श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

१५०+ जागांचा पाठमोरा क्लेम आणि थोडी गमतीशीर आकडेमोड

 माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी युती केली नसती तर २०१९ च्या महाराष्ट्र निवडणुकीत १५० हून अधिक जागा भाजपला मिळाल्या असत्या असं विधान नुकतंच केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार भाऊ तोरसेकर, जे  एक लोकप्रिय राजकीय समालोचक आहेत, त्यांची भाकिते खरी ठरतात आणि त्यांनी जर युती नसेल तर १५०+  असं भाकीत केलं होतं म्हणून असं झालं असतं. (त्यांनी युतीला २००+ जागा वर्तवल्या होत्या असं फडणवीस स्वतः व्हिडीओमध्ये म्हणतात. प्रत्यक्षात तसं झालेलं नाही!) 

सौजन्य: विकिपीडिया 


खरोखर काय घडलं असतं हा फारच रोचक पण काहीही प्रत्यक्ष महत्व न उरलेला विषय आहे. पण मला हा क्लेम आकड्यांशी खेळायला इंटरेस्टिंग वाटला. २०१४ ला भाजप-शिवसेना वेगवेगळे लढले, पण त्यांचे विरोधी पक्षही वेगळे लढत होते. २०१९ ला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे एकत्र लढत होते. त्यामुळे एकटे लढलो असतो तर १५० हून अधिक जागा मिळाल्या असत्या हा पाठमोरा क्लेम मला थोडा फुगीर (exaggerated) वाटला. कारण २०१४ ला चौरंगी लढतीत भाजपला १२२ जागा होत्या. तिरंगी लढतीत त्या १५० हून अधिक झाल्या असत्या हे थोडं अतिशयोक्त वाटतं, एक पक्ष म्हणून भाजप २०१४ पेक्षा २०१९ ला प्रबळ होता असं मानलं तरी. 

निवडणुकांच्या निकालाचा तपशीलवर डेटा उपलब्ध आहे. त्याचा वापर करून हा क्लेम तपासावा असा ह्या ब्लॉगचा उद्देश आहे. 

मी असा विचार केला कि २०१४ च्या निवडणुकीत हे दोन पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यामुळे मतदारांमध्ये ह्या पक्षाचे वेगवेगळे असे किती मतदार आहेत ह्याच्या प्रमाणाचा एक अंदाज ह्या निवडणुकीच्या निकालाने आपल्याला मिळतो. मग मी असं गृहीतक ठेवलं कि २०१९ च्या निवडणुकीत एखाद्या विधानसभा मतदारसंघात (शिवसेनेचे) भाजपाचे जे मतदार होते त्यांनी आपलं मत जर मतदारसंघात शिवसेनेचा (भाजपचा) उमेदवार आहेत त्याला दिली.  आता मला जर २०१९ ची निवडणूक भाजप आणि शिवसेना ह्यांनी वेगवेगळी लढवली असती तर त्यांना किती किती मते मिळाली असती ह्याचा आडाखा बांधायचा आहे. त्यासाठी मी सोपं सूत्र बनवलं. 

२०१९ ला भाजप स्वतंत्र लढता तर मिळालेली मते = २०१४ च्या निवडणुकीत भाजप + शिवसेना मतांत भाजपचे प्रमाण X २०१९ च्या निवडणुकीत युतीला मिळालेली मते 

असंच सूत्र मी शिवसेनेच्या मतांसाठीही वापरलेलं आहे.  बाकी पक्षांची मते जशी असती तशीच राहिली असती असे मी मानलेले आहे. मला बाकीही काही छोटी गृहीतके वापरावी लागतात. 

  1.  भाजप २०१४ आणि २०१९ दोन्ही वेळेला एखाद्या मतदारसंघात लढला नसेल तर तिथे २०१९ ला भाजप स्वतंत्र लढता तरी ० मते मिळतील असे मानलेले आहे. असाच आडाखा शिवसेनेच्या मतांना लावलेला आहे. 
  2. २०१४ साली भाजप लढला नव्हता आणि शिवसेना होती, पण २०१९ साली भाजप लढला तर अशा मतदारसंघातही भाजप स्वतंत्र लढता तर ० मते मिळवता असे मानलेले आहे आणि युतीची सारी मते शिवसेनेला दिलेली आहेत. असाच आडाखा शिवसेनेच्या मतांना लावलेला आहे. 

ही जी 'जरतर' मते आहेत ती वापरून आपल्याला असे आकडे मिळतात. ते स्वतंत्र जिंकले असता १५०+ च्या अंदाजाशी जुळणारे नाहीत. ४८ मतदारसंघात भाजप स्वतंत्र लढता तर हरला असता आणि ३ मतदारसंघात जिंकला असता. म्हणजे एकूण जागा १०५ ने घटून ६० वर आल्या असत्या. 

ह्यांत तसं आश्चर्य काही नाही. २०१४ ला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हेही स्वतंत्र लढले होते. २०१९ ते एकत्र लढले. त्यामुळे युतीच्या मताची विभागणी झाल्यावर दुसऱ्या क्रमांकाची मते भाजप किंवा शिवसेना ह्यांच्या स्वतंत्र मताहून जास्त ठरतात, जी बहुतेकदा राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसची आहेत. (१२७ ठिकाणी) 
हा अर्थात अत्यंत क्रूड असा आडाखा आहे. जर दोन्ही पक्ष वेगवेगळे लढणार असते तर त्यांनी निवडणुकांची रणनीतीच वेगळी ठेवली असती. हे वेगळेपण पकडायला मी थोडी जटील आकडेमोड केली. २०१४ सालच्या  लोकसभा निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात युतीचा काय शेअर होता हे आपल्याला कळू शकतं. मी असं गृहीतक घेतलं कि २०१४ ची लोकसभा ते २०१४ ची विधानसभा ह्यांत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात युती  ते भाजपच्या मतदान टक्केवारीत जे प्रमाण होतं तेच २०१९ ची लोकसभा आणि जर भाजप २०१९ ची विधानसभा स्वतंत्र लढता तर राहिलं असतं. 
उदा. विधानसभा मतदारसंघ १ अक्कलकुवा येथे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युतीला ४६.२३ % मते होती आणि २०१४ च्या विधानसभेत भाजपला १८.६८% मते होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीला ह्या विधानसभा मतदारसंघात ४५.२९% मते होती. मग सध्या त्रेराशिकाने विधानसभा २०१९ भाजप स्वतंत्र लढता तर त्याचा मतटक्का १८.३०% असता. अशाच पद्धतीचा बदल शिवसेनेच्या टक्क्यातही केलेला आहे. ह्या त्रैराशिक त्रांगड्याचा अर्थ एवढाच आहे कि मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीकडे वेगवेगळ्या दृष्टीने बघतात. २०१४ साली असा प्रयोग एकदा झाला होता आणि त्यांत आपल्याला लोकांचे प्रेफरन्स कसे बदलतात ह्याची झलक मिळालेली होती. मग हाच होरा २०१९ ला लावला तर? 
हा नवा अंदाज वापरला तर भाजपला ८६ जागा मिळत्या. १७ जागी, न लढवलेल्या किंवा हरलेल्या जागी भाजप निवडून येता आणि ३६ जागी जिथे युती म्हणून जिंकला तिथे भाजप म्हणून हरला असता. 

दोन्ही अंदाजानुसार भाजप युतीमध्ये जिंकलेल्या १०५ जागांपेक्षा कमी जागांवर जिंकला असता असाच अंदाज येतो. ह्याचं मुख्य कारण म्हणजे एकत्रित विरोधक. अर्थात हा केवळ आकडेवारी आणि गृहीतकांवर आधारित आडाखा आहे.  ह्यांत काही फार सखोल राजकीय सत्य किंवा टिपणी नाही. अजून गृहीतके आणि आकडेवारीचे नवे पैलू लक्षात घेतले तर हा अंदाज बदलेलही. पण तो १५०+ घडलं असतं हे कठीणच वाटतं आहे. 
   


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विसंगत प्राणीदयेची समस्या

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा