मार्केट हे अत्यंत मूलभूत आहे. लोकांच्या गरजा आणि ते पुरवणं हे माणसे
खूप पूर्वीपासून करत आहेत. ह्या गरजांची पूर्ती करण्यासाठी वेगवेगळे मार्ग लोक
चोखाळत आली आहेत. ह्यातले काही मार्ग बंद झाले कि काहीकाळ असे मार्केट बंद होते, पण
बहुतेकदा पर्यायी मार्ग शोधला जातोच. आपण सगळ्यांनी इतिहासात वाचलेले उदाहरण
म्हणजे १४५२ मध्ये इस्तंबूल ऑटोमन ताब्यात गेल्यावर भारताशी व्यापाराचा खुष्कीचा
मार्ग अडचणीत आल्याने युरोपियन व्यापाऱ्यांनी सागरी मार्गांचा अवलंब वाढवला.
कोव्हीड-१९ लॉकडाऊनमध्येही वस्तू/सेवा विक्रीचे अनेक प्रस्थापित मार्ग
अडचणीत आले. पण त्यावर लोकांनी तोडगे काढलेच. त्यातले एक उदाहरण म्हणजे घरगुती
सेवा जसे, धुणे, भांडी, पाल्यांची काळजी, वृद्धांची/रोग्यांची काळजी, पुरवणाऱ्या व्यक्ती.
कोरोनाने व्यक्ती-व्यक्तीमधल्या संपर्कालाच मोठा धोका बनवले. अशावेळी विश्वासू
संबंध म्हणजे कुटुंबीय सोडून बाकी सर्वांसोबत भौतिक अंतर राखण्याचा पर्याय
आपल्याला निवडायला लागला. साहजिक आहे कि ह्या उघड विश्वासाच्या वर्तुळाबाहेरील
व्यक्तींना आपण लॉकडाऊनमध्ये आपल्या संपर्कात येण्यापासून थांबवलं. कितीही जवळची
असली तरी घरात बाहेरून कामाला येणारी व्यक्ती ही आपल्या निरीक्षणाच्या बाहेर असते
आणि त्यामुळे तिलाही घरात येण्यापासून थांबवावं लागलं.
घरात कामाला येणारी मेड (maid) न
येणं हे लॉकडाऊनच्या काळात बहुतेक घरांसाठी घडलेलं आहे. मी स्वतः भांडी घासताना
किंवा लादी पुसताना ह्या बाबीबर चिंतनही केलं आहे!) परंतु काही घरांनी ह्यावर
तोडगा काढला. हा तोडगा म्हणजे अशा सेवापुरवठादार व्यक्तीला घरातच ठेवून घेणं. ह्या
व्यक्तीला घरातच ठेवल्याने त्या व्यक्तीमार्फत संसर्गाचा धोका आपोआपच नाहीसा झाला.
सेवा विकत घेणाऱ्या कुटुंबाची सोय झाली (सेवा अखंड मिळत राहणे) आणि नवी गैरसोय
झाली (घरातील स्पेस कमी होणे) आणि सेवा पुरवठादार व्यक्तीचाही फायदा झाला (अनेक
कुटुंबांनी काम नसतानाही मार्च महिन्याचे पगार दिले हे खरं आहे, त्या
अर्थाने ह्या घरातच राहणाऱ्या व्यक्तीला तोटाच झाला. पण पुढील महिन्यांत अशा सहानुभूतीने
पगार देणाऱ्या घरांचे प्रमाण घटलेले आहे. अशावेळी घरातच राहणाऱ्या सेवापुरवठादार
व्यक्तीला वेतन मिळत राहिले आहे.) किती कुटुंबांनी हा मार्ग चोखाळला आणि अशा वेळी
वेतन वाढवले गेले का काम अतिरिक्त दिले गेले, साप्ताहिक सुट्टी मिळाली का नाही हे
सारे तपशील फार माहिती नाहीत. इथे लक्षणीय बाब ही आहे कि कुटुंबांनी झपाट्याने हा
तोडगा काढला. आणि दुसरं म्हणजे ह्या कुटुंबांची अशा सेवांची डिमांड ही इकॉनॉमिक्समध्ये
ज्याला inelastic म्हणतात
अशी आहे, म्हणजे काहीही प्रसंग आला तरी त्यांना ह्या सेवा हव्या आहेत. माझ्या
माहितीतले उदाहरण आहे त्यात बेबीसीटरचे काम करणारी व्यक्ती ही अशा कुटुंबात
राहायला गेलेली आहे. प्रामुख्याने बेबिसीटरच्या बाबतीतच असे घडू शकते कारण अनेकदा
ह्या आया ह्या घराची संपूर्ण जबाबदारी नसलेल्या स्त्रिया असतात. वृद्धांची काळजी
घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती ह्या अनेकदा मध्यमवयीन स्त्रिया असतात आणि त्या सेवाग्राहक
घरात राहू शकतील हे त्यांनाच शक्य नसते.
लोकांच्या ह्या निवडीचा किंवा प्राधान्याचा
विचार दूरगामी भविष्याच्या दृष्टीनेही करता येईल. कोरोनाचे सावट आपल्यावर किती काळ
राहणार आहे हे आपल्याला माहित नाही. समजा, पुढच्या ५-६ महिन्यातही लस, औषध असा उपाय सापडला
नाही तर लोक तोडगे काढतीलच. त्यांत ज्यांना अशा घरगुती सेवा हव्या आहेत ते अशा
सेवांच्या खरेदी-विक्रीत काही बदल आणू शकतात.
- -
समजा कोरोनाटेस्ट उपलब्ध झाल्या तर अशा सर्व्हिस
प्रोव्हायडरना टेस्ट बंधनकारक होईल. काही ठिकाणी ग्राहक ही टेस्ट करून घेतील.
अर्थात ही टेस्ट परत परत करावी लागेल.
- काही ग्राहकांचा गट बनून तो त्यांच्या सर्व्हिस
प्रोव्हायडरला आणि त्याच्या कुटुंबियांना अधिक सुरक्षित शेजारात, म्हणजे जिथे
कोरोना केसेस कमी आहेत तिथे ठेवण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे servants’ quarters सारखं, काहीजण तर त्यांना आपल्या घरातही ठेवतील.
- अशा सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी सुरक्षा पेहराव
येईल, जो त्यांना कामाच्या ठिकाणी घालावा लागेल.
- समजा टेस्ट सहज उपलब्ध झाल्या नाहीत, तरी मला स्वतःला असं वाटतं कि
जोवर अशा सर्व्हिस प्रोव्हायडरकडून कोरोना पसरणं असं घडत नाही, तोवर लोक ह्या सेवा विकत
घेणारच, जरी त्यात काही रिस्क असेल. मास्क, sanitizers ह्या
गोष्टी अविभाज्य बनतील. काही घरी आंघोळ,
दुसरे कपडे/सुरक्षाआवरण अशाही बाबी येऊ शकतात.
ह्या चर्चेचा उद्देश तोच जो ब्लॉगचा उद्देश आहे, कि डिमांड-सप्लाय असेल तर खरेदी-विक्रीचे नवे नवे मार्ग येणारच हे दाखवणं. मग सरकार किंवा सामाजिक नेतृत्वाने काय करावे किंवा काय करू नये?
- घरात राहणाऱ्या अशा सेवापुरवठादाराच्या शोषणाचा प्रश्न, गैरवर्तनाचा प्रश्न ह्याबाबत नियम असणं
- अशा स्वरुपात काम करणाऱ्या व्यक्ती नोंदणीकृत असणे
- कामाच्या वेळा आणि स्वरूप ह्याची निश्चिती
ह्याबाबत नियम हवेत. असतील तर ते लोकांपर्यंत पोचवायला हवेत. पण अशा स्वरुपाचे बदल थांबवायचा प्रयत्न फोल राहील. अर्थात इथे फार मोठा नैतिक पेच नसल्याने समाजातून ह्याला विरोध होण्याची शक्यता कमी आहे.
ज्या उदाहरणाने मी ह्या बदलाचा विचार करत होतो, त्यांत एक तरुण मुलगी, जी बेबीसीटर म्हणून काम करते ती तिच्या ग्राहक कुटुंबात राहत आहे. तिची आई तिला ती राहत असलेल्या बिल्डींगच्या कंपाऊंड गेट च्या दुसऱ्या बाजूनेच सध्या भेटू शकते. कारण ह्या मुलीचा तिच्या ग्राहक कुटुंबाशिवाय कोणाशी संपर्क न येणं हाच कळीचा मुद्दा आहे.
--
ज्या उदाहरणाने मला हे सगळं डोक्यात आलं त्या अनुषंगाने मी inelastic डिमांड असा शब्द वापरला होता. अशा स्वरुपाची डिमांड असणाऱ्या
अन्य काही गोष्टी म्हणजे व्यसनांची डिमांड. त्यांच्या डिमांड-सप्लायबाबत पुढच्या
पोस्टमध्ये.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा