श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

नवे शैक्षणिक धोरण २०२० आणि इंग्रजीतून शिक्षण

नवे शैक्षणिक धोरण २०२० अर्थात NEP 2020 हा सध्या चर्चेचा विषय आहे. हे गेमचेंजर धोरण आहे अशा स्वरुपाची स्तुती ह्या धोरणाबाबत होते आहे. (मला ह्या धोरणाची PDF पण जरा शोधायला लागली. कोणाला हवी असेल तर इथे आहे.
    शिक्षणाच्या अनेक पैलूंवर ह्या नव्या योजनेत काही ना काही निर्णय आहेत. त्यातल्या शिक्षणाची भाषा (Medium or language of instruction) बद्दल काही त्रोटक निरीक्षणे मी इथे नोंदवणार आहे. प्रामुख्याने Twitter वर इंग्रजी-प्रादेशिक भाषा ह्यांच्याबद्दलच्या चर्चेची राळ उडाली होती. आणि नेहमी असतं तसं मुळात काय म्हटलं आहे ह्याबाबत नीट माहिती न देता बहुतेक लोक आपले निष्कर्ष देत होते. 

पॉलिसि ड्राफ्टमधले वाक्य (पान १२ वर)
Wherever possible, the medium of instruction until at least Grade 5, but preferably till Grade 8 and beyond, will be the home language/mother-tongue/local language.
असे आहे. Wherever possible वापरून इथे सरकारने हे स्पष्ट केलं आहे कि सक्ती नाही. म्हणजेच सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून शिक्षण घेण्यावर सरकारने कोणताही बदल केलेला नाही. Wherever possible मध्ये possible ठरवण्याचा अधिकार आणि क्षमता कोणाला आहे हेही स्पष्ट नाही. 

त्यामुळे ५ वी पर्यंत शिक्षण मातृ/प्रादेशिक भाषेत असं नव्या धोरणात आहे असं नाही. प्रादेशिक भाषा/मातृभाषा कशी थोर, प्रादेशिक भाषा/मातृभाषा ह्यातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कठीण संकल्पना लवकर समजतात वगैरे नेहमीचे राग आळवलेले आहेत, पण ५ वी पर्यंत शिक्षण हे मातृभाषेतूनच होईल असा काहीही नियम केलेला नाही. केलंत तर बरं एवढंच म्हटलेलं आहे. 


शिक्षणभाषा काय असावी ह्याबाबत अनेक प्रवाद, समज प्रचलित आहेत. आणि त्या मानणाऱ्या किंवा न मांडणाऱ्या बाजूने त्यांना पुराव्याने सिद्ध करण्याचा किंवा खोडण्याचा फार प्रयत्न केलेला नसतो. त्यातले काही समज-प्रवाद असे:
  1. प्रादेशिक भाषा/मातृभाषा ह्यातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कठीण संकल्पना लवकर समजतात
  2. ज्याला प्रादेशिक भाषा/मातृभाषा चांगली येते त्याला इंग्रजीही चांगली येते 
  3. इंग्रजी माध्यमातून शिकणे ही भौतिक-आर्थिक-सामाजिक उन्नतीची शिडी आहे. 
आता हे पाहू कि समजा हे समज/प्रवाद तपासायचे असतील तर काय अभ्यास करावा लागेल?  
तर, एकाच आर्थिक पार्श्वभूमीच्या आणि पालकांचे शिक्षणही समान असलेल्या विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे. एकाला मातृभाषेतून शिक्षण आणि दुसऱ्या गटाला इंग्रजीतून शिक्षण द्यायचे. असे अनेक ठिकाणी, म्हणजे १०० एक ठिकाणी करायचे. आणि मग सांख्यिकीच्या निकषांनी ह्या दोन गटातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा फरक तपासायचा. 

आज आपण जर एखाद्या शहरातील इंग्रजी आणि मराठी माध्यमातील विद्यार्थी ह्या तुलनेनं घेतले तर ती चुकीची तुलना असेल.  विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती ही पालकाचे शिक्षण, उत्पन्न संपत्ती, सहाध्यायी, शिक्षक, जे शिकवले गेले ते आणि निसर्गदत्त क्षमता ह्यावरून ठरते. (हे घटक केवळ आठवले तसे लिहिले आहेत, ते ह्याच क्रमाने महत्वाचे असतात असे नाही.) अनेकदा आपल्याला इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी अधिक यशस्वी वाटतात ह्याचं कारण इंग्रजी माध्यमापेक्षा पालक हे असते. मराठी माध्यमात पाल्याला दाखल करणारे पालक हे इंग्रजी माध्यमात दाखल करणाऱ्या पालकांपेक्षा वेगळे असतात आणि हे वेगळेपण पाल्याच्या भवितव्यावर अधिक परिणाम करते, ना कि शिक्षणभाषा. 

समजा एखाद्या शहरातील ६ वर्षाच्या सर्व बालकांना सोडतीद्वारे वेगवेगळ्या शाळांत दाखल केलं, म्हणजे खाजगी, सरकारी, इंग्रजी, मराठी, तर ह्या बालकांची प्रगती मोजून आपल्याला शिक्षणभाषेच्या प्रश्नावर अधिक प्रकाश टाकता येईल. पण अशी सोडत ठरवली तर त्याने काय हलकल्लोळ माजेल ह्याची कल्पना आपण सहज करू शकतो. 

आपल्याकडे फारसा चांगला पुरावा नसताना आपण शिक्षणभाषेच्या प्रश्नावर फारसे काही बोलू शकत नाही. पण म्हणून मार्केट थांबत नाही. आजच्या घडीला शिक्षणभाषा हा self-fulfilling prophecy सारखा प्रकार आहे. सधन, महत्वाकांक्षी पालक आपल्या पाल्यांना काही शाळांत एकत्र आणतात इथेच त्या शाळांचा performance बराच सुधारतो, आणि बघणारा ह्या शाळांत, ह्या शाळा ज्या भाषेत शिकवतात त्यात विद्यार्थ्यांना दाखल केले कि ते प्रगती करतात असा चुकीचा निष्कर्ष काढतो. 

इंग्रजी-प्रादेशिक ह्या शिक्षणभाषेच्या  मुद्द्याच्या अनुषंगाने मला हे तीन प्रश्न मांडावेसे वाटतात, ज्यांचा अधिक अभ्यास होणं गरजेचं आहे. 
  1. महाराष्ट्रातील अ-मराठी भाषिक कुटुंबातील पाल्य मराठी माध्यमात कमी असतात. अशा विद्यार्थ्यांची मराठी किती बरी किंवा वाईट असते आणि का? 
  2. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेहून वेगळ्याच भाषेत शिकावे लागते. हे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या देशांतील शाळांत कशी कामगिरी करतात? 
  3. इंग्रजीचे आज भारतात दिसणाऱ्या resurgent nationalism मध्ये असलेले योगदान. हिंदुत्ववादी संघटना आणि संस्कृतप्रचुर हिंदी हा जुना संबंध आहे. पण आज अनेक तरुण हिंदुत्ववादी भारतीय मांडणीकडे आकर्षित झाले आहेत त्यात इंग्रजीचे मोठे योगदान आहे. इंटरनेटवर प्रभावी इंग्रजीतून आपले टोकदार विचार मांडणारे conservative right-wing विचारवंत हा force to reckon बनला ह्याचे एक कारण म्हणजे  त्यांच्याकडे असलेले इंग्रजीचे सामाईक माध्यम.

माझा असा होरा आहे कि आज भारतात ज्या सुप्रसिद्ध उच्च शिक्षणाच्या संस्था आहेत तेथे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी हे भारतातील इंग्रजी माध्यमाच्या शालेय शिक्षणाच्या प्रमाणाहून जास्त असावेत. माझा वैयक्तिक अनुभव तरी असा आहे. तसंच इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या व्यक्तीचे सरासरी उत्पन्न हे प्रादेशिक माध्यमांहून जास्त असावे. असे काही अभ्यास मिळाले तर मी ते ह्या पोस्टमध्ये अपडेट करेन. 

शिक्षण हे पालकांच्या उत्पन्न- बौद्धिक आणि मानसिक क्षमता-संपत्ती ह्यातील असमानता दूर करून दर नव्या पिढीला संधीची समानता निर्माण करून देणारे असावे ही शिक्षणाची आदर्श (normative) मांडणी आहे. प्रत्यक्षात पालकांतील असमानता हीच आज विद्यार्थांचे भवितव्य नक्की करते आहे. १९९० च्या दशकांत आपल्याला IT सेक्टरची लॉटरी लागली आणि माध्यमातील दरी काही प्रमाणात भरून निघाली. पण ह्या लॉटरीचे जे भाग्यवंत विजेते होते त्यांनी प्रामुख्याने इंग्रजीचा मार्ग पत्करला आणि ही दरी परत वाढली.     

आज लोकांचे प्राधान्य इंग्रजी माध्यमाला आहे हे स्पष्ट आहे. प्रादेशिक माध्यमाचे समर्थक हे इंग्रजी समर्थक लोक चुकीचे वागत आहेत असे विधान करत असतात. म्हणजे इंग्रजी माध्यमाची निवड करणारे प्रादेशिक भाषिक पालक आपल्या मुलांची संभाव्य प्रगती खुंटवत आहेत अशा अर्थाचे हे विधान आहे.  मला वाटतं कि लोक फार काळ चुकीचे वागत राहत नाहीत. त्यांना संभाव्य फायदा लक्षात येतो आणि ते त्या अनुषंगाने आपले वागणे बदलतात. मागची जवळपास दोन दशके इंग्रजी शाळा ह्या प्रादेशिक शाळांवर हळूहळू कुरघोडी करत आहेत. इतका मोठा काळ लोक चुकीचे वागत राहतील असं म्हणणं हा क्लेमच चुकीचा असण्याची शक्यता जास्त आहे. पण म्हणून अमुक एक भाषामाध्यम चांगले आणि अमुक एक वाईट असे ठरत नाही. 

भाषामाध्यम हा आपला प्रश्न नाही. जन्मतः मुलांच्या गळ्यात येणारे पालकांच्या भूतकाळाचे ओझे किंवा पंख बाजूला सारून संधीची समानता कशी आणायची हा प्रश्न आहे. माध्यमभाषा हा त्याच समस्येचा अविष्कार आहे. ह्या समस्येचे उत्तर आपले शाळांचे शिक्षक आहेत. त्यांचे कौशल्य आणि एफिशियन्सी हा कळीचा मुद्दा आहे. मुलांपर्यंत पोचू शकणाऱ्या शिक्षकाला भाषा अडवणार नाही.  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विसंगत प्राणीदयेची समस्या

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा