केस कापण्याचे दर वाढण्यात आश्चर्य नाही
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोव्हीड-१९ ने जगण्या-वाचण्याच्या गंभीर प्रश्नासोबतच अनेक दुय्यम
प्रश्नांनाही जन्म दिलेला आहे. तर हा त्यातला एक. १ जून २०२० रोजी अशी बातमी वाचनात आली कि महाराष्ट्र नाभिक महामंडळ ह्या संघटनेने केस कापणे, दाढी इत्यादीचे
दर दुप्पट करण्याचे ठरवले आहे. अनेकांना आश्चर्य वाटेल कि आर्थिक मंदी वगैरे बोलले
जात आहे अशा काळांत भाव वाढवणे कसे काय योग्य आहे. पण थोडा विचार केला तर जाणवेल
ह्यांत काहीच आश्चर्यजनक नाही.
लॉकडाऊनच्या आधीचा काळ,
ज्याला आपण साधारण काळ म्हणू, त्यांत केस कापणे, दाढी ह्याची वाढती डिमांड
होती. सप्लाय अर्थातच वाढत होता कारण शहरांची वाढ, तरुणांची मोठी संख्या,
वारंवार केशरचना अनुरूप करण्याची गरज ह्यामुळे डिमांड वाढत होती आणि त्या
अनुषंगाने सप्लाय. महाराष्ट्रात, विशेषतः महानगरांत अन्य राज्यातील नाभिकही
मोठ्या संख्येने होते.
किंबहुना ह्या वाढणाऱ्या
नाभिकांच्या संख्येने भाव पडू नयेत म्हणून नाभिक संघटना दर निश्चिती करते. साधारण वर्षा-दोन
वर्षांत जीवनमानाचा खर्च वाढतो त्याच्या प्रमाणात हे दर वाढतात. केशकर्तनालय अशी
पाटी असलेल्या दुकानांत (युनिसेक्स वगैरे प्रकारात नाही) हे दर बघायला मिळतात.
त्यात साधे आणि वातानुकूलित अशी खाद्यगृहांसारखी विभागणीही बहुदा असते.
लॉकडाऊनच्या काळांत
व्यक्तिगत अंतर हे महत्वाचे बनल्याने केशकर्तनालये ही स्वाभाविकच बंद केली गेली.
जवळपास २ महिने ती बंद होती. केस कापणे ही वर्षभरात नियमाने होणारी क्रिया असेल
असे पकडले तर साधारण १६% व्यवसाय ह्या दोन महिन्यांत बुडाला असेल. व्यवसाय बुडाला
म्हणून केस वाढायचे मात्र राहणार नाहीत. अनेकांनी घरात केस वगैरे कापायचे
सेलिब्रिटी आणि साधे असे प्रयत्न केले असले तरी व्यावसायिक हजामतीची गरज
बहुतेकांना आहे. थोडक्यांत डिमांड वाढलेली आहे. जगभरात लॉकडाऊन सैल्यावल्यावर केस
कापण्याची डिमांड जोरकस राहिलेली आहे.
आता सप्लाय साईडला काय
अवस्था आहे? तर सप्लाय घटलेला आहे. कारण अनेक नाभिक त्यांच्या अन्य राज्यातील किंवा
महाराष्ट्रातील गावी परत गेले आहेत. म्हणजे नाभिक थोडे आणि ग्राहक बरेच आणि तेही
अधीर (!) अशी अवस्था आहे. डिमांड वाढलेली आणि सप्लाय घटलेला अशा अवस्थेत भाव
वाढतात. तेच इथे घडत आहे.
भाव वाढण्याचे कारण
डिमांड-सप्लायच आहे का? बहुतेक. मग कोणी म्हणेल कि दोन महिने बुडालेला धंदा
रिकव्हर करायला भाव वाढवत असतील. पण हे प्रमुख कारण असतं तर दोन महिने धंदा
बुडालेल्या अनेक उद्योगांत अशी भाववाढ दिसली असती. पण तशी दिसत नाही. स्टेशनरी
दुकानदार हे दुप्पट भाव लावू शकणार नाहीत. घरकामाला जाणाऱ्या आणि मागच्या दोन
महिन्यांचा पगार बुडालेल्या महिला कर्मचारी दुप्पट पगार मागू शकणार नाहीत. कपड्यांची
दुकाने भाव वाढवणार नाहीत.
भाववाढ ही एकांगी नसते, तिला डिमांड-सप्लाय अशी दोन्ही अंगे असतात. डिमांड
वाढली आणि सप्लाय वाढला नसेल (तेवढाच किंवा कमी झाला असेल) तर भाव वाढतात. उदाहरणार्थ
मार्च महिन्यातील मास्कच्या किंमती. डिमांड तेवढीच असेल पण सप्लाय घटला कि किंमती
वाढतात, उदाहरणार्थ भाज्या, खुले दूध ह्यांच्या किंमतीतील वाढ. लॉकडाऊननंतर
केस कापायचे म्हणाल तर डिमांडपण जोरदार आहे आणि सप्लाय घटलेला आहे, म्हणजे
किंमती वाढणे स्वाभाविकच.
अर्थात ही वाढलेली किंमत
किती काळ टिकेल हेही डिमांड-सप्लायवरच ठरेल. जर लोक जास्त कालावधीने केस कापायला
जाऊ लागले तर डिमांड सुरुवातीच्या surge नंतर बरीच कमी होईल. जर परत
गेलेले कारागीर शहरे परत धडधडू लागली आहेत हे पाहून परत आले तर किंमती कमी होतील, किंवा
अनेक व्यावसायिक संघटनेच्या बाहेर जाऊन कमी किंमत स्वीकारू लागतील.
--
डिमांड-सप्लाय आपल्याला
विळखा घालून असतंच, सैल विळखा असेल तर आपल्याला जाणवत नाही एवढंच. केस कापणे ही एकच
गोष्ट नाही जिचे भाव लॉकडाऊन सैल होताना वाढू शकतात. शहरांतर्गत वाहतुकीचे भावही
वाढतील असं मला वाटतं, कारण घटलेला चालकांचा सप्लाय.
आणि थोडं इतिहासात गेलं
तर एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट सापडते. 1896 साली मुंबईत
आलेल्या प्लेगच्या साथीनंतर जसे आपण आता पहिले तसेच रिव्हर्स-मायग्रेशन झाले होते.
ह्यातले अनेक स्थलांतरित परत मुंबईत आले, काही महिन्यातच/वर्षांत आले
(१९वे शतक आहे!) आणि त्यांचे बार्गेनिंग पॉवर वाढलेली होती.
सध्याच्या काळातल्या रिव्हर्स-मायग्रेशनवर बरंच लिहिलं-बोललं जातंय. मला वाटतं कि ह्यातले अनेकजण वेगाने शहरांत परत येतील. कारण लॉकडाऊन सैलसर केले जात असताना उद्योगधंदे सुरू होतील, त्यांना अधिक कर्जपुरवठा असेल तर ते अधिक पगारही देऊन कामगार घेऊ पाहतील. ही डिमांड स्वाभाविकपणे परतलेल्या स्थलांतरित लोकांना खेचून आणेल. कोव्हीडची भीती, किंवा गावाकडे परत जाताना सहन कराव्या लागलेल्या हालअपेष्टा ह्यांचा परिणाम फार राहणार नाही असं वाटतं, कारण आपण जात्याच आशावादी प्राणी आहोत, दुसरे असणार काय!
यथावकाश कळेलच, अर्थात तोवर कोव्हीड-१९ कधी होतो आपल्याला ही टांगती तलवार आहेच. वाढलेले केस जातील, दाढ्या जातील-येतील, ही तलवार कधी जाईल? :)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा