वसाहतवादाच्या काळ्या ढगाची रुपेरी कड - १९ व्या शतकातला एक तक्ता आणि ब्रिटीशांची रेल्वे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लेखक:- धवल जोशी
अनेकदा आपल्याला सोशल मीडियावर इंग्रजांच्या राज्याविरोधात काही ना काही तपशील मिळतात. यावेळी निमित्त होते ते इंग्रजांनी भारतात निर्माण केलेल्या रेल्वेच्या जाळ्याचे. १८५१ साली पहिली रेल्वे भारतामध्ये धावली होती आणि त्यानंतर त्याचे जाळे भारतभर वाढतच गेले. सोशल मीडियावर आलेल्या त्या व्हिडिओचा आशय काहीसा असा होता:
‘इंग्रजांनी भारताला ट्रेनचे जाळे दिले हे काही लोक कौतुकाने मांडतात, पण त्यामुळे भारताचे आर्थिक शोषणच झाले आहे हे अनेकांना उमगत नाही.’
पुढे जाऊन तो व्हिडीओ हे शोषण किती पटीने झाले ही मांडणी करतो. सोशल मीडियातून असे व्हिडीओ वेगाने पसरतात आणि त्यातून ब्रिटिशांनी जे काही केले त्यातून शोषणच झाले असा एकदम सोपा संदेश दिला जातो. पण तपशीलात जाऊ पाहता जे घडले त्याचा निष्कर्ष एवढा सोपा नाही.
इंग्रजांनी भारताचे आर्थिक नुकसान अथवा शोषण केले ह्यांत वाद नाही. पण हे नुकसान तोटा ह्या स्वरूपाचे नाही, तर होऊ शकला असता त्याहून कमी फायदा झाला अशा स्वरूपाचे आहे. रेल्वेचा वापर करून भारताची जी आर्थिक उन्नती झाली असती ती झाली नाही, त्याहून कमी झाली, कारण रेल्वेचा वापर भारताच्या नव्हे तर ब्रिटनच्या समृद्धीसाठी केला गेला. पण रेल्वे नसती तर भारताची आर्थिक प्रगती रेल्वे असलेल्या भारताहून अधिक झाली असती असे आपल्याला म्हणता येत नाही. अर्थात म्हणता येत नाही म्हणजे झालीच नसती असेही नाही. हा प्रश्न अनिर्णीत आहे असं म्हणायला लागेल. पण रेल्वे असणं हे भौतिक प्रगतीसाठी रेल्वे नसण्यापेक्षा चांगलं आहे असं म्हणायला खूप वाव आहे. त्यामुळे विचार करू पाहणाऱ्या भारतीयाने ब्रिटीश वसाहतवादाकडे बघताना थोडा सूक्ष्म दृष्टीकोन ठेवायला हवा.
ब्रिटीशांच्या तांत्रिक सुधारणांनी जे आर्थिक परिणाम भारतावर व्हायचे ते झाले. दळणवळण वाढले कि आर्थिक समृद्धी वाढते आणि ब्रिटिशांनी दळणवळण सुधारल्याने भारताची आर्थिक समृद्धी वाढली. पण जर भारतीयांनी भारतीयांसाठी दळणवळण सुधारणा वापरल्या असत्या तर जी भारताची आर्थिक घोडदौड झाली असती ती न होता भारताचा मंदगती आर्थिक विकास झाला, कारण ब्रिटीश भारतातले दळणवळण हे ब्रिटनच्या हितासाठी होते. पण त्याचवेळी ह्या योजनांचे जे चांगले आर्थिक परिणाम व्हायचे ते त्या त्या प्रमाणात झालेच.
यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच वाचलेला डोनाल्ड अटवूड या मानववंशशास्त्रज्ञाने लिहिलेला एक लेख आठवला. ह्या लेखात अशी मांडणी होती की १९व्या शतकाच्या शेवटी आणि २०व्या शतकाच्या सुरवातीला दख्खनच्या प्रदेशात (पश्चिम भारत-पश्चिम महाराष्ट्र) अनेक धरणं झाली आणि त्यातून निर्माण झालेल्या कालव्यांच्या जाळ्यामुळे शेतीतील उत्पादकता काही प्रमाणात स्थिरावली आणि त्याचा परिणाम येथील अन्न सुरक्षिततेसाठी झाला. अन्नसुरक्षेचा एक पैलू म्हणजे धान्यांच्या किंमतीत मर्यादित उतार-चढाव असणे. किंमतीतील उतार-चढाव मर्यादित असणे हे मागणीच्या तुलनेत योग्य तेवढा पुरवठा असल्याचे दर्शवते. अन्नाची मागणी ही दरसाल सावकाश वाढते. त्यामुळे अन्नधान्याच्या स्थिर किंमती ह्या प्रामुख्याने तुलनेने स्थिर पुरवठा दर्शवतात. तर या विषयाचा मागोवा घेतांना डोनाल्ड १९व्या शतकातील काही घटना मांडतात. त्यातील एक पुढील तक्त्यात आहे.
वरील तक्ता हा सोलापूर येथील बाजारामध्ये ज्वारी आणि बाजरीच्या भावाचा १८२० ते १९१० या काळातील चढउतार दर्शवतो. बॉम्बे प्रोव्हिन्सचे तेव्हाचे डायरेक्टर ऑफ ऍग्रीकल्चर कीटिंग यांनी १९१२ मध्ये हा तक्ता बनवला. यामध्ये दिसते त्याप्रमाणे १८२० ते १८६०-७० च्या काळामध्ये या दोन्ही महत्वाच्या धान्याच्या भावामध्ये खूप चढउतार दिसतो. पण त्यानंतर मात्र तो बऱ्यापैकी स्थिरावतो. यामागे अनेक कारणे मांडता येतील, पण एक महत्वाचे कारण म्हणजे १८६० नंतर भारतभरात आणि विशेषतः या प्रदेशात निर्माण झालेले ट्रेनचे जाळे. इरफान हबीब हे इतिहासकार मांडतात तसे रेल्वेच्या आधीच्या काळामध्ये खूप प्रमाणात धान्याची ने - आण करणे शक्य नसायचे म्हणून लोक स्थलांतरित व्हायचे. पण त्याला मर्यादा होत्या-राज्याच्या, दळण-वळणाच्या साधनांच्या. कार्ल मार्क्स यांनी १८५३ मध्ये नोंदवलेले हे टिपंण देखील दुष्काळ आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या अन्नधान्याचा तुटवडा याचा संबंध मांडते-
‘हे खूपच भयंकर आहे की भारताची उत्पादकता निव्वळ मालाला वाहून नेण्याची व्यवस्था नसल्याने सडते आहे. जेव्हा हा विषय हाऊस ऑफ कॉमन्स च्या १८४८ च्या बैठकीत आला तेव्हा हे सिद्ध झाले की खान्देशात जेव्हा ६ ते ८ पैसे ह्या भावाने धान्याची विक्री होत होती तेव्हा पुणे प्रांतात ६४ ते ७० पैसे हा भाव होता आणि म्हणून पुणे प्रांतातील अनेक लोक उपासमारीने मरत होती. याचे कारण निव्वळ दळण-वळणाची साधने प्रस्थापित न झाल्यामुळे होय.’
भारताला जगातील इतर अनेक प्रदेशांप्रमाणे दुष्काळाचा मोठा इतिहास आहे. कोरडवाहू शेती असल्यामुळे त्याचा थेट परिणाम हा शेतमालाच्या स्थानिक उत्पादकतेवर होत असे. पण शेतमाल एक भागातून दुसऱ्या भागात वाहून नेणाच्या अडचणींमळे अधिक उत्पादन झालेल्या भागातील धान्य कमी स्थानिक उत्पादन झालेल्या भागाकडे नेणे कठीण होई आणि त्यातून दुष्काळाची भीषणता वाढे. रेल्वेने ही भीषणता कमी करण्याची शक्यता निर्माण केली. वरील तक्ता आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वेचे महत्व पटवून देतो. त्यानंतर देखील अनेकदा दुष्काळाला सामोरे जावे लागले पण या रचनेमुळे त्या दुष्काळी परिस्थितीचे व्यवस्थापन नीट होऊ शकले.
जेव्हा आपण इतिहासाकडे बघतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला वर्तमानाला घडवणारे अनेक धागे सापडतात. काहीच वर्षांपूर्वी याचे उच्चबिंदू म्हणावे अशी घटना म्हणजे लातूरला रेल्वेने चक्क पाणी नेण्यात आले. ब्रिटिशांनी आणलेल्या रेल्वेने भारतातील भूभाग हे लोक आणि संसाधने ह्यांच्या वाहतुकीने जोडले गेले आणि त्यातून कोरडवाहू देशातील प्रश्न सोडवायची क्षमता वाढली. हा नक्कीच फायदा होता.
रेल्वेने भारतीयांचे भौतिक जीवन सुधारण्याच्या अनेक शक्यता निर्माण केल्या हे एक साधे तांत्रिक सत्य आहे, वरील तक्ता तेच दर्शवतो. अर्थात रेल्वेची निर्णयक्षमता ही ब्रिटीशांकडे होती आणि त्यांनी ती उघडपणे भारतीयांच्या नुकसानासाठीही वापरली असण्याची शक्यता भरपूर आहे. पण हा रेल्वेचा दुष्परिणाम नाही, हे साधन वापरणाऱ्या वसाहतवादी दृष्टीचा आहे, जी निःसंशय माणसाच्या शोषणाशी निगडीत आहे आणि त्याज्य आहे.
धवल जोशी ह्यांचा इमेल dhavalgy@gmail.com
संदर्भ
Attwood, D. W. (2005). Big is ugly? How large-scale institutions prevent famines in Western India. World Development, 33(12), 2067-2083.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा