रस्ता अपघाताने जी.डी.पी. वाढतो – सोपी आणि चुकीची विधाने कशी असतात?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज फेसबुकवर मला ही पोस्ट वाचायला मिळाली.
ही पोस्ट साधारणपणे वैचारिक भूमिकेतून आपले फेसबुक चालवणाऱ्या आणि मध्ये-मध्ये लेख वगैरे छापून आणणाऱ्या व्यक्तीने टाकली होती. ‘सायकल चालवणे हे अर्थव्यवस्थेला घातक आहे’ अशा आशयाचे हे विधान त्यांना पटले आहे का नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलेले नाही. पण ह्या पोस्टने मला एकूणच लोकांच्या अर्थशास्त्रीय संकल्पनांच्या तोकड्या समजेची जाणीव झाली. आणि इथे लोक म्हणजे वैचारिक भूमिका असणारे लोक अशा अर्थाने मी लोक हा शब्द वापरतो आहे.
आपण ह्यांना वाईट मानतो अशा घटना घडल्याने जी.डी.पी. वाढतो, अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळे अशा विद्रूप मोजमापावर आधारित आधुनिक अर्थव्यवस्था ही विनाशकारी होय अशा आशयाची मांडणी मी पहिल्यांदा दिलीप कुलकर्णी ह्यांच्या ‘निसर्गायण’ ह्या पुस्तकात वाचली. (प्रकरण: नवं नातं, पान ८७, नोव्हेंबर २००५ आवृत्ती). त्यात ते म्हणतात
अपघात वाढले कि अनेक गोष्टी, सेवा ह्यांची खरेदी-विक्री होते आणि त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते असे त्यांचे विधान आहे. आणि म्हणून ‘अधिक अपघात म्हणजे अधिक विकास’ असा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे.
हा निष्कर्ष सपशेल चूक
आहे. पण हा निष्कर्ष आणि तो चूक आहे हे दाखवणे हे काही आता आलेले नाही. Parable of Broken Window अशा
नावाने १८५० मध्येच Frédéric Bastiat ह्या फ्रेंच अर्थाशास्त्रज्ञाने ह्या चुकीच्या
मांडणीचा समाचार घेतलेला आहे.
काय चूक आहे ह्या निष्कर्षात? अपघात
घडला कि दवाखाना, दुरुस्तीकार ह्यांना व्यवसाय मिळतो हे योग्य आहे. पण हे केवळ जे घडतं
तेवढंच लक्षात घेण्याचा प्रकार झाला. दवाखाना, दुरुस्ती ह्यांवर जाणारा पैसा
अन्य खर्चांना वापरला जात नाही. म्हणजे ट्रीप रद्द केली जाते, मोबाईल
घेणे दूर ढकलले जाते. त्यातून काही जणांचा व्यवसाय बुडतो. म्हणजे एका बाजूला
होणारी अतिरिक्त खरेदी- विक्री ही दुसरीकडे घटते. जी.डी.पी. म्हणजे एकूण उत्पादित
वस्तू आणि सेवा ह्यांची बेरीज. त्यांत दवाखाना, औषधे,
दुरुस्ती जमा होते आणि ट्रीप, मोबाईल वजा होतात आणि एकूण फरक शून्य होतो.
पुढे जाऊन अपघाताने
व्यक्ती जे काम करत नाही त्यातून नवे उत्पादन घटते आणि जी.डी.पी. सुद्धा घटतो, आजचा
किंवा उद्याचा. जर अनेक अपघात झाले तर अनेक व्यक्ती कामांवर जाऊ शकणार नाहीत.
अगोदरच उत्पादित झालेली औषधे, डॉक्टरांचे कौशल्य, garageचे सामान
हे वापरले जाईल, पण ह्या कामावर न जाणाऱ्या माणसांमुळे उत्पादन घटून जी.डी.पी. घटेल.
जी.डी.पी. हे एक
स्वाभाविक मोजमाप आहे. त्यांत कोणतीही विकृती नाही. कमतरता आहेत, पण
त्या काही गोष्टी मोजणे राहून जाण्याच्या आहेत. ह्या मोजमापात मानवाला हानिकारक ते
जी.डी.पी.त भर घालणारे अशी कोणतीही विकृती नाही.
लेखाच्या सुरुवातीला
असलेले विधान पाहू. ‘सायकल चालवणे हे अर्थव्यवस्थेला घातक आहे’ कारण
सायकली घेणारा मनुष्य चारचाकी घेत नाही, त्या अनुषंगाने येणाऱ्या बाकी
वस्तू घेत नाही, त्याचे आरोग्य चांगले राहिल्याने तो औषधे,
दवाखाने हे वापरत नाही, आणि म्हणून सायकल वापरल्याने अर्थव्यवस्थेचे नुकसान होते.
हे विधान वरच्या ‘जास्त अपघात, जास्त जी.डी.पी.’ ह्याच विधानाची नवी आवृत्ती
आहे. सायकल चालवणारा मनुष्य जे खर्च टाळेल ती क्रयशक्ती अन्य कुठे वापरेल किंवा ही
वाचलेली क्रयशक्ती अन्य कोणाला कर्ज म्हणून उपलब्ध होईल आणि त्यातून उत्पादन-खरेदी-विक्री
होईल.
एकदम लक्षावधी लोकांनी
सायकली विकत घेतल्या तर? तर कार इंडस्ट्री बुडेल आणि सायकली ह्या
मौल्यवान बनतील. मोटार कारखान्यातील नोकऱ्या आणि पगार घटतील, तेच
सायकल कारखान्यात वाढतील. काही औषधांचे उत्पादन घटेल पण खाद्यपदार्थांचे उत्पादन
वाढेल (तंदुरुस्त लोक अधिक खाणार नाहीत का!)
Trade-off हा
आर्थिक विचाराचा गाभा आहे. एके ठिकाणी केलेला खर्च म्हणजे दुसरीकडे न केलेला खर्च.
त्यामुळे केवळ अमुक एक ठिकाणी उत्पादन वाढले म्हणजे अर्थव्यवस्था वाढली का घटली हे
सांगता येत नाही. असे कोणी सांगत असेल तर ते चुकीचं विधान आहे.
अपघातांनी अर्थव्यवस्था
सुधारत असती तर युद्धात होरपळलेले, नैसर्गिक आपत्तीत सापडलेले देश श्रीमंत झाले
असते आणि कोरोनाच्या लॉकडाऊननंतर सारे देश आनंदी झाले असते. असं दिसतंय का
तुम्हाला?
जे मानवासाठी सुखावह आहे
ते वाढल्याने जीडीपी वाढतो आणि ते घटल्याने आणि दुःखजनक गोष्टी वाढल्याने जीडीपी
घटतो. मग पर्यावरणाची हानी होऊनही जीडीपी कसा वाढतो असा प्रश्न काही जण विचारू
शकतात. त्याला सविस्तर उत्तर देईन.
अपघात वाढल्याने
अर्थव्यवस्थेला चालना मिळत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तर्क कसा
करतात हे नीट शिकून घ्यायची आवश्यकता आहे. तुम्ही प्रांजळपणे तसं करू शकता किंवा
आपल्या उथळपणात आनंदी राहू शकता. ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा