श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

अपुऱ्या टेस्टिंगने केसेस घटतात का? - नाही!

मार्च २०२०, म्हणजे कोव्हीड-१९ महामारीची साथ भारतात दाखल झाल्यापासून 'पुरेश्या टेस्ट्स होत नाहीत' हे विधान आपण अनेकांकडून ऐकलेलं/वाचलेलं आहे. सुरुवातीला हे विधान काहीसे खरेही होते. एखाद्या गोष्टीचा पुरवठा पुरेसा आहे का नाही ह्याचे लक्षण म्हणजे ज्या किमतीला ती गोष्ट (वस्तू/सेवा) विक्रीला आहे आणि त्या किमतीला विकत घेऊ शकणाऱ्या,  ज्या लोकांना ही वस्तू/सेवा विकत घेण्याची कायदेशीर मुभा आहे  त्या,  कोणालाही ती मिळत असेल तर पुरवठा पुरेसा आहे असं म्हणता येतं. कोव्हीड-१९ च्या साथीच्या सुरुवातीच्या काळात टेस्ट्स करू पाहणारे जास्त आणि टेस्ट्सचा पुरवठा कमी अशी अवस्था होती आणि त्यामुळे हा पुरवठा सरकारनेच नियंत्रित केलेला होता. 
मार्केटव्यवस्थेत टंचाई हा पुरवठादारांसाठी सिग्नल असतो कि त्यांनी पुरवठा वाढवावा. आपण अनुभवलं आहे कि मास्क, sanitizer ह्यांच्या बाबतीत सुरुवातीला टंचाई होती आणि त्यानंतर पुरेसा पुरवठा बाजारात आला. हेच टेस्टिंगसाठीही झालेलं आहे. मार्च २०२० च्या तुलनेत आज RT-PCR टेस्ट करणे, ती विकत घेऊ शकणाऱ्यासाठी सहज शक्य आहे आणि ह्या महागड्या टेस्टला स्वस्त पण कमी गुणवत्तेचा असा antigen टेस्टचा पर्यायही आलेला आहे. 

असं असतानाही १५ ते २० सप्टेंबरच्या दरम्यान जेव्हा भारतातील अनेक राज्यांतील कोव्हीड-१९ च्या केसेसची दुसरी लाट ओसरत होती तेव्हा 'पुरेश्या टेस्ट्स होत नसल्याने केसेस घटत आहेत' अशा स्वरुपाची विधाने वाचायला मिळत होती. हे विधान गोंधळात टाकणारे आहे. 
आजच्या घडीला टेस्टिंग हे मार्केटमध्ये विक्री होणाऱ्या सेवेसारखे आहे. त्याला मागणीची बाजू आहे आणि पुरवठ्याची बाजू आहे आणि हा पुरवठा फायद्याच्या उद्देशाने कार्यरत भांडवलाकडून होत आहे. अशा अवस्थेत पुरेश्या टेस्ट्स होत नाहीत ह्याचा अर्थ दोन प्रकारे घेता येईल. पहिला अर्थ, की टेस्ट्स करण्याची मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे टेस्ट्स कमी झालेल्या आहेत. दुसरा, टेस्ट्सचा पुरवठा कमी झालेला आहे. पुरवठा कमी होणे हे अशक्य नाही. टेस्टिंगसाठी लागणारे साहित्य महागणे हे टेस्टिंगचा सध्या नक्की केलेल्या किमतीला होणारा पुरवठा कमी होण्याचे कारण असू शकते. पण जर लोकांची टेस्टिंगची डिमांड तेवढीच असेल आणि पुरवठा कमी झाला असेल तर आपल्याला अशा अवस्थेची काही चिन्हे दिसतील. पहिले म्हणजे लोक त्यांचा असंतोष मांडू लागतील. सोशल मिडिया आणि अत्यंत सक्षम पारंपारिक मिडिया ह्यांमध्ये असा शहरी मध्यमवर्गाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न दुर्लक्षित राहणे फारसे शक्य वाटत नाही. दुसरे, कि जर टेस्ट्सचा पुरवठा कमी झाला तर टेस्टिंग करणाऱ्या एजन्सीस, सरकार, रुग्ण हे ज्यांची टेस्ट्स आवश्यक आहे अशांचीच करावी अशा पद्धतीच्या वापर निकषाकडे येतील, जो आपण सुरुवातीच्या टंचाईच्या काळात वापरतच होतो. ज्यांना लक्षणे आहेत, जे हाय-रिस्क (निकटचे) संपर्क आहेत अशांचीच चाचणी होईल. त्याचा परिणाम म्हणजे TPR (test positivity ratio) अर्थात positive टेस्ट आणि एकूण टेस्ट्स ह्यांचे गुणोत्तर वाढेल. 

मी महाराष्ट्राचे उदाहरण घेऊन नेमके काय झाले असावे ह्यावर थोडा प्रकाश टाकायचा प्रयत्न करतो. 

आकृती १ 

                                     
आकृती २
 
आकृती १ मध्ये हे आपल्याला स्पष्ट दिसते आहे कि सप्टेंबर २० च्या शेवटच्या आठवड्यांत महाराष्ट्रातील दैनिक चाचण्यांची संख्या (आकृतीचा १ चा डावीकडील अक्ष) घटत आहे. दररोजच्या १ लाख चाचण्या ते दररोज ७५०००  चाचण्या अशी जवळपास २५% ची घट झालेली आहे. पण चाचण्या घटत असताना TPR (आकृती १ चा उजवीकडील अक्ष) हाही घटलेला आहे. चाचण्या घटलेल्या आहेत पण TPR वाढलेला नाही ह्याचा अर्थ चाचण्यांचा पुरवठा घटलेला नाही. आणि पुरवठा घटणे किंवा मागणी घटणे ही दोनच कारणे शक्य असल्याने मागणी घटणे हेच टेस्ट्स घटण्याचे कारण आहे असे मानायला लागेल. 
टेस्ट्सची मागणी घटणे ह्याची दोन कारणे आहेत. एक, लोकांची क्रयशक्ती घटणे किंवा टेस्ट्सची गरज घटणे. लोकांची एका आठवड्यांत फार झपाट्याने घटली असणे हे अशक्य आहे. म्हणजेच टेस्ट्सची गरज घटली असणे हेच मागणी घटण्याचे कारण असावे. आणि ही चांगलीच बाब आहे! टेस्ट्सची मागणी ही कोव्हीड-१९ च्या प्रसाराशी सम प्रमाणात निगडीत आहे. टेस्ट्सची मागणी घटली आहे म्हणजे कोव्हीड-१९ चा प्रसार घटला आहे. आणि हे विधान थोडे जास्तच आशावादी वाटले तरी ते बरोबर असण्याची शक्यता बरीच आहे. कोव्हीड-१९ मुळे होणारे मृत्यू हे कोव्हीड-१९ च्या प्रसाराचे अधिक अचूक लक्षण आहे. आणि आकृती २ मध्ये हे स्पष्ट दिसते कि केवळ positive केसेस नाहीत तर मृत्यूसुद्धा सप्टेंबरच्या मध्यापासून घटलेले आहेत. परिस्थिती अजून गंभीर असली तरी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत ती सुधारली आहे असे म्हणावेच लागेल. म्हणजे महाराष्ट्रातील कोव्हीड-१९ ची दुसरी लाट ओसरली आहे हा टेस्ट्सच्या कमतरेतेने वाटणारा आभास नाही तर वास्तव आहे असेच म्हणावे लागेल. आणि महाराष्ट्रातच नव्हे तर कुठेही  जर आपल्याला TPR हा वाढता दिसत नसेल तर टेस्टिंग कमी होणे हे साथ घटत असल्याचेच लक्षण मानायला लागेल. 
आजच्या घडीला भारतात टेस्टिंग अपुरे आहे असे वाटत नाही. ज्याला परवडेल त्याला लक्षण असो का नसो टेस्ट करणे शक्य आहे. त्यामुळे 'टेस्टिंग अपुरे आहे म्हणून केसेस कमी होत आहेत' ह्या विधानात तथ्य नाही. खरेतर ह्या विधानात केव्हाही तथ्य नव्हते. टेस्टिंग अपुरे (म्हणजे मोफत आणि अमर्यादित नसण्याचा) असण्याचा परिणाम म्हणजे जेवढ्या लोकांपर्यंत विषाणू पोचतो त्याच्या काही प्रमाणातच केसेस दिसून येतात. त्यामुळे टेस्टिंग अपुरे असल्याने संपूर्ण विषाणूप्रसार लक्षात येत नाही आणि हे केसेस वाढताना खरे आहे आणि केसेस घटतानाही. 
टेस्टिंगचा संबंध हा विषाणूप्रसारापेक्षा आजाराशी आहे. जर आजारी व्यक्ती वाढत असतील तर टेस्टिंगची मागणीही वाढती राहील आणि न कोलमडलेल्या मार्केट अर्थव्यवस्थेत आणि उत्पादन घटक अनुपलब्ध आहेत अशी अवस्था नसेल तर ह्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देणारा त्याच दराचा किंवा महाग पुरवठा येईल. मुबलक पुरवठा असताना जर खरेदी घटत असेल तर त्याचा अर्थ मागणी घटते आहे हाच असतो. आणि कोव्हीड-१९ टेस्टिंगच्या बाबतीत मागणी घटणे हे लक्षणे दाखवणाऱ्या आजारी व्यक्तींची संख्या घटणे ह्यामुळेच होण्याची शक्यता आहे. लोक बेफिकीर झाले आहेत, दरिद्री झाले आहेत, सरकार टेस्टिंगबाबत उदासीन आहे, टेस्टिंग महागडे आहे ही बाकी कारणे असू शकतात, पण विचार केला असता ती खरी नाहीत हे लक्षात येईल. कमी टेस्टिंग हा कोव्हीड-१९ चे रुग्ण (जे विषाणूबाधित लोकांचा एक छोटा गट आहे) कमी होण्याचा परिणाम आहे, कारण नव्हे. 










 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विसंगत प्राणीदयेची समस्या

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा