कोव्हीड-१९ पूर्व जगण्याकडे एक एक पाउल आणि डेटामधले धोक्याचे बावटे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
५ ऑक्टोबर २०२० पासून महाराष्ट्रातील रेस्टॉरंट आणि बार्स ह्यांना त्यांचा प्रत्यक्ष (होम-डिलिव्हरी) व्यतिरिक्त व्यवसाय सुरू करायला परवानगी देण्यात आलेली आहे. कोव्हीड-१९ च्या छायेतील हा व्यवसाय कसा करावा ह्याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केलेल्या आहेत. ह्या मार्गदर्शक सूचना ह्या निष्फळ होतील असं मला वैयक्तिक निरीक्षणातून वाटतं. जून-जुलैपासून जी दुकाने सुरू झालेली आहेत त्यांच्यासाठीही अशी मार्दर्शक तत्वे आलेली होती. माझ्या आसपासच्या अशा दुकानांच्या निरीक्षणात मला असं दिसलं आहे कि औषधाची दुकाने सोडली तर बाकी दुकाने ही मास्क आणि काही प्रमाणात hand-sanitizer ह्यापलीकडे काही काळजी घेत नाहीत. लोक एकमेकांपासून काही सेमी अंतरावर, प्रसंगी खेटूनही उभे असतात आणि कित्येक जण मास्कही लावत नाहीत, अनेक जण चुकीच्या पद्धतीने लावतात.
औषधांच्या काही दुकानांत तर प्लास्टिक पडद्याडूनच व्यवहार चालू आहे. त्यांनी ही खबरदारी अर्थातच स्वतःच्या risk-assessment मधून घेतलेली आहे. औषध दुकानात विषाणूबाधित व्यक्ती यायची शक्यता जास्त आहे आणि त्यामुळे अशी दुकाने सर्वात जास्त काळजी घेतील हे तसे साहजिक आहे.
रेस्टॉरंट आणि बार्सच्या बाबतीत माझा अंदाज असा आहे कि वर म्हटल्याप्रमाणे मास्क एवढेच मार्गदर्शक तत्व तिथे दिसण्याची शक्यता आहे. बाकी टेबलांच्या मध्ये सुरक्षित अंतर, ग्राहकांची नोंदणी, ग्राहकांचे स्क्रीनिंग ह्या बाबी अशा आहेत कि त्या ज्यांना पाळायच्या आहेत ते पाळतील आणि ज्यांचा ग्राहकवर्ग हा तुलनेने बेफिकीर आहे ते पाळणार नाहीत. हे नियम पाळले जातील का नाही ह्यासाठी लक्ष ठेवणारे लोक हे तेच आहेत ज्यांवर कोव्हीड-१९ च्या आधीच्या काळांत नियमांवर लक्ष ठेवायची जबाबदारी होती. लक्ष ठेवणारे लोक जितके जास्ती तितका लक्ष ठेवणाऱ्यावर लक्ष ठेवण्याचा प्रश्न मोठा आणि एकूणच दुर्लक्ष व्हायची शक्यता जास्त. मुंबईतील आणि विशेषतः मुंबई महानगराच्या शहरी-ग्रामीण वेशीवरील बार्समध्ये 'मार्गदर्शक तत्वांचे' पालन होणे हे अशा भागांत लोकांनी हेल्मेट घालून दुचाकी चालवणे जितके शक्य आहे त्याहून थोडे जास्त शक्य असेल असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. हा अंदाज खोटा ठरून 'मार्गदर्शक तत्वे' पाळली गेली तर मला सपशेल हरायचा दैवी आनंद मिळेल 😄
![]() |
लोकांच्या वागण्याची आणि धोक्याच्या व्यक्तिगत अंदाजाची झलक दाखवणारी एक सुप्रसिद्ध प्रतिमा |
ह्या नमनाच्या निगेटिव्ह तेलानंतर आपण थोड्या चिकित्सक दृष्टीकोनाकडे येऊया.
मला माझ्या आजूबाजूच्या दुकानांत त्या त्या दुकानांसाठी असलेल्या मार्गदर्शक तत्वांची तुटपुंजी अंमलबजावणी दिसते ह्याचं पहिलं कारण म्हणजे भारतातील शहरांत असलेला बांधीव स्पेसचा अभाव आणि लोकसंख्येची घनता. आणि दुसरं कारण म्हणजे लोकांच्या स्वतःच्या धोकाचाचपणीमध्ये असलेली कोव्हीड-१९ चा दुकानांत परस्पर संपर्कात आल्याने होऊ शकण्याबाबत असलेली नगण्य धोका. आणि ह्यातले दुसरे कारण, जे लोकांनी केवळ त्यांच्या निरीक्षणातून शोधलेले आहे, आचरणात आणलेले आहे, ते कितपत बरोबर आहे ह्याबाबत काही इंटरेस्टिंग अभ्यास नुकताच उपलब्ध झालेला आहे.
३० सप्टेंबर २०२० ला 'सायन्स' ह्या शोधपत्रिकेत (जर्नल) रामनन लक्ष्मीनारायणन आणि सहकारी संशोधकांचा शोधनिबंध प्रसिद्ध झालेला आहे. (ही मूळ रिसर्चची लिंक आणि ही हा रिसर्च सोपेपणाने समजावून देणाऱ्या एका लेखाची लिंक) तामिळनाडू आणि आंध्र येथील कोव्हीड-१९ च्या चाचणीत positive आढळलेल्या व्यक्ती आणि त्यांचे संपर्क ह्यांचा मार्च २०२० ते जुलै २०२० अशा ४ महिन्यांचा सुमारे पावणेसहा लाख व्यक्तींच्या डेटा अभ्यासून काढलेले काही निष्कर्ष ह्या शोधनिबंधात आहेत. त्यातला एक कळीचा निष्कर्ष म्हणजे
सार्वजनिक ठिकाणी विषाणूबाधित व्यक्तीच्या निकट (१ मीटरहून कमी) संपर्कात आलेल्या आणि मास्क न लावलेल्या व्यक्तींत विषाणूसंक्रमणाचा धोका सरासरी २८% आहे तर मास्क लावून संपर्कात आलेल्या व्यक्तीत २% आहे.
इथे संक्रमण म्हणजे RT-PCR चाचणीत नक्की झालेला विषाणू. दुकानांत विषाणूबाधित व्यक्ती मास्कशिवाय येणे ह्याची शक्यता जर फार जास्त नसेल तर अशा ठिकाणच्या गर्दीतून विषाणूप्रसाराचा धोका सरासरी बराच कमी होते. मुळांत वर उल्लेखलेल्या संशोधनानुसार जवळपास ७१% विषाणूबाधित व्यक्तींनी अन्य कोणत्याही व्यक्तीला संक्रमण केले नाही असे दिसून आलेले आहे. म्हणजे केवळ विषाणूबाधित नाही तर जो प्रसारक आहे अशा बाधिताच्या संपर्कात यायची शक्यता किती ह्यावर संक्रमण अवलंबून आहे. त्यामुळे लोकांचे वरकरणी बेफिकीर वाटणारे वागणे हे खरेतर त्यांनी आपसूक केलेली धोक्याची चाचपणी फारशी चूक नसल्याचेच दर्शवते.
ह्यांत तसे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. बरेच लोक बराच काळ स्वहिताच्या विरुद्ध वागणे फारसे शक्य नसते. म्हणजेच बरेच लोक बराच काळ अमुक एक प्रकारे वागत असतील तर ते वागणे स्वहिताचे असण्याची शक्यताच जास्त असते. (उदा. पाल्याला इंग्लिश माध्यमाच्या शाळेत दाखल करणे!) तेच इथे आहे. लोकांची एक किमान धोक्याची पातळी असते आणि त्यावर धोका जात नाही तोवर त्याला ते प्रतिसाद देत नाहीत. धोक्याच्या पुराव्याचा प्रत्यक्ष अनुभव बदलला कि ते प्रतिसाद बदलतात. लोकांना कोव्हीड-१९ धोकादायक आहे ह्याबाबत शंका नाही, बहुतेकजण मास्क सोबत घेऊन आहेत. पण त्याचा प्रसार फार वेगवान आहे आणि बाजारातही होऊ शकतो असे वाटण्याजोगे आचरण फार थोड्यांचे आहे, कारण असा अनुभव आलेले फार थोडे आहेत!
एकूणच कोव्हीड-१९ च्या बाबतीत भारतातील अवस्था ही प्रत्यक्षाहून एक्स्पर्ट उत्कट (मीही अपवाद नाही!) अशी आहे. रोगाचा तडाखा हा त्याची सुरुवातीला ही 'महामारी' अशी भीती व्यक्त केली गेली होती त्याहून कमी बसलेला आहे. एखाद्या व्रात्य मुलाने पालकांचा २० मिनिटे ओरडा खायची तयारी करावी आणि पालकांनी ५ मिनिटात ओरडणे थांबवावे असे झालेले आहे. ह्याची कारणे काय हे काही वर्षांनीच कळेल. (अनेक मृत्यू दडवले जात आहेत ह्यावर माझा विश्वास नाही. जळी-स्थळी सोशल मिडियामध्ये अनेक मृत्यू अनेक महिने दडवले जातील हे फारच अशक्य आहे.) असो.
तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील कोव्हीड-१९ च्या प्रसारातील अभ्यासातून आलेला अजून एक निष्कर्ष म्हणजे
वाहनांमध्ये बाधित व्यक्तीच्या ३ ओळी पुढे-मागे बसलेल्या आणि बाधित व्यक्तीसोबत ६ तासांहून अधिक प्रवास केलेल्या व्यक्तीत संक्रमणाची शक्यता ८०% आहे.
इथे मास्कचा परिणाम काय आहे ह्याबाबत स्पष्टता नाही. ९ बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ७८ पैकी ६३ व्यक्ती ह्या पुढे बाधित निघाल्या. इथे प्रवास हा विमानप्रवास असावा आणि हे ९ जण हे सुरुवातीचे (मार्च २०२०) मधील परदेशप्रवासी असावेत. असे असेल तर त्यांनी मास्क घातला असण्याची शक्यता कमीच आहे.
ह्या निष्कर्षाचा विचार रेस्टॉरंट आणि लोकलट्रेन ह्याबाबत केला जाऊ शकतो. लोकलट्रेन काही प्रमाणात मागचे साडेतीन महिने सुरू आहेत. आणि त्यांत गर्दीही होऊ लागल्याच्या बातम्या मध्ये आल्या. जर लोकलट्रेनमुळे झपाट्याने विषाणूप्रसार होत असता तर आपल्याला त्याची काही लक्षणे लोकांच्या वागण्यात दिसली असती. वर दिलेल्या निष्कर्षाचा विचार केला तर लोकलप्रवास हा तुलनेने खेळत्या हवेचा, कमी वेळेचा आणि मास्क वापरणाऱ्या प्रवाश्यांचा आहे. त्यामुळे लोकलप्रवासाची विषाणूप्रसाराची रिस्क ही बरीच कमी असू शकते!
महाराष्ट्र शासनाने लोकलप्रवासी आणि contact tracing चा डेटा ह्यांचा 'योग्य' संशोधकांकडून अभ्यास करून घेऊन किंवा हा डेटा संधोधानाला योग्य पद्धतीने (पर्सनल तपशील वगळून) खुला करून त्यावर आधारित धोक्याच्या अंदाजानुसारच लोकलट्रेन सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. खरंतर महाराष्ट्रातील contact tracing चा डेटा अजून संशोधनाला वापरला गेला नाही (अद्याप मोठा रिसर्च पेपर नाही म्हणजे वापरला गेला नसेलच!) हीच आश्चर्याची बाब आहे.
रेस्टॉरंट आणि विशेषतः बार्स इथे व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात काही तास असू शकतात, जवळजवळ असू शकतात आणि त्यांचे मास्कही उतरलेले असू शकतात, आणि मद्याच्या अंमलाखाली त्यांची धोक्याकडे बघायची दृष्टीही गंडलेली असू शकते. त्यामुळे symposium (वैचारिक नव्हे, तर अक्षरक्षः ) अर्थात सहमद्यपान कितीही आनंददायी असले तरी कोव्हीड-१९ च्या प्रसाराच्या दृष्टीने धोकादायक असेल अशीच शक्यता आहे. अर्थात fingers crossed!
कोव्हीड-१९ पूर्व जगण्याकडे परत जाण्यातला एक मोठा निर्णय आहे तो म्हणजे शाळा आणि कॉलेजेस! शोधनिबंधात वयोगटानुसार विषाणूप्रसाराच्या शक्यतेची चाचपणी आहे. त्यानुसार
५-१७ वयोगटातील बाधितांकडून ५-१७ वयोगटातील अन्य कोणाला संक्रमण झाले असे ११% वेळा झालेले आहे. त्यांत निकट किंवा थेट संपर्कात १८% आणि कमी धोक्याच्या संपर्कात ५% आहे. निकट किंवा थेट संपर्काचे निकष म्हणजे शारीरिक संपर्क, वस्तू संपर्क, ३ ओळी पुढे-मागे ६ तासांहून अधिक असणे इत्यादी. ५-१७ वयोगटातील बाधितांकडून १८ व वरील वयातील लोकांना संक्रमण होण्याची शक्यताही ५% हून अधिकच आहे.
अर्थात इथे मास्क किती उपयोगी आहे आणि बाधित विद्यार्थी शाळेत यायची शक्यता किती आहे ह्या दोन गोष्टी आपल्याला माहित नाहीत. शाळांची वेळ कमी करणं, होईल तेवढे वर्ग खुल्या जागेत घेणं, विद्यार्थ्यांना सम-विषम पद्धतीने शाळेत बोलावणं अशा उपायांनी संभाव्य धोका कमी केला जाऊ शकतो. पण डेटा जे सांगतो आहे ते फारसं आश्वासक नाही. ५-१७ वयोगटात मृत्यूदर अत्यंत कमी आहे, पण हा गट प्रसारासाठी कारणीभूत ठरू शकणारा आहे हे स्पष्ट आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबात जेष्ठ नागरिक असतात आणि त्यामुळे शाळा सुरू करणं ही कठीण बाब ठरणार आहे. शाळेच्या परिसरात Sero-survey करणं किंवा २०% विद्यार्थ्यांच्या rapid tests दर एक दिवसाआड करत राहणं हा एक उपाय असू शकतो.
तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील ह्या अभ्यासातून आलेला एक महत्वाचा निष्कर्ष मांडून मी थांबतो.
जितक्या लवकर विषाणूचे कन्फर्मेशन तितका बाधित व्यक्तीला धोका कमी. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील कोव्हीड-१९ च्या मृत्यूत ५०% मृत्यू हे चाचणीनंतर सरासरी ६ किंवा कमी दिवसात झालेले आहेत आणि १८% हे एक दिवसात किंवा मृत्यूपश्चात चाचणी झालेले आहेत. जगातील अन्य देशांच्या डेटानुसार विषाणूचा शरीर प्रवेश आणि संभाव्य मृत्यू ह्यांत साधारण २ आठवडे असण्याची शक्यता आहे. ह्याचाच अर्थ अनेक रुग्ण जे रोगाला बळी पडतात ते बऱ्याच उशिरा उपचार सुरू करत असावेत.
वर उल्लेखलेल्या लोकांच्या कोव्हीड-१९ च्या प्रसाराच्या वेगाला कमी मानण्याचा जो व्यक्तिगत अंदाज आहे त्याचाच परिणाम उपचारांना उशीर हा आहे. मला विषाणूसंपर्क आणि त्यातून गंभीर आजार होण्याची शक्यता कमी आहे हा अंदाज जरी सरासरी बरोबर असला तरी आजाराची लक्षणे दिसू लागल्यावर त्यातून मरण ओढवायची शक्यता नगण्य आहे हा अंदाज बरोबर नाही. अगदी थोड्या संशयावरही उपचार घेणे हाच सरस मार्ग आहे. पण योग्य तिथे निवांत आणि योग्य तिथे सावध असे वर्तन फार थोड्या व्यक्तींना स्वाभाविकपणे जमते. मग कायम सावध हाच योग्य पवित्रा ठरतो. पण सतत सावध राहणे हे मानसिकदृष्ट्या महागडे असते आणि त्यामुळे अनेकांना तसे करता येत नाही.
हा आपल्यासमोरचा पेच आहे. लाख मरोत पण लाखांचे पोशिंदे अर्थचक्र फिरो हे आपण ठरवलं आहे. कोव्हीड-१९ आपला खोळंबा करणार आहे, पण रस्ता बदलावा एवढा फरक समाजाला आणि पर्यायाने त्याच्या नेतृत्वाला पडलेला नाही (१ लाख कोव्हीड-१९ मृत्यू होऊन!). पण आता एक एक निर्बंध शिथिल करताना लोकांकडून सावध वर्तनाची किंवा शासनाने मार्गदर्शक तत्वांची कठोर अंमलबजावणी करण्याची फार शक्यता दिसत नाही. येतील त्या केसेसना आवश्यक आरोग्यसुविधा देणं हाच आता आपला समाज म्हणून प्रतिसाद आहे. व्यक्ती म्हणून काय करायचं हे मात्र तुमच्या-माझ्या हातात आहे, अर्थात प्रत्येक निवडीची किंमत असतेच. अर्थशास्त्राची हीच विद्रुपता आणि नजाकत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा