वैज्ञानिक सत्य आणि हमारा वो ज्ञान-तुम्हारा तो द्वेष
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
श्रद्धा कुंभोजकर ह्यांनी लिहिलेला आणि ज्यावर बरीच उष्णता निर्माणझाली आहे असा लेख वाचला. लेख हा संशोधनात उपजीविका करणाऱ्या व्यक्तीने लिहिला असला
तरी लेखातील मांडणी संशोधकाची नाही, तर राजकारणी भूमिकेची आहे, आणि
तीही भाबडी किंवा साळसूद आहे असं माझं मत आहे. हे मत मी आता नीट स्पष्ट करतो.
--
कुठल्याही संशोधकाची जी ध्येये असतात त्यातले प्रमुख काय तर
हायपोथेसिस तपासणे. हायपोथेसिस तपासणे म्हणजे काय? तर अमुक एक विधान
आहे किंवा पर्यायी विधान आहे/मूळ विधान नाही ह्यातली एक भूमिका निवडणे आणि मग
उरलेली भूमिका सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे. जर आपण उरलेली भूमिका नाकारू शकलो
नाही तर आपल्याला आपली मूळ भूमिका नाकारायला हवी. हीच गोष्ट आपण उलटूनही करू शकतो
आणि त्यामुळे कदाचित एखाद्या विधानाला आहे म्हणूनही नाकारता येत नाही आणि आहे
म्हणूनही नाकारता येत नाही अशा प्रकारची अनिर्णीत अवस्था राहू शकते.
एखाद्या भूमिकेला सिद्ध करण्यासाठी पुरावे
लागतात. हे पुरावे अमुक एक बाजू सिद्ध करतात का नाही हे ठरवण्याचा मार्ग म्हणजे
पुराव्यांतील जोरकस प्रवाह (dominant trend/central tendency) काय आहे हे पाहणं. हा जोरकस प्रवाह परखण्याच्या
सांख्यिकी पद्धती आहेत ज्या नैसर्गिक विज्ञान, तंत्रज्ञान ह्यांत
वापरल्या जातात. पण सामाजिक विज्ञान किंवा humanities (हे माझ्या मते योग्य नाव आहे) ह्यांत
जोरकस प्रवाह परखण्याच्या सांख्यिकी पद्धती फारशा वापरल्या जात नाहीत. ह्याचे
स्वाभाविक कारण आहे कि नैसर्गिक विज्ञानात प्रयोगांतून निष्कर्ष काढले जातात,
प्रयोगांतून डेटा बनतो आणि ह्या डेटाला सांख्यिकी पद्धती लावल्या जातात. Humanities
मध्ये असे प्रयोग
शक्य नसतात, विशेषतः जेव्हा भूतकाळातील घटनांचा
अर्थ/सुसंगती/चिकित्सा लावण्याचा प्रयत्न केला जातो. प्रयोगांचा डेटा नसल्याने
ह्या ज्ञानशाखांना argumentative पद्धतीने पुराव्यांची छाननी करावी लागते. ह्या argumentative
पद्धतीतही वर म्हटले
तशी वैज्ञानिक भूमिका आवश्यक असते – कि आपल्याला ही बाजू सिद्ध करायची आहे तिची
विरुद्ध बाजू नाकारायला लागेल हे सिद्ध करणं. हे सिद्ध करण्याचा मार्ग म्हणजे
उपलब्ध पुराव्यांत पर्यायी विधानाला जोरकस प्रवाह मानायला लागेल इतपत पुरावे आहेत का
हे पाहणं.
लक्षात घ्या कि जोरकस प्रवाह ही वैज्ञानिक
सत्याची कसोटी आहे, १००% वेळा आपलं विधान सत्य असणं ही
नाही. उदाहरण म्हणजे आपण जेव्हा अमुक एक औषधाने डोकेदुखी थांबते असं म्हणतो तेव्हा
ह्या औषधाने डोकेदुखी थांबत नाही अशी उदाहरणे आपल्याला एकूण परीक्षण केलेल्या
पुराव्यांत फार थोडी मिळतात. त्यामुळे औषधाने डोकेदुखी थांबत नाही हा हायपोथेसिस
आपण सोडून देतो आणि उरलेला आपल्याला नाकारता येत नाही – तो म्हणजे औषधाने डोकेदुखी
थांबते.
--
एवढ्या पूर्वतयारीनंतर आपण कुंभोजकरांच्या लेखातील एका प्रमुख विधानाचा विचार करू:-
औरंगजेबाची आपल्या मनात करवून दिलेली प्रतिमा कितीही वाईट असेल, तरीही भारत इतिहास संशोधक मंडळानं प्रसिद्ध केलेल्या ऐतिहासिक फार्सी साहित्यात १६९१ या वर्षीची औरंगजेबाची राजाज्ञा दिलेली आहे, तिचा अर्थ असा – ‘‘..मठ उद्ध्वस्त करू नये, मत्ता जप्त करू नये.. जातीत्वाची हीन भाषा बोलू नये.’’
जी काही वाईट प्रतिमा आणि त्यापाठी जे काही
विधान आहे ते नाकारायला एक पुरावा? अशी मांडणी करणं म्हणजे एकतर जोरकस
प्रवाह ही वैज्ञानिक सत्याची कसोटी आहे हे माहित नसणं किंवा अशा वैज्ञानिक
पद्धतीवर विश्वास नसणं किंवा माहित असूनही अंतस्थ हेतूसाठी एका अपवादाने विधान
नाकारायला जाण्याचे खुळे धाडस करणं. To be fair,
कुंभोजकरांनी हायपोथेसिस
तपासण्यात उडी घेतलेलीच नाही. वाईट प्रतिमा असेल पण किमान एक पुरावा आहे जिथे हा
मनुष्य वाईट प्रतिमेच्या विपरीत वागला आहे एवढेच त्यांचे विधान आहे.
पण हे विधान आले आहे ते हिंदुत्ववादी
राजकीय भूमिकेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या इतिहासातील विधानांबाबत. इतिहास आपण
समाजात ज्ञान वाढावं म्हणून लिहितोय की द्वेष वाढावा म्हणून- याचा विवेक इतिहासकाराच्या
मनात जागृत हवा.’ – ही जी लेखाची defining ओळ आहे, ती हिंदुत्ववादी राजकीय भूमिकेशी जुळणाऱ्या इतिहासातील
विधानांबाबत आहे. ही हिंदुत्ववादी राजकीय भूमिकेशी जुळणाऱ्या इतिहासातील विधाने
वैज्ञानिक नसून द्वेष पसरवण्याच्या अजेंडाचा भाग आहेत असे एक अनुल्लेखित पण सूचित
विधान ह्या लेखात आहे. पण हे सांगताना हिंदुत्ववादी राजकीय भूमिकेशी जुळणाऱ्या
इतिहासातील विधानांपैकी एका लोकप्रिय विधानाचा एक अपवाद देऊन काय साध्य झाले?
वैज्ञानिक पद्धत काय असती कि फर्माने
पद्धतीचे जे एकूण ‘क्ष’ पुरावे आहेत त्यांत असणाऱ्या ‘न’ फर्मानांत वाईट प्रतिमेशी विपरीत फर्माने आहेत आणि हा न/क्ष
रेशो नगण्य नाही हे दाखवून देणे. कोणत्या किंमतीनंतर न/क्ष रेशो नगण्य नाही हा
पुढचा मुद्दा असता, पण १/क्ष हा रेशो नगण्य आहे असेच
बहुतेकांचे मत असेल.
विरोधी बाजू अवैज्ञानिक आहे असे सूचित विधान
करणे आणि हे विधान करताना स्वतः वैज्ञानिक पद्धतीचा वापर न करणे ह्याला काय
म्हणावं? भाबडेपणा का राजकारण?
--
इतिहास आपण समाजात ज्ञान वाढावं म्हणून लिहितो का द्वेष ह्याचा विवेक इतिहासकाराच्या मनात जागृत हवा.
हे दुसरे विधानही भाबडे
किंवा साळसूद राजकीय आहे. ही ज्ञान-द्वेष मांडणी मुळांत ‘हमारा है वो प्यार, आपकी है वो हवस’ अशा पद्धतीची आहे. पण त्याआधी इतिहाससंशोधकाचा
उद्देश समाजाचे ज्ञान/द्वेष वाढवणं आहे अशातले काही एक असते हे गृहीतकच गंडलेले
आहे.
कुंभोजकर बाईंना असं वाटत असेल कि त्यांचं इतिहास
संशोधनाचे उद्दिष्ट समाजातील ज्ञान वाढवणे आहे आणि हा त्यांचा विवेक आहे. पण हे
त्यांनी स्वतःला दिलेले स्पष्टीकरण आहे जसे हिंदुत्ववादी मांडणी करणाऱ्या
कार्यकर्त्याने ‘माझे काम हे राष्ट्राचे वैभव वाढवायला आहे’ असे स्वतःला दिलेले स्पष्टीकरण असते. आपण आपल्याला अशी गोड
आणि आंबट द्राक्षे देत असतो. हा आपल्या मानासिकेतेचा भाग झाला. सामाजिक सत्य ह्या
दृष्टीने इतिहाससंशोधकाचा उद्देश समाजाचे ज्ञान/द्वेष वाढवणं आहे असे म्हणण्याला
तेवढाच तार्किक आधार आहे जेवढा इस्त्री व्यवसाय करणाऱ्यांचे उद्दिष्ट समाजात
स्मार्ट व्यक्ती वाढवणे आहे असे म्हणायला आहे.
इतिहाससंशोधकाचे उद्दिष्ट, अन्य कोणत्याही संशोधकासारखे, संशोधन हेच आहे. हे संशोधन
ती/तो संशोधनाच्या पद्धतीने, म्हणजे वैज्ञानिक खंडन-मंडन पद्धतीने करतो का नाही
एवढी एकच कसोटी त्याला लावायची आहे. खंडन-मंडन प्रक्रियेला राबवणाऱ्या संशोधनपत्रिका, पुस्तके ह्यांत विधाने मांडणे हेच इतिहाससंशोधन. अशा
संशोधकांची संशोधनव्यासपीठाबाहेरील भाषणे, लेख हे त्यांचे मनोरंजन किंवा राजकारण
किंवा आपले सोशल नेटवर्क आणि उपद्रवमूल्य वाढवायची व्यावसायिक धडपड.
संशोधनव्यासपीठाबाहेरील विधानांना संशोधक एकच
प्रकारे संशोधक म्हणून प्रतिक्रिया देऊ शकतो: अशा विधानातील असत्य दर्शवून देणे.
ह्याव्यतिरिक्त कोणतीही प्रतिक्रिया ही संशोधकाची नाही, राजकारण्याची आहे. त्यांत विवेक वगैरे झूल लावण्यात काही अर्थ
नाही. हिंदुत्ववादी राजकारण मान्य नाही हा राजकीय प्राधान्याचा (preferences)
भाग आहे, ते कोणाचे
काहीही असू शकतात. पण म्हणून हिंदुत्ववादी जी इतिहासविधाने वापरतात ती एका
अपवादाने अवैज्ञानिक ठरवता येणार नाहीत. आणि तसं तुम्ही म्हणत असाल तर तुम्हीही
तेच राजकारण करत आहात जे हिंदुत्ववादी करत आहेत.
---
लेखिकेच्या अवैज्ञानिक approach
चा शेवटचा पुरावा
म्हणजे त्यांचे skylab चे उदाहरण.
माझे सहकारी प्राध्यापक बाबासाहेब दूधभाते यांच्या आठवणीनुसार मराठवाडय़ातल्या गावांमध्ये लोकांनी घरातल्या पापड-कुरडया तळून खाण्याचा सपाटा लावला होता. का? तर स्कायलॅब पडली तर ती वाळवणं वाया जायला नकोत म्हणून!
त्यांच्या सहकाऱ्याने किती गावांतील
किती घरांची उदाहरणे दिलेली आहेत ज्यावरून मराठवाडय़ातल्या गावांमध्ये असा मोठा
क्लेम करता येतो? कदाचित त्यांच्या सहकाऱ्याने तेव्हा असा शेकडो घरांचा रिसर्च
केला असावा आणि त्यातून त्यांचे विधान आले असेल तर माझे पुढचे विधान चूक आहे. पण
समजा त्यांच्या सहकाऱ्याच्या त्यांच्या कुटुंबातील आणि आसपासच्या कुटुंबातील
वागण्याच्या आठवणीतून हे उदाहरण आले असेल तर ते अशी वैयक्तिक आठवण म्हणूनही ‘जागतिक
घटनांचे मानसिक पडसाद उमटून माणसं
काय करू शकतात याचं हे उद्बोधक उदाहरण’ असं वापरता आलं असतं. मराठवाड्यातील
गावांमध्ये असा शब्दप्रयोग का? किती गावे, किती गावांत घडले?
---
संशोधकाने कसं आणि काय लिहू नये ह्याचा
उत्कृष्ट वस्तुपाठ हा लेख आहे. द्वेष आणि अवैज्ञानिक विधाने ही राजकारणाचा भाग
आहेत, कारण ती मानवी स्वभावाचा भाग आहेत.
संशोधकाने ह्या प्रक्रियेकडे चिकित्सक म्हणून बघावं आणि संशोधन करावं किंवा त्याला
कमी द्वेषाचा पर्याय देण्याचं राजकारण करावं. पण संशोधक असण्याच्या पडद्याआड स्वतः
राजकारण करून, अवैज्ञानिक विधाने करून समाजातील विवेक वगैरे जड नैतिक ओझी घेऊ नयेत, त्यात ना विवेक आहे न संशोधन.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा