फुटपाथवर आयब्रो: मूलभूत आहे मार्केट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मी मागच्या पोस्टमध्ये म्हटलेलं कि मी व्यसनांच्या बाबतीत पुढची पोस्ट
लिहीन. पण आज मला एक विलक्षण दृश्य पाहायला मिळालं ज्यामुळे मी विषय बदललेला आहे. तर ते दृश्य म्हणजे: ४ स्त्री रहिवासी त्यांच्या इमारतीच्या आसपास, त्या बिल्डींग्स किंवा स्थानिक नगरसेवक ह्यांनी ठेवलेल्या बेंचेस आणि
जवळच्या कठड्यापाशी होत्या. लांबून मला जे दिसलं त्यानुसार त्यातली एक स्त्री
दुसऱ्या स्त्रीच्या मांडीवर डोकं ठेवून पडली होती, तिसरी स्त्री मांडीवर डोके
ठेवलेल्या स्त्रीवर झुकलेली होती आणि चौथी ह्या तिघींच्या जवळच आडोसा केल्यासारखी
उभी होती.
सुरुवातीला मला वाटलं कि
त्या पडलेल्या स्त्रीला चक्कर वगैरे आली आहे. पण काही पावले पुढे जाताच मला दिसलं
कि मांडीवर डोके ठेवून पडलेल्या स्त्रीच्या भुवया तिच्यावर झुकलेली स्त्री तासत
आहे. मला अशा सौंदर्यप्रक्रियांची जितपत माहिती आहे त्यानुसार ह्या प्रक्रियेला आयब्रो
म्हणत असावेत (चू.भू. द्या.घ्या.)
मार्केट बदलत्या
अवस्थेला अनुसरून डिमांड-सप्लाय प्रक्रियेत कसे बदल घडवून आणतं आणि डिमांड-सप्लाय
एकमेकांना छेदतातच (आपल्यातल्या अनेकांनी एकमेकांना छेडणारे डिमांड-सप्लाय ग्राफ, ज्याला
डिमांड-सप्लाय क्रॉसही म्हणतात ते पहिले असतील.) (आकृती १) ह्याचं उत्तम उदाहरण
म्हणजे हे लॉकडाऊन काळातील फुटपाथवर घडणारे सौदर्यप्रसाधन. अर्थात हे करताना
कोणीही मास्क घातलेले नव्हते आणि ह्या व्यक्ती एकमेकांच्या खूपच जवळ होत्या.
प्रतिमा: https://tradingbud.com/en/strategy/lesson/capital-and-trade-flow |
मला वाटतं कि ब्युटीपार्लर्स
सुरू असती तर हे विलक्षण दृश्य मला पाहायला मिळालं नसतं. सौदर्यप्रक्रिया करणारी व्यक्ती ही जिचे दुकान बंद आहे अशी प्रोफेशनल होती का जिच्यावर
प्रक्रिया होते त्या व्यक्तीच्या विश्वासू वर्तुळातील, जसे
शेजारीण होती? शक्य आहे. जर संपर्कातून रोगप्रसाराचे भय लोकांत टिकून राहिले
तर आज मार्केटमध्ये, म्हणजे पैसे देवून होणाऱ्या सौदर्यप्रक्रिया मार्केटच्या बाहेर होतील,
म्हणजे मिडीयम ऑफ पेमेंट रुपये असणार नाही, तर एकमेकांना मदत करणे ह्या
तत्वावर ह्या प्रक्रिया होतील. मला स्वतःला ही शक्यता नगण्य वाटते, पण
समजा कोरोना मुंबईत अगदी दाट आणि सर्वत्र पसरला तर असं होण्याची शक्यता नाकारता
येत नाही. (आकडे तरी असं विद्रूपच काही सांगत आहेत!)
लॉकडाऊनच्या दरम्यानच कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांच्या केशभूषा
केल्याचे फोटो आलेच होते. अनेक पुरुषांनी आणि काही स्त्रियांनीही बहुदा मशीनने
तुळतुळीत होण्याचा मार्गही अवलंबला. अशा प्रक्रिया असतात ज्यांचा डिमांड-सप्लाय
बहुतेकदा आपणच आपला करतो, जसे दात घासणे. पण केशभूषा स्वतःची स्वतः करणारे
लोक तुलनेने फार कमी आहेत. भारतात तर पिढीजात कौशल्य अशा नात्याने केस कापण्याकडे
पाहिलं गेलं होतं.
आता हे सौदर्यप्रसाधन हे स्त्रियांचे वेड आहे, दारू
सुरू केलीत तसे ब्युटीपार्लर सुरू करा असे विनोद आपण वाचले असतीलच. पण पुरुषांनीही
आपले सौदर्यप्रसाधन करून घेण्याचे अभिनव मार्ग चोखाळले आहेत. माझ्या एका
मित्राच्या बिल्डींगमध्ये तेथील पुरुष रहिवाश्यांनी एकत्र येऊन स्थानिक केस
कापणाऱ्या दुकानदाराला बोलावून गच्चीवर केस कापून घेतले.
ह्या सेवा आपण घरात घडवत नाही. आणि ह्या सेवा घडण्याची दुकाने बंद
आहेत. मग ग्राहक आणि विक्रेते ह्यांनी परस्परसामंजस्यातून खरेदी-विक्रीचा मार्ग
काढला. ह्याचे कुठे आंदोलन नाही का सरकारी निर्णय नाही. आपापल्या व्यक्तिगत गरजा
भागवणे आणि आपापले व्यक्तिगत हित विक्री करून साधणे ह्यांतून अनेकदा कोणीतरी
मुद्दामून घडवून आणली आहे असे वाटण्याजोगी पण खरंतर लोकांच्या व्यक्तिगत हिताच्या
आकांक्षेने बहुतेक आपोआप (म्हणजे व्यक्ती-व्यक्तींनी नवे पर्याय लावून आणि
बाकीच्यांनी ते रिपीट करून) घडलेली मार्केट सिस्टीम उभी राहते अशा आशयाचे (मूळ विधान
ह्याहून टोकदार आहे आणि qualified, म्हणजे
अटी लागू प्रकारचे आहे!), ज्याला Invisible hand ह्या
नावानेही ओळखलं जातं, Adam Smith ह्या
प्रख्यात अर्थशास्त्री-तत्ववेत्त्याचे विधान आहे.
वुहानमधला लॉकडाऊन
संपल्यानंतर जेव्हा परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न झाले त्यात
तेथील हेअरड्रेसर्सकडे बरीच गर्दी होती (लेखातील
विचारात पाडणाऱ्या गोष्टींत हीच तेवढी नर्म गोष्ट आहे.) केस कापण्याची डिमांड ही
ठराविक वेळानंतर निर्माण होते आणि आपल्याला त्याच्या सप्लायची सवय होती. लॉकडाऊनने
आपल्याला ही सवय मोडायला भाग पाडलं. पण लॉकडाऊन सुरू होऊन जवळपास २ महिने होत
आल्यावर काही ग्राहक तरी बैचेन होणारच. प्रत्येक गोष्टीच्या डिमांडमध्ये असा अधीर
वर्ग असतोच!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा