यक्ष पर्यायांहून कमी गुणवत्तेचे आहे असे म्हणता येते. आज आपण ह्या गोष्टी वापरत आहोत कारण जास्त गुणवत्तेची गोष्ट करणे शक्य नाही म्हणून. जशी ती शक्य होईल तसे आपण हे पर्याय वापरणे सोडून देऊ. 

ह्यांत काय विशेष असं अनेकांना वाटेल आणि ते स्वाभाविकही आहे. मागच्या ६ महिन्यातले बदल टिकणार नाहीत हे भाकीत काही फार अनपेक्षित नाही. असे भाकीत करणे हे ह्या ब्लॉगचा उद्देश नाही. ह्या पोस्टचा उद्देश 'जर एखादी कृती शक्य असेल आणि फायदेशीर असेल तर ती होते आणि जर एखादी किफायतशीर कृती होत नसेल तर त्याचा अर्थ त्या कृतीतून सरस पर्याय उपलब्ध आहे' हे जगातील अनेक गोष्टींच्या पाठी असणारे व्यवहारी सत्य (empirical truth) दर्शवणे हा आहे. अनेकदा आपण अशा व्यवहारी सत्यांकडे दुर्लक्ष करून एकदम झालेल्या बदलांनी चकित होऊन पुढे जाऊन खोटी ठरणारी भाकिते करतो, पण ही व्यवहारी सत्ये फार जोरदार असतात आणि बहुतेक बदलांना ती आपल्या ताकदीवर विशिष्ट आकार देतात. ह्याचा अर्थ असा नाही की बदल करता येत नाहीत. नक्की करता येतात, पण व्यावहारिक सत्याला धरून, त्याला दुर्लक्षून नाही. 

ऑनलाइन शिक्षण, गावाकडे परत गेलेले स्थलांतरित ह्यांबद्दलच्या चर्चात अनेकदा ही व्यावहारिक सत्ये दुर्लक्षित होतात आणि आखलेल्या योजना प्रत्यक्षात येत नाहीत किंवा तोंडघशी पडतात. अशी काही उदाहरणे आपण पुढच्या काही पोस्टमध्ये पाहू. तोवर वर्क फ्रॉम होमचे उरलेले काही दिवस आनंदात घालवावेत! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विसंगत प्राणीदयेची समस्या

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा